रोहा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी मुख्यतः सर्वच तटकरेंच्या राजकारणाला भरभक्कम पाठबळ देणाऱ्या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती कायम तहानलेल्या आहेत. प्रामुख्याने तळाघर, वाशी ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता असतानाही गावे तहानलेली दिसावीत याचे आश्चर्य आहे. दुसरीकडे विहिरी, बोअरवेल पुनर्जीवित कालव्याचे स्त्रोत तब्बल दहाबारा वर्षे मृत राहिले. कालव्याला पाणी नसल्याने स्वच्छता, गुरेढोरे पशुपक्षी, व्यवसायिक अक्षरशः रडकूंडीला आले. तरीही कालव्याला पाणी सोडण्याचे ठोस प्रयत्न झाले नाहीत. आता ग्रामस्थांच्या उठावानंतर कालव्याला पाणी येण्याच्या प्रतीक्षेत वाशी ग्रामपंचायत हद्दीतील लांढर गावालाही पाण्याच्या भीषण झळा बसल्याचे भयान वास्तव समोर आले. वर्षानुवर्षे तळाघर तहानलेला आहे. त्यात लांढर गावाची भर पडल्याने आमदार, खासदार, सर्वच लोकप्रतिनिधी आहेत कुठे ? असा सवाल आता चोहोबाजूने सुरू झाला आहे. तळाघर ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध वाडीतील बांधवांनी पाण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर पाण्याचा अशंत: डोस दिला असल्याना लांढर गावालाही तब्बल आठवडाभर पाण्याच्या चांगल्याच झळा जाणवल्या. मात्र लांढरच्या ग्रामस्थांनी सालाबादप्रमाणे यावेळीही युक्ती वापरात आणली. लोकवर्गणीतून पारंपारिक कारीवणेतून पाणी आणण्यात ग्रामस्थांना यश आले. आपल्या पाण्याचा प्रश्न आपणच सोडवला पाहिजे हा कित्ता ग्रामस्थांनी पुन्हा गिरवला. अशात वर्षानुवर्ष पाठबळ देणाऱ्या गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आले हेच अधोरेखित झाले. दरम्यान लांढर गावासाठी मंजूर जलजीवन मिशन योजना वनविभागाच्या जागेत अडकली. योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आता हीच जलजीवन मिशन योजना लांढर ग्रामस्थांसाठी कितपत लाभदायक ठरते ? हे पाहावे लागणार आहे. तर पाण्यासाठी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीचा उपाय कामी आल्याने ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक झाले आहे.
रोहा तालुक्यातील अनेक गावांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवते. त्यात तळाघर ग्रामपंचायत कायम आघाडीवर राहिली. मोठी लोकसंख्या असलेल्या तळाघर ग्रामस्थांचा पाण्यासाठी दरवर्षी आणीबाणी संघर्ष असतो. त्यात कालव्याला दहाबारा वर्षे पाणी नाही. त्यामुळे विभागाला अक्षरशः वाळवंटाचे स्वरूप येते. पाणी नसल्याने शेकडो झाडांनी माना टाकल्या, गुरेढोरे, स्वच्छता प्रश्न गंभीर बनला. शेतकरी व पूरक पोल्ट्री, भाजी व्यावसायिक कायम रडकुंडीला आले. पण कालव्याच्या पाण्यासाठी ठोस प्रयत्न झाले नाहीत. कालव्याच्या पाण्याने बोअरवेल ,विहिरी स्त्रोत जीवंत राहत असे. मात्र कालव्याला पाणी नसल्याने तळाघर, वाशी ग्रामपंचायत हद्दीतील गावांना मोठा फटका बसत आहे. त्यातच पाण्यासाठी तळाघर बौद्ध वाडीतील ग्रामस्थांनी दोनदा तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. लोकप्रतिनिधींचा चांगलाच उदो उदो केला, ही घटना ताजी असतानाच लांढर गावालाही आठवडाभर पाण्याचा चांगलाच फटका बसला. अखेर ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून कारीवणेचा पूर्वपार पाणी मिळवण्यात यश आणले. अनेक ठिकाणी पाईप जोडणी केली. आता गावासाठी पाणी पूर्ववत केले आहे. हा ग्रामस्थांच्या एकीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया अध्यक्ष तुकाराम भगत यांनी दिली. तर जलजीवन मिशन योजनेचे काम संबंधीत ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले, योजना अडकली आहे. असा आरोप तुकाराम भगत यांनी केला. यावर योजनेचे काम निकृष्ट नाही, वनविभागाच्या अडथळ्याने थांबले आहे. त्यावर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे अशी माहिती अभियंता माळी यांनी दिली. मात्र जलजीवन मिशन योजनेचे काम रखडल्याचा फटका लांढर गावाला चांगलाच बसला. त्या अडचणीवर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मातही केली. याच वास्तवात विभागीय ग्रामस्थांना लोकप्रतिनिधी पाणी देण्यात अशंत: अपयशी ठरले, यावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान ,कालव्याला पाणी येण्याच्या प्रक्रियेत कोणीच अडथळा आणू नयेत, कालव्याच्या पाण्याने विहिरी, बोअरवेल जिवंत होतील, पिण्याच्या पाण्यावरील भार कमी होईल. स्वच्छता, गुरढोरे, पशुपक्षी, झाडे, पूरक शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, विभाग पूर्वीसारखा सुजलाम सुफलाम होईल यासाठी कालव्याच्या पाण्याचे स्वागत करू या, हेच जलमिशन पाणी टंचाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. तर पाणी टंचाई वाढत्या समस्यांतून लोकप्रतिनिधी आहेत कुठे ? असा रास्त सवाल पुन्हा नव्याने उपस्थित झाला आहे.