रोह्यात विकासाच्या नावावर उभ्या वास्तू भग्नावस्थेकडे, अग्निशमन केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत, नेते टक्केवारीने, ठेकेदार कामाने मालामाल, पायाभूत सुविधांची वानवा जैसेथेच

Share Now

88 Views

रोहा (महेंद्र मोरे) रोहे अष्टमी नगरपरिषदे मध्ये मागील विसवर्षे केंद्र व राज्यशासनाचे माध्यमातून कोट्यावधीचा निधी आला. यामधून रोहेकरांसाठी आवश्यक अश्या पायाभूत सुविधा निर्माण होत नियोजनबद्ध विकासाचे शहर म्हणून शहराची ओळख निर्माण होणे गरजेचे होते. मात्र आज शहरात विकासाच्या नावावर उभ्या राहिलेल्या इमारती भग्नावस्थेकडे जात असल्याचे दिसत आहे. याच शृंखलेतीलजुन्या तहसील कार्यालयाच्या मागे डोंगराच्या पायथ्याशी? उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राची इमारत आजही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत वापराविना धुळखात पडली आहे. मात्र या अश्या अनेक इमारती बांधण्यासाठी येणाऱ्या निधीतून मिळणारी टक्केवारी मधून नेते व बांधकाम करून ठेकेदार कार्यकर्ते मात्र मालामाल झाले आहेत. एकूणच राज्याच्या अग्निशमन सेवा अनुदानातुन बांधण्यात आलेले हे केंद्र रोहेकरांसाठी आपत्कालीन वेळी सेवा कशी देणार असा प्रश्न या भागातील एकूणच परिस्थिती पाहिल्यास जाणकारांना पडेल. मात्र लोकहिताच्या गप्पा मारणाऱ्यांनी विकासात केवळ आपले व आपल्या बगलबच्च्यांचे भले कसे होईल हाच दृष्टीकोण ठेवल्यामुळे रोहे अष्टमी शहरात आजही मूलभूत नागरी सुविधांची वानवा असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. येणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीत नागरिकांनीयाचा जाब राज्यकर्त्यांना विचारण्याचे धाडस केले तरच यापुढे होणारा शहराचा विकास भावी पिढिच्या दृष्टीने सोयीस्कर होईल.

रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या वतीने सार्वजनिक व खाजगी मालमत्तेस लागलेली आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविणे यासह अन्य नैसर्गिक आपत्ती काळात मदत मिळावी यासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र असावे यादृष्टीने अत्यावश्यक असे केंद्र उभारले आहे. राज्य शासनाच्या अग्निशमन सेवा या योजनेतून १५ मे २०१६ साली ही वास्तू जुन्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पा लगत ही वास्तू उभारण्यात आली आहे. आज ही इमारत पूर्णपणे उभारण्यात आली असून सद्यस्थितीत ती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत आहे. ही इमारत उभारण्यास किती निधी खर्च झाला याची माहिती मुख्याधिकारी यांचेसह संबंधित अधिकारी यांची भेट घेतली असता अशी इमारत शहरात असल्याची माहिती आपल्याला प्रथमच समजली असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. तर संबधीत अधिकारी वर्गाने हे बरेच जुने काम असल्यामुळे सर्व कागदपत्रे बघितल्यानंतरच माहिती देता येईल असे सांगितले. यावरून नगरपरिषदे मध्ये जनतेच्या पैशातून होणाऱ्या इमारती विकास बांधकामा बाबत प्रशासन किती जागृत आहे हे वास्तव समोर येत आहे. आज या संपूर्ण इमारती मध्ये फेरफटका मारला असला सर्व सुविधा असलेली ही इमारत वापरा विना धुळखात पडून असल्याचे दिसत आहे.

शहरात वा लगतच्या ग्रामीण भागात आग लागणे, नैसर्गिक आपत्ती वा अन्य कोणतीही घटना घडल्यास मदत व बचावासाठी एमआयडीसी, रिलायन्स, सुप्रीम, जे.एस.डब्ल्यु या कंपन्यांच्या अग्निशमन सेवेला मदतीसाठी बोलावण्यात येते. मात्र शासनाच्या लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले नगरपरिषदेचे अग्निशमन केंद्र हे फक्त दिखाव्यासाठीच असल्याचे समोर येत आहे. एकूणच विकासाच्या नावावर जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या वास्तु या जनतेच्या सेवेसाठी नसून फक्त राज्यकर्ते, ठेकेदार व त्यांच्या सोबत कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी उभारण्यात असल्याचे भग्नावस्थेत जात असलेल्या या अग्निशमन केंद्र इमारती वरुन दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.