शरद गोंधळी यांनी हाती घेतले सार्वजनिक बांधकाम विभागाचे खड्डे भरण्याचे काम

Share Now

656 Views

मुरूड (अमूलकुमार जैन) अलिबाग तालुक्यतील रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य शरद गोंधळी यांनी रेवदंडा गोळा स्टॉप ते रेवदंडा बंदर पर्यंत असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर पडलेले स्वखर्चाने भरण्याचे काम हाती घेतले आहे. अलिबाग तालुक्यतील मुरूड कडे येतानाचे शेवटचे गाव रेवदंडा आहे. रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर, डॉ. विजेता ढोलके यांच्या हॉस्पिटल जवळ,रेवदंडा हायस्कूल, रेवदंडा अर्बन बँक यांच्या समोर तसेच गोळा स्टॉप पासून रेवदंडा बंदर दरम्यान छोटे मोठे शेकडो खड्डे पडले होते.या खड्ड्यामुळे अनेकवेळा दुचाकी यांचे अपघात झालेले आहे.

या पडलेल्या खड्ड्याचा त्रास रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसहित येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना त्या खड्डेमय रस्त्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असे.याबाबत अनेकवेळा विविध वर्तमानपत्रामध्ये वृत्त प्रसिद्ध झाले तसेच अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतीत अनेकवेळा माहिती देवुनसुद्धा कानाडोळा केला गेला. काही दिवसांवर श्रीगणरराया यांचे आगमन होणार आहे. गणरायाच्या मूर्तीची वाहतूक करीत असताना कोणत्याही प्रकारचे अनिष्ट घटना घडू नये.म्हणून रेवदंडा ग्राम पंचायत सदस्य शरद गोंधळी यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने रेवदंडा गोळा स्टॉप ते रेवदंडा बंदर दरम्यान असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *