रोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहर मुख्यतः ग्रामीणात अनेक वर्षे सत्तास्थानी असलेले तटकरे आजही अनेक गावांना पाणी पाजण्यात अक्षरशः अपयशी ठरल्याचे वास्तव ठळक आहे. एवढा विकास केला, तेवढा केला असे म्हणणाऱ्या तटकरेंच्या हक्काच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील वाशी, तळाघर ग्रामपंचायती अनेक वर्षे तहानलेल्या आहेत हे कधीच लपून राहिले नाही. लांढर, बोरघर, तळाघर गावांना दरवर्षी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे तर लांढर गाव पुन्हा काही दिवसांपासून पाण्यासाठी प्रचंड व्याकूळ झाला. महत्त्वाच्या पाण्यासाठीची दखल ग्रामपंचायत, विभागीय नेतेगण किंबहुना सबकुछ तटकरे कोणीच घेत नसल्याने महिला वर्षाने प्रचंड संताप व्यक्त केला. त्यातच स्थानिक पुढारी रोहा शहर मुक्कामी झालेत, त्यामुळे त्यांना पाण्याची झळ बसत नाही. दुसरीकडे लांढर ग्रामस्थ सातत्याने श्रमदानातून पाण्यासाठी प्रयत्न करत आलेत हे भयानक चित्र समोर आल्याने आतातरी आमदार, खासदार तटकरे तळाघर, वाशी तहानलेल्या ग्रामपंचायतीकडे गांभीर्याने लक्ष घालतील का ? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, आज कालव्याला पाणी असते तर विहिरी, बोअरवेल जिवंत असत्या, स्वच्छतेसाठी कालव्याच्या पाण्याचा आधार असता, पण कालव्याच्या पाण्यातही राजकारण करणाऱ्या बहुतांश पुढार्यांना कधी सुबुद्धी येणार ? असे आता बेधडकपणे बोलले जात आहे तर समन्वय समिती ग्रामस्थांच्या कालव्याच्या पाणी सोडण्याच्या प्रयत्नांत आता बडे पुढारी सहभागी झाल्याने पाण्याची स्थिती सुधारेल हे सुद्धा अधोरेखित झाले आहे.
रोहा तालुक्यात अनेक गावे तहानलीत. त्यात वाशी, तळाघर ग्रा. पं. मधील लांढर, बोरघर, तळाघर गावांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तळाघर बौद्ध वाडीतील नागरिकांनी पाण्यासाठी अनेकदा आंदोलन उभे केले. तरी गावांना आताही पाणी नाही. त्यातच तब्बल दहाबारा वर्षे कालव्याला पाणी नसल्याने विहिरी, बोअरवेल सुकाड पडल्या. परिसर अख्खा वाळवंट भासत आहे. कालव्याला पाणी येण्यासाठी प्रभावी प्रयत्न झाले नाहीत. उलट पाण्यासाठी झटणाऱ्या लोकांची चेष्टा सुरू झाली. कालव्याच्या पाण्याच्या प्रयत्नांतून यावर्षी कालव्याची तब्बल ७० टक्के कामे मार्गी लागली. पुढील वर्षी कालव्याला सुरळीत पाणी येणार, याच घडामोडीत तळाघर, बोरघर पाठोपाठ लांढर गावालाही दरवर्षी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. जलजीवन मिशन योजनेचे काम विविध कारणांनी रखडल्याने पाणीबाणी निर्माण झाली. ठेकेदाराने चांगले रस्ते तोडले, निकृष्ट कामे केली. त्यावर पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. ग्रा. पं. त प्रशासन निष्क्रिय ठरले, याचाच फटका लांढर ग्रामस्थांना बसला. ग्रामस्थ वारंवार श्रमदानातून पाणी पुरवठा सुरळीत करत आलेत, अशात शहर मुक्कामी असलेल्या स्थानिक पुढाऱ्यांना पाण्याची झळ पोचणार कशी ? असा सवाल महिलांनी केला. यावर टँकरद्वारे पाण्याची मागणी आली नाही. आता बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची सोय होत आहे. अशी सोपस्कार प्रतिक्रिया ग्रामसेविका अर्चना पाटील यांनी देऊन मोकळा श्वास घेतला, तर पाणी पुरवठा अधिकारी युवराज गांगुर्डे यांनी काही ग्रामस्थांनी जलजीवन मिशन योजनेत अडथळा आणला सांगत नामानिराळा झाल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे.
वाशी, तळाघर ग्रा.पं.ती अनेक वर्षे तटकरेंकडे आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आ आदिती तटकरे यांच्या धाटाव गणातील ग्रामपंचायती आहेत. तरीही पाण्यासाठी प्रभावी प्रयत्न झाले नाहीत, याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. एवढेच काय ? कालव्याला पाणी सोडण्यातही तटकरेंचा मागासलेपणा कायम दिसून आला. यामागे नेमके कारण काय ? हे अध्याप कोणालाच कळले नाही. कालव्याला पाणी असते तर पिण्याच्या पाण्यावर कधीच भार नसते हे चाणाक्ष तटकरेंनी खरच उमगत नाही असे म्हणणे अज्ञानपणाचे होईल. वाशी, तळाघर ग्रा.पं.तीत पाण्याच्या अनेक योजना आल्या, आतापर्यंत लाखो रुपये खर्ची पडले, पण पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशात दोन्ही ग्रामपंचायती तहानलेल्या असणे हे तटकरेंचे अपयश मानले जात आहे. यातच लांढर गाव प्रचंड तहानलेला आहे. गावासाठी जलजीवन मिशन लाखो रुपयांची योजना राबवण्याला प्रारंभ झाले. मात्र ठेकेदारांने रस्ते तोडले, वनविभागाच्या जागेत टाकी जात आहे. याचं कारणाने काहींनी योजनेचे काम थांबवले, असा आरोप ग्रामपंचायत प्रशासन, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी केला. याउलट योजनेनचे काम निकृष्ट होत आहे. रस्ते तोडले, निधीत गोलमाल आहे. त्याची आधी चौकशी व्हावी अशी मागणी ग्राम अध्यक्ष तुकाराम भगत यांनी केली. दरम्यान, तटकरेंची अनेक वर्ष सत्ता असलेल्या मुख्यत: वाशी, तळाघर ग्रामपंचायत कायम तहानलेल्या आहेत हे पुन्हा समोर आल्याने आतातरी तटकरे दखल घेतात का ? हे पाहावे लागणार आहे.