अष्टमी (महेंद्र मोरे) आज रोहा शहर व परिसरात नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. यासाठी हॉटेल्स,बार, वाईन शॉप, यांसह ग्रामीण भागातील फार्महाउस, रिसॉर्ट येणाऱ्या पर्यटक व स्थानिकांच्या सेवेसाठी सज्ज होत आहेत. मात्र हे करत सर्व व्यावसायिक यांसह नागरिक विशेषतः युवा वर्गाने प्रशासनाने दिलेल्या सुचना व नियमांचे पालन करत सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करावे. असे आवाहन रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी केले आहे. पोलीस ठाणे हद्दीतील सर्व प्रमुख रस्ते,रोहा शहर व ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर पोलिसांची याकाळात करडी नजर राहणार आहे.नियम मोडणारे,शांतता भंग करणारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी नागरिकांना दिला आहे.
रोहा शहरासह तांबडी, चणेरा, तळाघर, नीवी, मेढा, सानेगाव, धामणसई या ग्रामीण भागात असणारे फार्महाउस, रिसॉर्ट मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेची सर्व तयारी जोरदार सुरु आहे.मात्र असे होत असताना हे सर्व शांततामय वातावरण व्हावे यासाठी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेशानुसार, उपविभागीय अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस निरिक्षक व त्यांचे सर्व सहाय्यक अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले आहेत. यादृष्टीने रोहा पोलीस ठाण्यात सर्व हॉटेल्स, बार व फार्महाउस मालक व चालक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विशेषतः ग्रामीण व जंगल भागात असणाऱ्या फार्महाउस व रिसॉर्ट चालकांनी नववर्षाचे स्वागत करता आवाज व रोषणाई यामुळे वन्यप्राणी व वनसंपदेला कोणतीही हानी होणार नसल्याची खबरदारी घ्यावी. यासोबतच येणाऱ्या पर्यटकांचे मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.मद्य व अन्य नशेच्या पदार्थांचा वापर टाळात शांततापूर्ण वातावरणात सरत्या वर्षाला निरोप द्यावा.मद्यपान करून वाहने चालवु नये असे आवाहन रोहा पोलिसांनी केले आहे.३१ डिसेंबर रोजी रोहा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व भागात ३ अधिकारी व ३५ कर्मचारी तैनात राहुन सर्वत्र करडी नजर ठेवणार आहेत. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.तरी कोणतीही अप्रिय घटना व पोलीस कारवाई टाळण्यासाठी सर्व नागरिकांना नियमांचे पालन करत नववर्षाचे स्वागत करत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रोहा पोलीस निरिक्षक प्रमोद बाबर यांनी केले आहे.