लाच घेताना वीज कनिष्ठ अभियंता ताब्यात, रायगडात लाचखोरीची मालिका सुरूच, पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, सामान्य अक्षरश: हैराण

Share Now

1,230 Views

रोहा (राजेंद्र जाधव) देश राज्यात सर्वत्रच दिवसेंदिवस भ्रष्टाचार उफाळून येत आहे. मुख्यत: शासकीय लाचखोरांवर कोणाचेच अंकुश राहिले नाही. उलट अंकुश ठेवणाऱ्यांचेच हात बरबटले आहेत. याला औद्योगिक रायगड जिल्हा कसा अपवाद राहील. जिल्ह्याच्या विविध शासकीय विभागात लाच घेण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. भूमी अभिलेख, महसूल विभाग, निबंधक कार्यालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी लाच घेताना जाळ्यात अडकले. दुसरीकडे घर, इमारतींना नाहरकत यांसह बांधकाम परवानगी देणारे टाऊन प्लॅनिंग (नगररचना विभाग) विविध परवानगींसाठी विकासक, सामान्यांना चांगलेच पिडत आहे. सर्व देणेघेणी करूनही परवानग्या मिळत नाहीत, हा संताप सामान्यांत असतानाच लाचखोरीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्याच लाचखोरी मालिकेत सोमवारी लाच घेणाऱ्या वीज वितरण कनिष्ठ अभियंताची भर पडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. घराचा खंडित केलेला विजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लाच घेणाऱ्या रोहा वीज वितरणाचे कनिष्ठ अभियंता ओम विश्वनाथ शिंदे याला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सोमवारी ताब्यात घेतले. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक केली, तरीही लाच घेण्याच्या प्रकारात अधिकच वाढ सुरू आहे. तर नगररचनासारखे महत्वाचा विभाग देण्याघेण्यात आघाडीवर असूनही, व्यवसायिक, सामान्यांना वेठीस धरूनही कायम सहीसलामत राहीले आहे, हेही आता सततच्या वाढत्या लाचखोरी प्रकरानंतर आश्चर्य व्यक्त झाले आहे.

रायगड जिल्ह्यात अलिकडे प्रशासकीय लाचखोर प्रकरणात मोठी वाढ झाली. एकापाठोपाठ एक अधिकारी, कर्मचारी लाच घेताना जाळ्यात अडकले. लाचखोरीच्या अनेक घटना ताज्या असतानाच वीज वितरण विभागाच्या मुरुड उपविभाग रोहा हद्दीतील कोकबन येथे कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता ओम शिंदे याला घराचे खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी १५ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदार यांच्या राहत्या घराचे खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ओम शिंदे यांनी २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती १५ हजार रुपये लाच घेताना ओम शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांनी सापळा लावून रंगेहात पकडले आणि रायगड जिल्ह्यात लाचखोरी किती वाढली आहे हे समोर आले आहे. सदर घटनेची रोहा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. लाचलुचपत परिक्षेत्र ठाणे विभागाचे पो.अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, वीज वितरण विभागाच्या कनिष्ठ अभियंता याला लाच घेताना अटक केल्याने रोहा प्रशासकीय विभागातील किती अधिकारी, कर्मचारी अजून लाच घेताना जाळ्यात अडकतील असा सवाल उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *