अदानीची ‘माल रेलगाडी’ सुसाट ? खरं काय खोटं काय, शेतकरी ग्रामस्थांत संभ्रम रेल्वे संघटनाही स्थापन, आता बोला !

Share Now

222 Views

रोहा (राजेंद्र जाधव) हे राज्य, हा देश भांडवलदारांचा असेच धक्कादायक वास्तव सध्या पाहायला मिळत आहे. त्यातही रेल्वे, रस्ते दळणवळणाची साधने अधिक प्रभावी करण्याचा विडा मुख्यत: केंद्र सरकारने उचलला आहे. देशाचा विकास म्हणत मोजके अब्जाधीश भांडवलदार सोबतीला आहेतच, याचीच प्रचिती आता मुख्यतः रोहा मुरुडकरांना येत आहे. म्हणे अदानीची माल रेलगाडी उडदवणे,रोठ, वरसे, निवी, तळाघर हद्दीतून व्हाया वाली, उचल भालगावमार्गे मुरुड दिघीकडे धावणार आहे. अदानीची रेलगाडी सुसाट सुटणार असल्याने संबंध मुरुड, रोहेकर अक्षरश: द्विधा संकटात सापडलेत. याच सवालात अदानीची माल रेलगाडी खरंच याच मार्गी प्रस्तावीत आहे का ? याचे प्रशासकीय उत्तर अद्याप कोणाकडेही नाही. दुसरीकडे अदानीची रेल्वे मालगाडी आपल्याच हद्द, भागातून जाणार म्हणत बड्या नेत्याने बड्याच अपेक्षाने शेतकरी न्याय्य रेल्वे संघटनाही कार्यान्वीत केल्याची खुमाखदार चर्चा सुरू झाल्याने आता बोला, असेच चित्र आहे. काहींनी रेल्वे मार्ग अंदाज बांधत, रेल्वे स्थळांचे मॅप बघत रेल्वेच्या वाटेवरच जमिनी विकत घेतल्या, दलाल लॉबीही प्रचंड सक्रिय झाली आहे. अशात रोठ, वरसे, निवी, तळाघर यांसह भालगाव पट्ट्यातून खरच रेल्वे जाणार आहे का ? याबाबत शेतकऱ्यांसह नागरिक चांगलेच संभ्रमात पडले आहेत. दरम्यान, बडे उद्योगपती गौतम अदानी यांची खाजगी माल रेलगाडी खरच प्रस्तावीत मार्गातून
सुसाट सुटणार आहे का, त्यासाठी जमिनी संपादन प्रक्रिया सुरू होणार आहे का ? याचे स्पष्टीकरण रोहा महसूल विभागाने करावे अशी नागरिकांतून मागणी झाली आहे.

देश, राज्यात रेल्वे रस्त्यांचे जाळे विणणे सुरू झाले आहे. त्यासाठी तळा, म्हसळा, श्रीवर्धन शहरांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण झाले. समुद्र मार्गही विकसीत करण्याचे धोरण जलदगतीने सुरू होत आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यटन व औद्योगिकीकरणाला लाभ होईल असे बोलले जात आहे. त्यातच औद्योगिकीकरणाचा एक भाग म्हणून दिघी व अन्य बंदराचा पोर्ट म्हणून विकासाचा घाट घातला जात आहे. कोळसा व अन्य रासायनिक मालाच्या वाहतुकीसाठी समुद्राला रेल्वे मालगाडीने जोडण्याचा प्रस्ताव समोर येत आहे. त्याच अनुषंगाने अष्टमी महसुली गावातून रोठ, वरसे, निवी, तळावर ताम्हणशेत, वाली, हार्डी, हाळ, विरजोली, उचल, भालगावमार्गे आगारदंडा दिघी पोर्टकडे माल रेलगाडी धावणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. अदानी समूहाच्या मालकीची माल रेलगाडी धावण्याच्या शक्यतेने रेल्वे मार्गावरील जमिनी जमीन संपादीत करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आणि शेतकरी, नागरिकांच्या चर्चेला चांगलेच उधाण आले. रेल्वे मार्गाचे मॅपही चांगलेच व्हायरल झाले. त्यामुळे फायदा कोणाचा, तोटा कोणाचा ? अशीही चर्चा रंगली. प्रत्यक्षात अदानी समूहाची माल रेलगाडी कुठून जाते, त्यात कितपत सत्यता आहे, याचे उत्तर कोणाकडेच नाही. याउलट आपला गाव, विभाग हद्दीतून माल रेलगाडी जाते या उत्साहातून बडया नेत्याने रेल्वे संघटनेची मुहूर्तमेढ
रोवल्याचेही खुमाखदार चर्चा सुरू आहे. काहींनी तर रेल्वे मार्गावर जागाच खरेदी केल्या. जमिनी दलाल लॉबीलाही चांगलेच ऊत आले आहे. अशात सध्यस्थितीत माल रेल्वेगाडीचे सोशल मीडियावरील मॅप कितपत खरे आहे, याबाबत साशंकता आहे. याउलट अदानीची माल रेल्वेगाडी संबधीत गाव हद्दीतून सुसाट जाणार आहे. जमिनींचे संपादन सुरू आहे, असे काहीच चित्र नाही. जागा संपादनाबाबत रोहा महसूल विभागानेही जाहीर केलेले नाही. अशात खरे काय खोटे काय ? याचे स्पष्टीकरण महसूल विभागाने करावे अशी मागणी झाली आहे.

मागील दोनतीन वर्षापासून वरसे, निवी, तळाघर, वाली हद्दीत जागांचे सर्व्हेशन सुरू आहे. मात्र नेमका प्रकार काय ? हे अद्याप कोणालाच समजले नाही. मागील वर्षापासून मुरुड दिघी पोर्टकडे अदानी समूहाची मालगाडी जाणार हे अधिकृतपणे चर्चेत आहे. पण मालगाडीचा नेमका मार्ग कुठून ? याबाबत नागरिकांत मोठे संभ्रम आहे. सध्या व्हायरल होत असलेले मॅप मंजुरी मिळालेल्या पाचसात मजली इमारती, करोडो रुपयांचे बंगले छेदून जात आहे. प्रस्तावीत मार्गावरून रेल्वे जाणार असेल तर जिल्हाधिकारी रायगड यांनी टोलेजंगी इमारतींना परवानगी दिल्या कशा ? याच शंकेने मॅप कितपत खरे आहे. माल रेलगाडीचा नेमका मार्ग कोणता ? याबाबत संभ्रम अधिकच वाढले आहे. त्यातच नेत्यानी रेल्वे सुसाट म्हणत काढलेल्या रेल्वे संघर्ष संघटनेला शह देण्यासाठी दुसरी शेतकरी हितकारक रेल्वे संघटना कार्यान्वीत होण्याचे सुतोवाच मिळाल्याने अदानीची रेल्वे सुसाट होण्याआधीच शेतकऱ्यांसाठीच्या कैवारी संघटना सुसाट सुटल्याचे मजेशीर चित्रही पाहायला मिळत आहे. दरम्यान, अदानी समूहाची माल रेल्वेगाडी मार्गासाठी जमीन संपादन प्रस्ताव महसुलाकडे आले आहे का, रेल्वे गाडीचा नेमका मार्ग कुठून असेल, याबाबत रोहा महसूल विभागाने तातडीने स्पष्टीकरण करावे, शेतकरी, नागरिकांचे संभ्रम दूर करावे, अशी मागणी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.