रोहा (प्रतिनिधी) रोहा मोहल्ला येथिल मुस्लिम समाजाची वृद्ध विधवा महिला पवित्र उमराह करण्यासाठी मक्का मदिना येथे गेल्या असता घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत घरफोडी करून घरातील मौल्यवान सामानाची चोरी करणाऱ्या चोरट्यांवर सक्त कारवाई करून आपल्याला न्याय दयावा अशी मागणी सदर महिलेने रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत येथील श्रीमती बदरून्नीसा अली नाडकर यांनी असे म्हटले आहे की त्या वरचा मोहल्ला, ता. रोहा या ठिकाणी ५० वर्षे रहात आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात त्या सौदी अरेबियातिल मक्का मदिना येथे उमराहसाठी गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत दि. 19 व 20 सप्टें. रोजी येथिलच मिर्झा, मकसूद व झुल्फीकार डबीर या तीन बंधुनी याबाई राहत असलेल्या घराचे कुलूप तोडून, घरफोडी करून घरातील मौल्यवान चीजवस्तू, इतर सामान चोरून नेले. तसेच जे. सी. बी. लावून घर जमीनदोस्त केले. याबाबत दि. 19 सप्टें. रोजी यामहिलेच्या दोन सुंनान्नी पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे. श्रीमती बदरून्नीसा नाडकर या सौदीहून दि. 26 सप्टें. रोजी भारतात आल्यावर त्यांनी राहते घर भुईसपाट झाल्याचे बघून धक्काच बसला. या धक्यातून सावरल्यावर त्या दि. 30 सप्टें. रोजी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी स्वतः गेल्या. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले आम्ही तपास करतो. तुम्ही घरात रहात असल्याचे पुरावे आणा. बदरुन्नीसा यांनी दि. 3 ऑक्टो. रोजी गेल्या चाळीस वर्षातील लाईट बिले, नळपट्टी, घरातील सामानाचे फोटो आदी सर्व पुराव्यासहित घरात काम करत असल्याचे व्हिडीओ, कपाटातील सोन्याच्या दागीन्यांची यादी व घरातील इतर सामानाच्या यादी सहित तक्रार करण्यासाठी गेल्या असता त्यांच्या तक्रार अर्जावर रोहा पोलिसांनी पोच दिली नाही, रोहा पोलीस घरफोडीची तक्रार घेण्यास टाळाटाळ व वेळकाढूपणा करून वृद्ध महिलेवर अन्याय करीत असल्याचे या महिलेने त्यांच्या तक्रारपत्रात म्हटले आहे, आपण परदेशात असताना घरफोडी करणाऱ्या तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा व माझा चोरीस गेलेला सर्व सामान मला परत मिळावे अशी मागणी या वृद्ध महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.