आंबेवाडी ते निवी कालव्याची अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमवेत केली पाहणी, तांत्रिक दुरुस्तीला येणार वेग ?

Share Now

61 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा मुख्यतः सबंध जिल्ह्यात गाजत असलेला आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचे सूतोवाच सोमवारी मिळाले. यांत्रिकी पद्धतीने कालव्याची साफसफाई किल्ला, बारसोली हद्दीपर्यंत करण्यात आली. बारसोली गावाच्या पुढे अनेक अडथळे आ वासून उभे आहेत. संभे, किल्ला, लांढर सायपान दुरुस्तीचे प्रश्न अद्याप गंभीर आहे. धाटाव ग्रामपंचात हद्दीतील जुन्या निकामी मोऱ्या दुरुस्ती व पाडून नव्याने बांधकामाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. या सर्व अनुषंगाने सोमवारी सायंकाळी पाटबंधारे उपविभागाचे अभियंता एस एस महामुनी, उपअभियंता गोरेगावकर यांनी धाटाव हद्दीपासून अखेरच्या निवी गावापर्यंतचा कालव्याची पाहणी केली. यावेळी कालवा समन्वय समितीचे मारुती फाटक, सागर भगत, राकेश बामुगडे, राजेंद्र जाधव, प्रमोद गायकवाड, नितेश बामुगडे, जितेंद्र जाधव उपस्थित होते.

कालव्याच्या पाण्याला अडथळा ठरणाऱ्या मोऱ्या, ड्रेनेज, दुतर्फा विस्तारलेली झाडी, कचरा, भराव व अन्य अडचणींची पाहणी केली. त्यात यशवंत धाटाव ग्रामपंचायत हद्दीतील बारसोली गावचा ड्रेनेज पूर्णतः कालव्यात आले आहे, याकडे स्वच्छता दृष्टीने ग्रामपंचायतीने कधीच पाहिले नाही. कालव्याच्या पाण्याचे हाच मुख्य अडथळा दूर करण्यावर उपाययोजनांची चर्चा करण्यात आली. त्या पुढील जीर्ण मोरी काढून पाण्याला मार्ग देण्याचे ठरेल. लांढर हद्दीतील कालव्याच्या बंधारा दुरुस्ती, निवी हद्दीतील कालवा दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन संबधीत अधिकाऱ्यांनी दिले. सायपन, मोऱ्या तांत्रिक दुरुस्तीला अधिक वेग येणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. कालव्याच्या कामासाठीचे ठेकेदार एकदोन दिवसातच तांत्रिक यांत्रिक कामाचा प्रारंभ करतील असा विश्वास अभियंता महामुनी यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिला. पुढील एक महिन्यात काम पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, अडथळे दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी अपेक्षाही महामुनी यांनी व्यक्त केली. बारसोली ते निवी कालव्याच्या अखेरच्या हद्दीपर्यंत अधिकारी यांनी ग्रामस्थांसमवेत भेट दिली. दरम्यान, कालव्याच्या पाण्यासाठीचे अडथळे दूर करण्यासाठी त्या त्या गावाच्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, कालव्याला पाणी आणून विभाग पूर्वीसारखे सुजलाम सुफलाम करून घ्यावे असे आवाहन समन्वय समितीने केले आहे. तर वाशी गावाच्या पुढील धाटाव हद्दीतील एका फार्म हाऊसच्या श्रीमंत मालकाला चुकीच्या पद्धतीने मोरे टाकल्याबद्दल नोटीस पाठविण्याची सूचना समन्वय समितीने केली. त्यामुळे धाटाव येथील त्या गडगंज उद्योजकावर पाटबंधारे प्रशासन नेमकी काय कारवाई करतो ? हे समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.