वावे पोटगे जंगल भागात आढळला महिलेचा मृतदेह, ओढणीने गळा आवळल्याचे समोर, एकच खळबळ !

Share Now

234 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा अलिबाग मार्गावरील वावे
पोटगे गावाच्या हद्दीतील बंद दगड खाणी जवळील जंगल भागात मंगळवारी रात्रौ एका अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. अंगात लाल रंगाचा कुर्ता त्यावर चौकटी आकाराची नक्षी, काळे रंगाचे लेगीज, गळ्या भोवती काळे रंगाची त्यावर सफेद रंगाचे स्टारची नक्षी असलेली ओढणी पेहरावाच्या महिलेचे वय अंदाजे २९ ते ३० असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वावे पोटगे जंगल भागात कोणालाही दिसू नयेत अशा झाडी झुडपात कोणीतरी अज्ञात इसमाने संबंधीत अनोळखी महिलेचा ओढणीच्या सहाय्याने गळया भोवती फास आवळून जीवे ठार मारण्याचा प्राथमिक प्रकार समोर दिसत आहे. याच अनुषंगाने अज्ञात आरोपीविरोधात रोहा पोलीस ठाण्यात ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी भेट दिली. अधिक तपास रोहा पोलीस करीत आहे. दरम्यान, मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही, त्यामुळे परिसरात अधिकच घबराट पसरली, तर संबधीत महिला हिची हत्या करून निर्जन स्थळी विल्हेवाट लावली, त्यामागे नेमके कारण काय ? याचा शोध घेणे रोहा पोलिसांसमोर मोठे आव्हान राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *