श्रीवर्धनच्या मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्त मंदिरांची स्वच्छता, म्हसळा मुस्लिम संघटना एकवटले

Share Now

1,219 Views

दिघी (गणेश प्रभाळे) सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना रायगड जिल्ह्यातील सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे. यावेळी मानवतेच्या धर्माचं पालन करू, या भावनेने श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यातील जमियेते उलमा हिंद मुस्लिम संघटने तर्फे पूरग्रस्तांना अन्न, वस्त्र व उपयोगी वस्तूसह तेथील सार्वजनिक ठिकाणे व मंदिराची स्वच्छता करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने तयार झालेल्या महापुराच्या स्थितीला सद्या स्वच्छता व मदतीची गरज आहे. पूर ओसरला तरी गावोगाव पूर्वपदावर येण्यास तितकीच मदत मिळणे महत्वाचे आहे. बहुतांश सार्वजनिक ठिकाण, मंदीरे व घरांमध्ये कचरा आणि घाण साचलेली आहे. याच विचाराने त्या ठिकाणी मदत व स्वच्छतेसाठी जमियेते उलमा हिंद व अंजुमने दर्दमंदान या म्हसळा-श्रीवर्धन विभागातील संघटनासह दोन तालुक्यातील अनेक मुस्लिम जमातीने संघटीत होऊन दहा लाख रु. रक्कम जमा केली. या रक्कमेतून पूरग्रस्तांना अन्न, वस्त्र व उपयोगी वस्तूरुपी मदत देण्यासाठी संघटना चार दिवसासाठी तारीख 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी श्रीवर्धनहुन रवाना झाली.

या संघटनेतील जमियेते उलमा हिंद संघटनेचे उपाध्यक्ष मौलाना अमनुल्लाह बुरूड, तसेच श्रीवर्धन विभागाचे तालुका अध्यक्ष काजी मोहम्मद हुसेन माहीमकर, मुफ्ती म्हामूद मोमीन, मौलाना मलिक कोतवाल, मौलाना रिहान करदमे, मौलाना हाकीम काळोखे व रिजवान चिविलकर यांनी पुढाकार घेऊन कोल्हापूर-सांगली परिसरातील अरवाळ, गोरवाळ, हुपरी, गोकाक या गावांना भेटी दिल्या. तेथील परिस्थिती पाहता अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने तेथील मंदिरे ही पाण्याखाली आल्याने मंदिरातील मुर्तीं व परिसर खूप माती जमल्याने मळकट दिसत होते. नैसर्गिक आपत्तीत सर्व धर्म विसरून माणुसकी हा एकमेव धर्म जगात आहे याचा विचार करून या माणुसकीच्या माध्यमातून मंदिरातील मुर्तींसह तेथील मळकट झालेलं परिसर स्वच्छ करण्यात आला.

श्रीवर्धन मुस्लिम संघटना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे आले व ही मदत थेट कोल्हापूर-सांगली अशा ठिकाणी जाऊन टेम्पोद्वारे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य व कपडे अशी वस्तूंच्या स्वरूपात चार दिवस मुक्काम करत करण्यात आली. जमियेते उलमा श्रीवर्धन विभागाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना उत्स्फूर्तपणे मदतीचा हात देऊन सर्व धर्म स्वभावाचा व एकोप्याचा संदेश दिल्याने त्यांचे सर्वोतोपरी कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *