पोलादपूर : सुंदरराव मोरे महाविद्यालयातील तरूणीवर चाकू हल्ला, हल्लेखोर फरार

Share Now

1,314 Views

पोलादपूर (प्रतिनिधी) पोलादपूर येथिल सुंदरराव मोरे महाविद्यालयातील एका तरूणीवर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. हल्ल्यानंतर जखमी अत्यवस्थ तरूणीला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून संबंधित तरुण हल्लेखोर फरार असल्याचे समोर आले आहे.

पोलादपूर तालुक्यातील दत्तवाडी कातळी येथील रहिवासी असलेल्या शुभम वनारसे या 21 वर्षीय तरूणाने मंगळवारी दुपारी सदर तरुणीला सावंत कोंड येथील समर्थनगरच्या निर्जन रस्त्यावर बोलावले. कॉलेज सुटल्यानंतर ती एका मैत्रिणीसोबत त्याला भेटायला गेली. मात्र मैत्रीणीला काही अंतरावर उभे करुन ती पुढे गेली. याचवेळी शुभम वनारसे याने पिडीत मुलीच्या हातावर, खांद्यावर आणि चेहर्‍यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सदर तरुणी रस्त्यालगतच्या गवतावर रक्ताच्या थारोळयात जखमी अवस्थेत पडली. हि बाब सोबतच्या मुलीच्या लक्षात येताच तीने आरडाओरड केली. त्यामुळे जमलेल्या लोकांनी पोलीसांना घटनास्थळी पाचारण केले व जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

पोलादपूरचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव आणि पोलीस नाईक वार्डे, शेख, नटे आणि अन्य सहकार्‍यांनी यावेळी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमी तरूणीला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल केले. डॉ.राजेश सलागरे यांनी तातडीने तिच्यावर प्रथमोपचार करून तिच्या पाठीत खुपसलेले हत्यार काढण्यासाठी पुढील उपचार करण्यास महाड येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये पाठविले. घटनास्थळी सदर माथेफिरू तरूणाचा एक मोबाईल काहींना आढळून आल्यानंतर तो पोलीसांना देण्यात आला. यानंतर पोलीसांनी तीन पथकं फरारी आरोपी शुभम वनारसे याच्या मागावर लावली असून पिडीत मुलीच्या आईला या घटनेची खबर देण्यात आली. दरम्यान, पीडित मुलीच्या अधिक ओळखीची कुणकुण मुलीच्या आईला लागली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली. तर आता पोलीस तपासातून नेमके काय समोर येते ? याचीच चर्चा सद्या सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *