रोहा (प्रतिनिधी) रोहा शहर यांसह कोलाड, नागोठणे चणेरा सर्वच ग्रामीण विभागात गावठी हातभट्टी विक्रीने अक्षरशः डोके वर काढले. रोहा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर व धाटाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी विक्रीला चांगलेच ऊत आले. याच हातभट्टीच्या व्यसनाने प्रौढ, तरुण पिढी देशोधडीला लागली आहे. हीच विषारी हातभट्टी अशांत रोखण्यात पोलीस मुख्यतः नावपुरते असलेल्या उत्पादन शुल्क विभागाला यश कधी येईल, असा सवाल सलाम रायगडरने केला होता. अखेर याच वृत्ताची दखल घेत बुधवारी चणेरा विभागातील दिव, कोपरी, न्हावे ग्रामीण भागात विक्रीसाठी तयार झालेली बेवारस स्थितीतील सुमारे १८०० लिटर गूळ मिश्रित रसायन उध्वस्त करण्यात रोहा पोलिसांना यश आले. दरम्यान रोहा पोलीसांनी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी उद्ध्वस्त करण्याची धडक कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तर अद्यापही रोहा तालुक्यातील प्रामुख्याने धाटाव ,चणेरा, नागोठणे, कोलाड विभागात हातभट्टीचा झिंगाट कायम आहे. वाढत्या हातभट्टी उत्पादन व विक्रीवर कारवाई करण्यात पोलीस मुख्यतः उत्पादन शुल्क विभाग पोलिसांना कितपत अधिक यश येते हे समोर येणार आहे.
रोहा तालुका दारूकांडातून मुख्यतः रोहा उत्पादन शुल्क विभाग प्रशासनने काहीच बोध घेतलेला नाही. हेच उत्पादन शुल्क विभाग हातभट्टीवर लुटूपुतूची कारवाई करण्यात नेहमीच आघाडीवर राहिले. त्यामुळे पोलीस ठाणे हद्द व धाटाव पोलीस ठाणे हद्दीत हातभट्टीची विक्री बेधडक सुरू असल्याचे सलाम रायगडने समोर आणले. अखेर सामाजिक स्वास्थ धोक्यात येण्याच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई केली. चणेरा विभागातील दिव, कोपरी, न्हावे खाडी पट्टयात बेवारस स्थितीतील तब्बल १८०० लिटर हातभट्टीसाठी तयार असलेले गूळ मिश्रित रसायन अंदाजे ३५ हजार किमतींचे साहित्य नष्ट करण्यात रोहा पोलिसांना यश आले. पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी काजरोळकर, पोलीस हवालदार गदमले, पोलीस नाईक पाटील यांनी धडक कारवाईत सहभाग घेतला. याच हातभट्टी उद्ध्वस्त कारवाईनंतर उत्पादन शुल्क विभाग आहे कुठे, त्यांना धाटाव, कोलाड विभागातील हातभट्टी विक्री अड्डे माहित नाही का ? असा सवाल पुन्हा एकदा चोहोबाजूने सुरू झाला. ग्रामीणात हातभट्टीचे उत्पादीत माल शहर व अन्य ठिकाणी वितरित होते. नागोठणे, चणेरा, कोलाड मुख्यत: धाटाव विभागात हातभट्टीची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हातभट्टीने तरुण पिढी अक्षरशः बरबाद आहे, हातभट्टीला रोखणार कोण ? याच सलाम रायगडच्या वृत्ताची अखेर रोहा पोलिसांनी दखल घेत बुधवारी हातभट्टी उध्वस्त करण्याची दमदार कामगिरी केली. पोलिसांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक झाले आहे. मात्र शहर, ग्रामीणात हातभट्टी प्रचंड जोशात आली आहे, झिंगाट चांगलेच वाढले, अशात उत्पादन शुल्क विभाग कारवाई का करत नाही, उत्पादन शुल्क विभाग आतातरी भानावर येईल का ? हे पाहावे लागणार आहे.