सामाजिक कार्यकर्ते अमलकांत मोरेंनी केला रियल एच पी च्या ग्राहक लुटीचा पर्दाफाश,नागरिकांत समाधान, प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष

Share Now

1,621 Views

रोहा – (महेंद्र मोरे) रोहा अष्टमी शहरात घरगुती गॅस वितरण करणाऱ्या रियल एच पी गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांच्या अनेकानेक तक्रारी आहेत. याकडे रोहा मधील महसूल सह सर्वच प्रशासनाने वेळोवेळी दुर्लक्ष करत जणूकाही या एजन्सी ला वरदहस्त दिल्याचे दिसत होते. मात्र त्याच रियल एच पी च्या कामगारांकडून होणाऱ्या ग्राहकांच्या लुटीचा पर्दाफाश अष्टमी येथील पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते अमलकांत मोरे व गौरव बडे या युवकांनी रविवारी सकाळी बापदेव मंदिर परिसरात रंगेहाथ पकडून केला आहे. यामुळे अष्टमी सह रोहा मधील नागरिकांचे मधून समाधान व्यक्त होत आहे. आता यावर रोहा मधील पुरवठा, पोलिस प्रशासन काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

रोहा शहरात सर्वात आधी दाते यांची रोहिणी गॅस एजन्सी एच पी घरगुती गॅस पुरवठा सेवा देत होती. शहरातील एकमेव एजन्सी असतानाही त्या काळी एजन्सी चालक व त्यांचे कामगारांनी ग्राहकाभिमुख सेवा दिल्याचे आजही बोलले जात आहे. मात्र त्यानंतर आलेल्या रियल एच पी एजन्सी चा कारभार हा सदैव मालकाची अरेरावी व कामगारांचा मुजोरीपणा यामुळे वादातीत राहिली आहे. मात्र महसूल मधील पुरवठा विभाग यांसह एच पी कंपनी यांनी ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत आजवर नोटीस काढणे व तंबी देण्यातच धन्यता मानली आहे. अष्टमी सह शहरातील सर्वच भागांत कमी वजनाचे सिलेंडर मिळत असल्याची चर्चा नागरिकांत होती. त्यावर ग्राहकांना वजन करून सिलेंडर द्यावेत हे नियमांनुसार असतानाही एजन्सी चालक व त्यांचे कामगार याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर अष्टमी येथील सामाजिक कार्यकर्ते अमलकांत मोरे व गौरव बडे यांनी पाळत ठेवत रियल एच पी च्या ग्राहक लुटीचा पर्दाफाश करण्याचा निर्धार केला होता. अखेर रविवार २८ मे रोजी अष्टमी ग्रामदैवत बापदेव महाराज मंदिर परिसरात भवानी माता मंदिराजवळ निर्जन ठिकाणी एच पी ची सिलेंडर भरलेली क्र. एम एच ०६ बी जी ५३७१ असा पुसटसा नंबर असलेली गाडी उभी असल्याची त्यांना माहिती मिळाली. माहिती समजताच दबक्या पावलांनी जात गाडी मध्ये काय प्रकार चालला आहे ते पाहिले.

यावेळी दोन कामगार भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये गॅस भरत असताना आढळून आले. हे सर्व बेकायदेशीर असून त्या कामगारांचे असे कृत्य हे रहिवासी भागासह त्यालगत असणारे रेल्वे स्टेशन, पेट्रोल, सी एन जी पंप,रियल चेच गोडावुन यांसाठी धोकादायक आहे. अश्या वेळी जर स्फोट झालाच तर भयंकर अग्नितांडव होत मनुष्य व वित्तीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यावेळी या दोघांनी त्या कामगारांना रंगेहाथ पकडले त्यावेळी त्यातील एक कामगार पळून जाण्यात यशस्वी झाला तर दुसरा कामगार पोलीस स्थानकात येण्यास नकार देत राहिला. अखेर त्या कामगाराला त्याच्या गाडी जवळ ठेवत या युवकांनी रोहा पोलिस स्टेशन गाठत प्राथमिक तक्रार दिली आहे. रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांचेशी यासंदर्भात संपर्क साधला असता लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक ती सर्व कारवाई चौकशी करून करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आता यावर सोमवारी महसूल पुरवठा शाखा व पोलिस प्रशासन काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागत कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांचे मधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *