रोहा कोलाड महामार्ग रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांची अनाठाई कत्तल, ठेकेदार सुसाट ? वनविभागाने पंचनामा करून कारवाई करण्याची मागणी

Share Now

157 Views

रोहा (राजेंद्र जाधव) कोलाड ते कोकबण रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शेकडो झाडांची आतापर्यंत कत्तल करण्यात आली. मुख्यत: रोहा ते कोलाड महामार्गावर वर्षानुवर्षे रुबाबाने डोलणारी हिरवीगार विस्तीर्ण झाडे उन्मळून टाकल्याने आधीच नागरिक नाराज झाले. मात्र रस्ता रुंदीकरणासाठी काही झाडे तोडणे गरजेचे आहे, ही मनाची समज केली असतानाच आता किल्ला ते पुढील कोलाड महामार्गावरील अडथळा नसलेली काही विस्तीर्ण झाडांची कत्तल सुरू केल्याने पुन्हा एकदा वृक्ष प्रेमींत संतापाची लाट उसळली आहे. संबंधीत ठेकेदार परवानगी नसलेली अनेक झाडे बेमालूम तोडत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी ठेकेदार व काही संबधीत अधिकारी क्रुरपणे झाडांची कत्तल करीत आलेत. अशोकनगरच्या पुढील भव्यदिव्य अडथळा नसणारी झाडेही आता अनाठाई तोडणार असल्याच्या शक्यतेने शुक्रवारी अनेक वृक्षप्रेमी नागरिकांनी वनविभाग, बांधकाम विभाग व पत्रकारांकडे तक्रारी केल्या. दुसरीकडे महामार्ग रुंदीकरणाच्या कामात अडथळा नसणारी झाडे ठेकेदार तोडत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. तरीही ठेकेदारावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, याउलट अडथळा नसलेली झाडे तोडण्याचीच परवानगी बांधकाम विभाग, वनविभागाने दिली की काय ? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, किल्ला ते पुढील रस्ता रुंदीकरण महामार्गासाठी अडथळा नसलेली झाडे खरंच तोडण्यात आलीत का ? याबाबतची पाहणी वन विभागाने करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे, तर प्रत्येक झाडाचा पंचनामा करून तोडण्याची परवानगी आम्ही घेतली आहे. संबधीत ठेकेदाराने परवानगी व्यतिरिक्त एखादे जरी झाड तोडले असेल तर वनविभागाने अवश्य कारवाई करावी अशी माहिती बांधकाम विभागाचे देवकाते यांनी दिल्याने अनाठाई झाडे तोडली गेलीत का याबाबत आता वनविभागाने स्पष्टीकरण करावे ? अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त झाली आहे.

कोलाड ते कोकबण रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ठेकेदारांनी अडथळा नसणाऱ्या अनेक झाडांची कत्तल केली. किल्ला गावाच्या पुढील भव्य विस्तीर्ण वड, पिंपळाची जंगली झाडेही सर्रास तोडली गेली. त्यातील काही झाडे रुंदीकरण रस्त्याच्या साईडपट्टी बाहेरील तोडल्याचे समोर आले. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संबधीत ठेकेदाराला धारेवर धरल्याचे वृत्त आहे. पण तू मारायचे, मी रडायचे सोंग करतो असेच संगनमत ठेकेदार व काही अधिकाऱ्यांत झाल्याचा आरोप होत असतानाच शुक्रवारी काही वृक्ष प्रेमींना साईडपट्टीच्या बाहेरील विस्तीर्ण झाडे तोडली जात असल्याचा आक्षेप घेतला. अडथळा नसणारी भली मोठी झाडेही तोडली जात असल्याने संताप व्यक्त केला. मूळात किल्ला गावाच्या पुढील रस्ता रुंदीकरणाला अडथळा नसणारी झाडे तोडली गेलीत, अशा अनेक तक्रारी वन विभागाकडे आधीच आल्या आहेत. अडथळा नसणारी झाडे तोडण्याला अधिकारी जबाबदार आहेत, त्यातच अडथळा नसणारी झाडे तोडली गेलीत, हा काहींचा आक्षेप संशयास्पद ठरला. त्या संधीचा अधिक फायदा संबधीत ठेकेदाराने घेतल्याचे शुक्रवारी समोर आले. याबाबत सोशल मीडियावर संबधीत ठेकेदार, वनविभाग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्य कसूर वृत्तीचा समाचार घेताच चोहोबाजूने चर्चेला उधाण आले. अडथळा नसणारी झाडे खरंच तोडण्यात आली का, यावर अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावेत अशी मागणी झाली. त्यावर उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी रात्रौ उशिरा टाइम्सजवळ संपर्क साधला. झाडे तोडण्याची आम्ही परवानगी दिली आहे, आता अडथळा नसणारी कोणती झाडे तोडली गेलीत, हे पाहण्याचे, तक्रार करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे, तशी तक्रार आल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करू अशी प्रतिक्रिया निकत यांनी दिली. तर परवानगी शिवाय झाडे तोडली गेलेली नाहीत, प्रत्येक झाडाचा पंचनामा करून झाडे तोडली गेलीत, अनाठाई झाडे तोडली गेली असतील तर संबधीत ठेकेदारावर खुशाल कारवाई करा, अशी अधिक माहिती रोहा बांधकाम विभागाचे उपअभियंता देवकाते यांनी दिली. दरम्यान, किल्ला गावाच्या पुढील काही झाडांची अनाठाई कत्तल करण्यात आली आहे, या तक्रारींची दखल घेत वनविभागाने पाहणी करून तातडीने पंचनामा करावा, घटनेबाबत स्पष्टीकरण करावे, पुढील विस्तीर्ण झाडे कशी वाचतील, याचा विचार करावा अशी मागणी नव्याने वृक्षप्रेमींनी केल्याने रोहा वनविभाग कितपत गांभीर्याने दखल घेतो, त्यावर वृक्ष प्रेमी काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.