अदानीचा रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांच्या मूळावर ? प्रशासन, लोकप्रतिनिधी गप्प, प्रकल्प चले जाव.. ग्रामस्थ आक्रमक, भालगांव येथे २२ नोव्हेंबरला सभा, जिल्ह्याचे लक्ष

Share Now

483 Views

रोहा (प्रतिनिधी) मे अदानी पोर्टस अँड लॉजिटीक फ़ार्म कंपनीसाठी रोहा ते आगारदांडा प्रस्तावित रेल्वेच्या जागा मोजणीला सबंधीत सर्वच गावांतील ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. आधी मोबदला जाहीर करा, कांडणे खुर्द, बुद्रुक गावे वगळून रेल्वे डोंगर माथ्यातून नेली जावी, मगच जागेची मोजणी करा यावर ग्रामस्थ ठाम राहीले. आम्ही जागेची मोजणी करून देणार नाही असा निर्धार मुख्यतः भालगाव, कांडणे, हाळ गावातील ग्रामस्थांनी केला आहे. दुसरीकडे रेल्वे सबंधी मागण्यांच्या निवेदनावर प्रांत यांसह संबधीत एमआयडीसी प्रशासनाने अद्याप काहीच उत्तर दिले नाही. प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले ? उलट ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता जागा मोजणीच्या नोटीसा आल्याने ग्रामस्थ शनिवारच्या रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीत कमालीचे आक्रमक झाले. बुधवार २२ नोव्हेंबर रोजी भालगाव येथे रेल्वे संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आता त्या महत्त्वाच्या बैठकीत विभागीय ग्रामस्थ काय आक्रमक पवित्रा घेतात ? जागेच्या मोजणीला विरोध करत सबंधीत प्रशासनाला नेमका काय ईशारा देतात ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

रेल्वे संपादीत जागेला मोबदला किती ? रेल्वे मार्ग नेमका कसा आहे, त्यातच कांडणे खुर्द, बुद्रुक गावांना उलटा वळसा घालण्याचा प्रकार काय आहे, हे सर्वच संभ्रमात टाकणारे आहे. रेल्वे प्रकल्पाला विरोध नाही, पण कांडणे, हाळ, भालगांव भागातील सुपीक जमीन रेल्वे संपादनात दाखविली गेला आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असणारा गाव भूमिहीन होईल, कायमचा परागंदा होईल, कुठल्याच मुद्यावर प्रशासनाकडून स्पष्टता नाही. संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनावर चर्चा नाही, असा धक्कादायक प्रकार असतानाच प्रशासन रेटून रेल्वे जागेची मोजणी करण्यासाठी पुढे सरसावल्याने ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले. या सर्व मुद्यांच्या चर्चेसाठी शनिवारी शासकीय विश्रामगृहात रेल्वे संघर्ष समितीची महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीला अध्यक्ष मधुकर पाटील, ॲड मनोजकुमार शिंदे, उदय शेलार, विनायक धामणे, प्रकाश डाके, कृष्णा बैकर, राजेंद्र जाधव, सतीश भगत, अशोक बैकर, रामा म्हात्रे, प्रदीप बामगुडे, नारायण पानसरे, दिनेश रटाटे शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे प्रकल्पाचे ग्रामस्थांसमोर रेखांकीत सादरीकरण करावे, कांडणे खुर्द, बुद्रुक, हाळ गावे वगळण्यात यावी, जागेचा योग्य मोबदला जाहीर करावा, सबंधीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा घडवून आणावी हे ठराव संमत करण्यात आले. प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत, त्यांनी तातडीने जागेची मोजणी थांबवावी यावर बैठकीत एकमत झाले आहे.

रेल्वे प्रस्तावित जागेची २२ नोव्हेंबरला मोजणी होण्याचे संकेत आहे. त्याच दिवशी भालगांव येथे वरसे, तळाघर, भालगांव, हाळ कांडणे, ताम्हणशेत सर्वसमावेश गावांच्या ग्रामस्थांची सभा घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आमच्या मागण्या मान्य करा, चर्चेआधी मोजणी होता कामा नये, मोजणी उधळून लावू असा ईशारा अध्यक्ष मधुकर पाटील यांनी दिला. कांडणे, हाळ गावे वगळण्यात आली नाही तर रेल्वे प्रकल्प चले जाव करण्यावर आम्ही प्रचंड आक्रमक आहोत. आम्हाला भूमिहीन करण्याचा विडा प्रशासनाने उचलला आहे का, सुपीक जमीन गेली तर आमची पुढची पिढी बरबाद होईल, याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, आमच्या काही मुद्द्यांवर रेल्वे प्रकल्पाला ठाम विरोध आहे, अशी संतप्त भावना विनायक धामणे, उदय शेलार, नारायण पानसरे यांनी व्यक्त केली. यावर खा. सुनिल तटकरे रेल्वे प्रश्नाकडे लक्ष घालत आहेत, ते लवकरच याबाबत बैठक घेतील, शेतकरी, ग्रामस्थांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न होईल अशी माहिती मधुकर पाटील यांनी दिली. दरम्यान, २२ नोव्हेंबरला रेल्वे प्रस्तावित जागेच्या मोजणी दिवशीच भालगांव येथे बाधीत शेतकरी, ग्रामस्थांची बैठक होत असल्याने नेमके काय होणार, रेल्वे प्रकल्प चले जाव करणार ? याकडे स्थानिक प्रांत प्रशासन कितपत गांभीर्याने लक्ष देतो, ग्रामस्थ आता कमालीचे आक्रमक झाल्याने नेमके काय होणार ? याचदृष्टीने २२ नोव्हेंबरकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर रेल्वे प्रस्तावित संपादीत शेतकऱ्यांनी अखेर शासनाची झोड उडवायला सुरुवात केली आहे, आता पुढे काय काय घडामोडी घडतात ? हे लवकरच समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *