रोहा रेल्वे पोलीसांचे ‘अमानत’ अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कार्य,गाडीत विसरलेले १३ तोळे सोने प्रवाश्यास दिले मिळवून

Share Now

281 Views

रोहा : ( महेंद्र मोरे ) रेल्वे सुरक्षा बल हे रेल्वे च्या मालमत्तेसह प्रवाश्यांचा जीव व त्यांचेकडील मौल्यवान सामानाच्या सुरक्षेची कर्तव्यदक्षपणे काळजी घेते याचे उदाहरण रोहा रेल्वे पोलिसांनी शनिवारी केलेल्या कामगिरी वरुन दिसून आले. मध्य रेल्वे लहान बालके, महिला यांचे सुरक्षिततेसाठी विविध अभियान राबवत असतानाच प्रवासादरम्यान हरवलेले प्रवाश्यांचे किमती व मौल्यवान साहित्य मिळवून देण्यासाठी ‘अमानत’अभियान राबविण्यात येते. या अंतर्गत दिवा रोहा या गाडी न. ०१३४७ या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याची विसरलेली बॅग पुन्हा त्या प्रवाश्यास तात्काळ मिळवून दिली.नागोठणे येथे उतरलेल्या या प्रवाश्यास आपली बॅग गाडीतच राहिल्याचे लक्षात येताच त्याने रोहा येथील आपल्या मित्राद्वारे रोहा रेल्वे पोलिसांशीसंपर्क साधत यासंबधी माहिती दिली.रोहा रेल्वे पोलिस चौकी निरिक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली उप निरिक्षक राकेश पाटीदार यांनी आरक्षक पवन कुमार यांचे सोबत रोहा येथे आलेल्या गाडीची तपासणी करत विसरलेली बॅग तात्काळ हस्तगत करत आतील १३ तोळे सोन्यासह प्रवाश्याच्या ताब्यात दिली. यामुळे आपले हरवलेले मौल्यवान दागिने रोहा रेल्वे पोलिसांचे कर्तव्यदक्षतेने मिळाल्याचे समाधान त्या प्रवाश्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होते.

यासंबंधी रोहा रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबई विरार इस्ट येथील आकाश दिलीप काटकर वय ३५ हे आपल्या आईसह दिवा रोहा या गाडीने पाली येथे जाण्यासाठी नागोठणे स्थानकापर्यंत प्रवास करत होते. गाडी नागोठणे येथे आल्यानंतर ते आपल्या आईसह उतरवून पुढील पाली कडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी आपली बॅग रेल्वे मध्येच राहिल्याचे त्यांचे लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पवार मेंशन रोहा येथे राहणारा आपला मित्र स्वप्नील सुरेश शिर्के याला याची माहिती दिली. स्वप्नील शिर्के याने लगेच रोहा रेल्वे पोलिस चौकी मध्ये जात यासंबंधी माहिती कर्तव्यावर तैनात असलेले उप निरिक्षक राकेश पाटीदार यांना दिली.यावेळी दिवा रोहा गाडी फलाट क्र.१ वर उभी होती. क्षणाचाही विलंब न करता रेल्वे पोलिसांनी या गाडीची तपासणी करत प्रवासी काटकर याची वर्णन केल्याप्रमाणे व्हाईट क्रीम कलरची डब्यामध्ये विसरलेली बॅग हस्तगत करत उप स्थानक प्रबंधक यांचे कार्यालयात जमा केली. त्यानंतर स्वतः दिलीप काटकर हे रोहा स्थानकात आल्यानंतर उप स्थानक प्रबंधक आशिष सिंह व अन्य दोन पंचांसमोर ती बॅग उघडण्यात आली. त्यामध्ये एक पन्नास ग्रॅम चे मंगळसूत्र, २० ग्रॅमच छोट मंगळसूत्र ,०८ ग्रॅमचा छोटा हार,२० ग्रॅमचा मोठा हार, १० ग्रॅमचे दोन झुमके, ०२ ग्रॅमची नथ व २० ग्रॅम वजनाच्या बांगड्या असा एकूण १३० ग्रॅम वजनाचा ८०६००० रुपये किमतीचा मुद्देमाल होता. पंचाचे समक्ष सर्व खातरजमा केल्यानंतर सर्व मुद्देमाल प्रवासी आकाश दिलीप काटकर यांचे कडे सुपूर्द करण्यात आला. दिवा रोहा गाडीला उन्हाळी सुट्टीमुळे असणारी प्रचंड गर्दी व त्यामध्ये हरवलेले आपले हे मौल्यवान सामान रोहा रेल्वे पोलिसांचे कर्तव्यदक्षतेमुळे आपल्यास पुन्हा परत मिळाल्याने प्रवासी वर्गासह संपूर्ण रोहा शहर व तालुक्यात रोहा रेल्वे पोलिसांचे कौतुक करत अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *