सामाजिक वनीकरण म्हणजे काय रे भाऊ, आतापर्यंत किती झाडे जगवली ? ग्राउंड रिपोर्ट

Share Now

336 Views

रोहा (राजेंद्र जाधव) जंगल साधन संपतीत अधिक भर टाकण्याची जबाबदारी असणाऱ्या वनविभागासोबत सामाजिक वनीकरण विभाग वर्षानुवर्षे कार्यरत आहे. तरीही रस्ता दुतर्फा झाडे लावणे, त्यांचे संगोपन करण्यासाठी सामाजिक वनीकरण स्वतंत्र विभाग आहे, हे अनेकांना अद्याप ज्ञात नाही. मूळात सामाजिक वनीकरण विभागाने तसे कधीच कामातून दाखवून दिलेले नाही. त्यातच सन २०२२ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यातील अनेक रस्ता दुतर्फा लावलेली झाडेच मोठ्या प्रमाणात मृतप्राय झाल्याने सामाजिक वनीकरण विभाग चांगलाच चर्चेत आला आणि सामाजिक वनीकरण म्हणजे काय रे भाऊ, असाच सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तालुक्यातील जाधववाडी ते पाथरशेत, रेल्वेलगत रस्ता, कारिवणे, येरळ ते आंदिवली, खांडेकरवाडी ते पहुर फाटा रस्ता दुतर्फा लाखो रुपये खर्चाची लागवडीतील हजारो झाडांतील किती झाडे जगवली ? याचे ठोस उत्तर खुद्द सामाजिक वनीकरण विभागाकडेच नसल्याने एकच खळबळ उडाली. तालुक्यात रस्ता दुतर्फा व खुल्या जंगल मैदानात सामाजिक वनीकरण विभागाने वर्षानूवर्षे झाडांची लागवड केली असती तर सर्वच रस्ते, मोकळे माळरान हिरवेगार दिसले असते, मात्र कागदांवर हजारो झाडांची लाखो रुपये खर्चून लागवड दिसत आहे, प्रत्यक्षात झाडे किती रुजवली ? याचे स्पष्टीकरण रोहा सामाजिक वनीकरण विभागाने करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

वाढती उष्णता, बोडक्या होणाऱ्या जंगलांनी सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश बहुतांश व्हाट्सअप व भाषणातच दिसत आहे. तरुण झाडे लावणे व संवर्धनाकडे फारसे उत्साही नाही. सामाजिक संस्थांचा सहभाग नाही. दुसरीकडे बुजुर्गांना अद्याप जंगल सुरक्षीत ठेवण्याचे भान नाही. याच निरीक्षणात वनविभाग ही जंगल फुलविण्यात सपशेल अपयशी ठरले. झाडे लावण्याचे कोटींचे उड्डाने घेतलेल्यात झाडे किती रुजली ? याचे उत्तर वन विभागाकडेही नाही. तालुक्यात लाखो झाडे लावण्याची वनविभागाची योजना फेल ठरली. त्यावर लाखो रुपये खर्ची पडले. वनविभाग महाराष्ट्र झाडे जगवण्यात अपयशी ठरल्याचे वास्तव असतानाच मुख्यतः सर्वच रस्ते दुतर्फा करण्याची जबाबदारी असणाऱ्या जिल्हा, तालुका सामाजिक वनीकरण विभागाने काय तीर मारले ? हे कधीच समोर येत नाही. मात्र सलाम रायगडने सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेचा पर्दाफाश करून ग्राउंड रिपोर्ट समोर आणला. सन २०२२ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यातील जाधववाडी ते पाथरशेत १ हजार, रोहा रेल्वे रस्ता २ हजार, वाशी ग्रामपंचायत हद्द कारिवणे १ हजार, येरळ ते आंदिवली १ हजार, खांडेकरवाडी ते पहुर फाटा १ हजार रस्ता दुतर्फा झाडांची लागवड केली. त्यावर प्रत्येक विभागावार झाडांच्या किमती वगळून खड्ड्यांवर १ लाख ५० हजार रुपये खर्च केले. मात्र प्रत्यक्षात हजारो झाडे रुजलीच नाहीत. कारिवणे रस्ता दुतर्फा झाडे मरून पडली. अनेक ग्रीन नेट संरक्षण टाकीत तर झाडेच नाहीत, हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने रोहा सामाजिक वनीकरण विभागाची प्रतिष्ठा अक्षरश: धूळीस मिळाल्याचे अधोरेखित झाले आहे.

तालुक्यातील अनेक जंगले एकेकाळी गजबजलेली होती. काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात जंगल तोड, वाढत्या वणव्यांनी वनसंपत्ती झपाट्याने नष्ट झाली. हा धोक्याचा इशारा असतानाच वनविभाग झाडे लावणे व संवर्धनाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. वृक्ष लागवडीसाठी व्यापक मोहीम उघडली जात नाही. याच भयान चित्रात रस्ता दुतर्फा फुलवण्याची जबाबदारी असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभाग अक्षरशः खाते धोरण ठरले आहे. स्वतःच्या नर्सरी त्यावरील खर्चासह प्रत्यक्ष झाडे लावण्यासाठी विभाग दरवर्षी लाखो रुपये खर्ची टाकत आहे. प्रत्यक्षात झाडे किती रुजवली ? याचे ठोस उत्तर वनविभागाकडेच नाही. वनमजूर सुनील लांगी यांनी २०२२ला ७ हजार ५०० झाडे लावली असल्याचे सांगितले. कारिवणे रस्ता दुतर्फा नेट जाळीतून झाडेच नाहीत. अनेक झाडे मरून पडलीत. झाडे जगली किती ? यावर मे अखेर सर्व्हे केले जाईल असे लांगी यांनी सांगितले. तर अनेक ठिकाणची हजारो झाडे रुजलीच नाहीत. याबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक अधिकारी आशिष पाटील, जीएफओ स्वप्निल गुरे यांना संपर्क केले असता प्रतिसाद न देऊन बेपर्वाई दाखवून दिली आहे. दरम्यान, मागील दशकात सामाजिक वनीकरण विभागाने किती रस्ता दुतर्फा झाडे जगवली, त्यावर किती खर्च केला आहे, याचा खुलासा विभागाने करावा अशी मागणी वृक्षप्रेमी रुपेश साळवी यांनी केली. तर सामाजिक वनीकरण म्हणजे काय रे भाऊ असा सवाल उपस्थित करण्याची वेळ विभागाने आणली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *