रोहा (प्रतिनिधी) – मराठा आरक्षण मागणीसाठी रोहा नगर पालिका चौकात सुरु असलेल्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मराठा समाजातील शेकडो तरुण, तरुणी, महिला व समाज बांधवांनी सरकार विरोधात टिकात्मक गीत व भजन गायन करून राज्यकर्ते व सर्व पक्षीय पुढऱ्यांचे लक्ष वेधले. या वेळी बहुजन वंचीत आघाडी या पक्ष संघटनेकडून लेखी पत्राद्वारे पाठींबा दर्शवीला. तर उपोषण शांततेत पार पाडावे त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, नायब तहसीलदार राजेश थोरे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी उपोषण ठिकाणी धावती भेट देत मराठा समाज बांधवांशी चर्चा केली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सरू आहे. समाजाला आरक्षण मिळावे तसेच जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ रोहा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारपासून नगर पालिका कार्यलया समोर तीन दिवस साखळी उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मराठा समाज बंधू आणि भगनींनी मोठया संख्येने उपस्थिती होत्या, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. या वेळी या सरकारचा करायचा काय ? खाली डोकं वर पाय. आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. कोण म्हणते देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाय. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा.. अशा घोषणा देत उपोषणाकर्त्यांनी सर्व पक्षीय पुढऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या तीन दिवसीय उपोषणाला व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून वंचीत बहुजन आघाडी, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान, कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्था, दि अखिल भारतीय विश्वकर्मा तसेच रोहा अष्टमी मुस्लिम समाज बांधव या संघटनांनी जाहीर पाठींबा दर्शविला आहे.
दरम्यान इतर जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन पेटून उठले आहेत.या अनुषंगाने रोह्यात शांतता नांदावी, उपोषण लोकशाही मार्गाने व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हूणन तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, नायब तहसीलदार राजेश थोरे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी घटनास्थळी भेट देत मराठा समाज बांधवांशी चर्चा केली. यावेळी विनोद पाशीलकर, अप्पा देशमुख, नितीन परब, समीर शेडगे, महेश सरदार, राजेश काफरे, निलेश शिर्के, अशोक मोरे, अंनत देशमुख, रघुनाथ देशमुख, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, शशिकांत मोरे, सूर्यकांत मोरे, अजित मोरे, परशुराम चव्हाण, किरण मोरे, विनोद सावंत, यशवंत अप्पा शेडगे, मामा सुर्वे आदी मराठा समाज बांधव व भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थिती होते.