रोहा आगारात शिवशाही गाडी नाहीच, लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी चांगल्या गाड्यांची आवश्यकता

Share Now

167 Views

रोहा -( महेंद्र मोरे ) रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राज्य परिवहन महामंडळचे रोहा आगार हे दुर्लक्षितच असल्याने प्रवाशांना विविध समस्या येथे भेडसावत आहे. राज्य परिवहन महामंडळाने रोहा आगारातील विविध समस्याकडे लक्ष घातल्यास आज तोट्यात चाललेला रोहा आगाराचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. रोहा आगारात आज ५० गाड्या उपलब्ध असून या ५० गाड्यांच्या माध्यमातून सरासरी ३६२ फेऱ्या होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ५० गाड्यात एकही शिवशाही गाडी रोहेकरांसाठी उपलब्ध नाही.या ५० गळ्यात फक्त ९ गाड्या निमआराम आहेत.आजही लांब पल्ल्याच्या गाड्या या साध्या गाडयाच असल्याने प्रवास करताना नागरिकांची गैरसोय होत आहे. रोहा आगारात सद्यस्थितीत ६३ चालक व ५८ वाहक मेहनतीने व चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत.यांनाही लांब पल्ल्याच्या प्रवास करताना दमछक होताना दिसत आहे.

रोहा आगारातून मुंबई, ठाणे, पुणे, मुरुड, अलिबाग, माणगाव, महाड या सह पश्चिम महाराष्ट्रात गाड्या सोडल्या जात आहेत. यामध्ये तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूर, सिल्लोड आदी ठिकाणी गाड्या सोडण्यात येत आहेत. या गाड्या चांगल्या शिवशाही अथवा सोय उपयुक्त गाड्या उपलब्ध झाल्यास या मार्गावर प्रवासी वाढण्याची शक्यता आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रोहा हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण समजले जाते. येथूनच मुरुड, पाली, अलिबाग आदी पर्यटनासाठी नागरिकांना जाण्यासाठी सोयीचे ठिकाण आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्य महामंडळाने योग्य नियोजन केल्यास रोहा आगारचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल. रोहा आगार तोटयात असून गेल्या महिन्यात रोहा आगाराला १ लाख 48 हजाराचा तोटा झाला आहे.

कोकणातील खाजगीकरणातून बांधण्यात आलेल्या सुसज्जाच्या बस स्थानकापैकी रोहा हे एक बस स्थानक आहे. चांगली इमारत रोहा बस स्थानकाची असून या बस स्थानकाच्या डागडुजीकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याच्या दिसून येत आहे. बस स्थानकात आज मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे भरण्याची आवश्यकता आहे. या बस स्थानकाचे छत पावसाळ्यात गळत असल्याचे दिसून येते. इमारतीला रंग रंगोटी करण्याची आवश्यकता आहे. या संबंधित अगर प्रमुख सोफिया मुल्ला यांच्याकडून माहिती घेतल्या असता आपण रोहा बस स्थानकातील खड्डे व अन्य सुविधांसाठी पाठपुरावा करून काम मंजुरी कडे पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहा आगारातून रोहा भालगाव मार्गे मुरुड, रोहा सुपेगाव मार्गे मुरुड, रोहा साळव मार्गे मुरुड, रोहा तळा, रोहा रेवदंडा मार्गे अलिबाग, रोहा रामराज मार्गे अलिबाग, रोहा सुतारवाडी आदीकडे जाणाऱ्या मार्गावर ग्रामीण भाग येतो. त्यामुळे यावर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रवासी एसटीतून प्रवास करीत असतात. शासकीय नोकरदारासह विद्यार्थ्यांचीही प्रवासी संख्या मोठी आहे. या सर्व प्रवासी संख्याची उत्पनकडे वाटचाल करण्यासाठी रोहा आगाराला नियोजन करण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाचे म्हणजे लांब पल्ल्यासाठी चांगल्या गाड्या उपलब्ध करून राज्य परिवहन महामंडळानी देण्याची आवश्यकता आहे तरच रोहा आगार तोट्यातून नफ्यात येईल.

रोहा बस स्थानकातुन खैरे रोहा ठाणे बोरीवली ही गाडी बरेच वर्ष चालु असलेली गाडी बंद करण्यात आली आहे ती चालु करण्याची मागणी प्रवाशी वर्गातुन होत. पुर्वी रोहा कर्जत ही गाडी चालु होती ती चालु केल्यास रोहेकरांना फायद्याची ठरेल. रोहा ठाणे गाडी चालु करण्यात यावी अशी मागणी होत आहे. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून सुट्टीच्या हंगामात राज्यातील पर्यटन व धार्मिक स्थळ पर्यंत विशेष नियोजन केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *