भुवनेश्वर झोपडपट्टी रस्त्याला मुहूर्त कधी ? खतरोंका सामना.., नागरिक अक्षरशः वैतागले !

Share Now

409 Views

रोहा (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या वरसे ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. विविध विकासकामांसाठी नेहमीच करोडोंचा निधी आला. पण त्यांचा विनियोग नीटनेटके कधीच होत नाही याची ख्याती असलेल्या वरसे ग्रामपंचायतमधील बहुचर्चित भुवनेश्वर गणेशनगर रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळणार कधी ? असा नाराजी सवाल पुन्हा उपस्थित झाला. भुवनेश्वर निरलॉन कॉलनी मार्गे रस्ता व भुवनेश्वर गणेशनगर झोपडपट्टीचा रस्ता दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत आहे. रस्त्यावरून ये जा करत खतरोंका सामना करावा लागतो. जागोजागी भलेमोठे खड्डे, वर आलेली खडी, अतिक्रमणात अडकलेली साईटपट्टी, मधीच डेंजर झोन गतिरोधकांशी रोजचा सामना करताना निवी, तळाघर, बोरघर, लांढर गावांतील नागरिक अक्षरशः वैतागलेत. दोन्ही मार्गाच्या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळणार कधी ? याचे ठोस स्पष्टीकरण वरसे ग्रामपंचायत प्रशासनाने करावे अशी मागणी पुन्हा नव्याने नागरिकांतून झाली आहे.

वरसे ग्रामपंचायत हद्दीतील काही रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण करण्यात आले. मात्र संबंधीत ठेकेदारांने केलेले रस्ते काही दिवसांतच उखडले. एवढेच काय ? आ. अनिकेत तटकरेंनी उद्घाटन केलेला रस्ता कधी खड्ड्यात गेला, हे खुद्द ग्रामपंचायतीलाही कळले नाही. निकृष्ट दर्जाचे रस्ते करण्यात आल्याने संबंधीत ठेकेदारांचे बिले थांबविण्यात
आली. याच खराब रस्त्यांची दखल घेत खुद्द खा. सुनील तटकरे यांनी सदर ठेकेदाराला तंबी दिली. याच कारणाने स्थानिक ग्रामस्थांनी भुवनेश्वर मार्गातील दोन्ही रस्त्यांची कामे संबंधीत ठेकेदाराला देऊ नयेत असा पवित्रा घेतला आणि निधी प्रक्रीया रखडल्याने रस्ता जैसे थे खड्डामय राहीले. आता वर्ष उलटूनही रस्त्याचे काम न झाल्याने निवी, तळाघर भागातील नागरिकांना दररोज खतरोंका सामना करावा लागत आहे. उपसरपंच मृणाली शिवलकर यांच्या घरापासून दोन्ही मार्गाचे रस्ते प्रचंड धोकादायक झालेत. याच रस्त्याने लोकप्रतिनिधी व नागरिक सततची ये जा करतात. आता रस्त्यात भले मोठे खड्डे, रस्त्याची जुनी खडी वर डोकावत आहे. साईटपट्ट्या अनेकांनी व काही सदस्यांनी टिळकृंत केल्या, याकडे वरसे ग्रामपंचायत प्रशासन कधीच लक्ष देत नाही .उलट झोपडपट्टी रस्त्यावरच्या दुतर्फा विविध साहित्य ठेवल्याने रहदारी नागरिकांना मोठ्या मुश्किलीने मार्ग काढावा लागतो. काही रहिवासीना सूट दिल्याने त्यांच्या जास्तीचा फायदा सामान्य नागरिकांना नरकयातना देत आहे. याच भयानक वास्तवात भुवनेश्वर मार्गाचे दोन्ही रस्ते होणार कधी, दुतर्फातील त्रासदायक अतिक्रमण हटवणार कधी ? असा सवाल पुन्हा नव्याने उपस्थित झाला. दरम्यान ,दोन्ही रस्ते होणे अपेक्षित आहे. नागरिकांना प्रचंड त्रास होतो. याची कल्पना आहे. रस्ते होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अडचणीही दूर होतील अशा प्रतिक्रियाचा तोडगा सरपंच नरेश पाटील यांनी पुन्हा दिला. आता भुनेश्वर मार्गातील दोन्ही रस्त्यांच्या कामांना मुहूर्त नेमका कधी मिळतो. निवी तळाघर विभागीय नागरिक खराब खतरोंका सामना रस्त्याबाबत नेमका काय पवित्रा घेतात ? हे लवकरच समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *