रोहा तहसिलदारांचा तळाघर पाणीप्रश्नावर यशस्वी तोडगा

Share Now

339 Views

रोहा (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील शहर व धाटाव औद्योगिक वसाहत लगतच असणाऱ्या तळाघर गावातील वैशाली नगर बौद्धवाडी येथील नागरिकांना गेली १३ वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सहन करावी लागत होती. यासाठी येथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ९ महिन्यापूर्वी रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढत धडक देत आपल्या जिवनावश्यक अश्या मूलभूत समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न कायमचा निकाली लावण्यासाठी सर्व संबधित यंत्रणा कामास लागली आहे. यादरम्यान येथील नागरिकांच्या सोयीसाठी एमआयडीसी चे पाणी विहिरीत सोडून पाइपलाईन द्वारे वैशाली नगर मधील नागरिकांना देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हे विहिरीतून येणारे पाणी गढूळ, दूषित व दुर्घंधि युक्त असल्याची नागरिकांची तक्रार मांडण्यासाठी सोमवार २४ जानेवारी रोजी सर्व नागरिक रोहा तहसील कार्यालयात आले होते. तळाघर गावाप्रमाणे आम्हासही एमआय डी सी पाईपलाईनचे पाणी थेट द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली. यावर रोहा तहसिलदारानी नागरिकांच्या भावना जाणून घेत सर्व गावाप्रमाणे वैशाली नगर मधील नागरिकानाही एमआयडीसी चे देण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा व ग्रामसेवक यांना दिल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेत रोहा तहसिलदार कविता जाधव यांनी प्रजासत्ताकदिनाच्या पुर्वसंधेला यशस्वी तोडगा काढल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

रोहा तालुक्यातील तळाघर ग्रामपंचायत मध्ये जुनी व जीर्ण होत चाललेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. याचा सर्वाधीक मनस्ताप गावालगत असणाऱ्या वैशाली नगर या भागातील नागरिकांना सहन करावा लागत होता. त्यांच्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावरून रात्री अपरात्री त्यांना दोन हंडे पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.आपल्या मूलभूत सुविधेसाठी येथील नागरिक ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर पत्रव्यवहार करत आम्हाला आमच्या हक्काचे पुरेसे पाणी द्यावे अशी मागणी करत होते. मात्र त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे अखेर लोकशाही मार्गाने येथील नागरिकांनी रोहा तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनापर्यत आपला आवाज पोहोचवला. त्यानंतर रोहा तहसीलदार यांनी तातडीने जलजिवन मिशन अंतर्गत तळाघर येथे नवीन पाणीपुरवठा योजना उभारण्याच्या सुचना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार आता या ठिकाणी २२ लाख रुपये खर्चाची योजना राबविण्यात येणार आहे. आता ही योजना अंतिम टप्यात असून शासकीय नियमांनुसार होणारी प्रक्रिया पार पडल्यानंतर लवकरच ती मार्गी लागणार आहे. मात्र यादरम्यान येथील नागरिकांना जे पाणी मिळत होते ते गावातील विहिरीतून येत असल्यामुळे ते दूषित व दुर्घंधियुक्त असल्याचा आरोप नागरिकांचा होता. आपली ही व्यथा मांडण्यासाठी येथील ग्रामस्थ रोहा तहसील कार्यालयात आले असता तहसीलदार यांसह रोहा गटविकास अधिकारी सुभदा पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे, कनिष्ठ अभियंता जुई माळी, विस्तार अधिकारी एस. एन. गायकवाड तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या बैठकीत तळाघर वैशाली नगर येथील विहिरिच्य पाण्याची जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत प्रयोग शाळे द्वारे तपासणी ग्रामस्थ व सदस्य यांचे समक्ष करण्याच्या सुचना देत त्यानंतर येणाऱ्या निष्कर्षानंतर विहिरीतून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेत एमआयडीसी च्या लाईनचे द्वारे येथील वैशाली नगर मधील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना करण्याचे आदेश रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी ग्रामपंचायत प्रशासनास दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *