अंबानीच्या एसईझेड नंतर अदाणीचा उरण च्या जमिनींवर डोळा

Share Now

258 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) अदानी ग्रुपच्या ब्ल्यू स्टार ह्या कंपनीला सारडे, वशेणी, पुनाडे येथील सुपीक जमिनी हव्यात. लॉजिस्टीक वापरा करिता ह्या जमिनी अदाणीच्या गळ्यात घालण्या साठी केंद्र व राज्य शासनाने कमिशन बेसवर एमआयडीसी ची नेमणुक केलीय. म्हणजे ह्या भांडवलदाराला आपली जमीन आवडली म्हणून बीजेपी व मिंध्ये सरकार इथल्या स्थानिकांना विस्थापित आणि भकास करणार.बरं आपल्या जमिनीचे भाव कोण ठरवणार तर उद्योग मंत्र्याची हायर टॉपर कमेटी. म्हणजे वरून खालपर्यंत मलिंदा खात खात शेतकऱ्यांना चारा चारणार त्यामुळे एमआयडीसीच्या भू संपादनाला सारडे, वशेणी, पुनाडे येथील शेतकऱ्यांचा शेवटपर्यंत विरोध असेल असे सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी व्यक्त केले.

शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी पनवेल येथे असलेल्या प्रांत अधिकारी दालनात (कार्यालयात) उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली उरण तालुक्यातील एमआयडीसी बाधित सारडे, वशेणी, पुनाडे येथील शेतकऱ्यांचा एमआयडीसी प्रकल्पसाठी जमिन मोजणीला असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मिटिंग झाली. या मिटिंग साठी एमआयडीसीचे अधिकारी तसेच उरणचे आमदार महेश बालदी हजर होते. जमिनीचा निर्धारित भाव काय देणार, बेस रेट कसा ठरवणार, विस्तारित गावठाणातिल घरे कायम करण्यासाठी काय धोरण निश्चित करणार या बाबतीत कोणतेही ठोस उत्तर एमआयडीसीचे अधिकारी देउ शकले नाहीत. शेतकऱ्यांनी आपल्या नैसर्गिक वाढीपोटी आपल्या खाजगी जागेत बांधलेली राहती घरे शासन अतिक्रमण समजून अनाधिकृत ठरवू पहात असेल तर आमचा पूर्ण विरोध असेल. यावर स्थानिक आमदार, खासदार यांची काय भूमिका आहे ही त्यांनी स्पष्ट करावे . या विभागातील सुपीक जमिनी घेण्या ऐवजी एसईझेड मधील जमिनी, सिआरझेड च्या जमिनी, ओसाड व पडीक जमिनी एमआयडीसी ने संपादित करून अदाणीच्या घश्यात घालाव्यात अशी भावना संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

सर्व शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता एमआयडीसी साठी होणारी जमीन मोजणी तूर्तास मागे घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे शासनाला एक पाऊल मागे जावे लागले. अंबानीच्या एसईझेड ला जसे एकत्र येऊन हद्दपार केले त्या पद्धतीने सारडे, वशेणी, पुनाडे गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उरण मध्ये शासनाच्या माध्यमातून भू संपादन करणाऱ्या अदाणी समुहाच्या ब्ल्यू स्टारला हद्दपार करू या असे आवाहन सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी केले. जमिनी सोबत आपली विस्तारित गावठणातील घरे ह्या भांडवलदारांच्या पासून वाचवायची असतील तर गावठाण विस्तार हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. आणि सारडे ग्रामविकास समितीने गावठाणविस्ताराचा जो प्रयत्न सुरू केला आहे तसाच प्रयत्न इतर गावांतील शेतकरी, ग्रामस्थांनी करावा असे देखील आवाहन मनोज पाटील यांनी बोलताना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *