अदानीच्या रेल्वे जागेची मोजणी उधळून लावणार ? खा सुनिल तटकरेंची उद्या पत्रकार परिषद शेतकऱ्यांना न्याय मिळणार ? भूमिकेकडे लक्ष

Share Now

236 Views

रोहा (राजेंद्र जाधव) मे. अदानी पोर्टस अँड लॉजिटीक कंपनीसाठी रोहा ते आगारदांडा मालगाडी रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे. रेल्वेसाठी जागा संपादन औद्योगिक प्राधिकरण करणार आहे. मालगाडी रेल्वे अष्टमी, रोठ, वरसे, तळाघर मार्गे ताम्हणशेत, हाळ, उचेल भालगावकडून दिघी पोर्टकडे जात आहे. शेतकऱ्यांच्या जागा संपादनासाठी आधीच नोटीसा बजावण्यात आल्या. मात्र जागेला मोबदला किती, भूमीहिन होणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, रेल्वे मार्गातून कांडणे, हाळ गावे वगळण्यात यावी या मागणीसाठी बाधीत सर्वच शेतकरी आता कमालीचे आक्रमक झालेत. त्यातच शेतकरी, रेल्वे संघर्ष समितीशी मुख्यत: औद्योगिक प्राधिकरण विभाग चर्चा करत नाही, तशी दखल प्रांत विभाग घेत नाही. याच नाराजीतून अखेर रेल्वे संघर्ष समितीने बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी भालगाव येथे बाधीत शेतकरी, ग्रामस्थांची सभा होत आहे. त्याच दिवशी रेल्वे जागेची मोजणी उधळण्याचा निर्धार रेल्वे संघर्ष समिती, विभाग ग्रामस्थांनी केला आहे, आता याच पार्श्वभूमीवर खा सुनिल तटकरे उद्या शनिवारी पत्रकार परिषद घेत आहेत अशी माहिती रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी दिल्याने रेल्वे बाधीत शेतकऱ्यांना योग्य मोबदला, रेल्वे मार्ग बदलणे, प्रकल्पाचे सादरीकरण करणे, पर्यायाने शेतकऱ्यांना खरोखर न्याय मिळणार ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

अदानीची मालगाडी रेल्वे सुपरफास्ट आहे. मोदी है तो मुमकीन है याच ऊक्तीप्रमाणे जागा मोजणीची लाखो रुपये रक्कम भूमी अभिलेख विभागात भरण्यात आली. २२ नोव्हेंबर रोजी भालगांव, उचेल, हाळ विभागात जागेची मोजणी जाहीर केली. जागेची मोजणी करू देणार नाही, मोजणी उधळून लावू असा इशारा रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीत देण्यात आला. २२ नोव्हेंबर रोजी भालगांव येथे वरच्या पट्ट्यातील गावांची बैठक होत आहे. त्यावेळी रेल्वे संबधी मोजणी उधळून लावू असे स्पष्ट संकेत अध्यक्ष मधुकर पाटील यांनी दिले. भालगांव येथील बैठकीत बाधीत आक्रमक शेतकरी काय भूमिका घेतात ? याकडे प्रांत प्रशासन यांसह संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच आता खा सुनिल तटकरे रेल्वे प्रकल्प विषयावर पत्रकार परिषद घेत आहेत. रेल्वे संबंधी खा तटकरे नेमके काय बोलतात, शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका व्यक्त करतात का, अदानी रेल्वे प्रकल्पला विरोध करत, शेतकऱ्यांच्या न्याय बाजूने उभे राहत मुख्यतः भालगांव, कांडणे, उचेल विभागातील शेतकऱ्यांच्या मागणीवर ठाम राहतात का, खासदारांची रेल्वे बाबत नेमकी काय भूमिका असेल ? याची उत्सुकता लागली आहे.

मे.अदानीच्या मालगाडी रेल्वे प्रकल्पाला कोणाचाच विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीला, रोठ, वरसे, भुवनेश्वर मधील आरझोन जागेला योग्य मोबदला, कांडणे, हाळ गावे वगळणे याच मागणीवर शेतकरी, त्यांच्या सोबत रेल्वे संघर्ष समिती ठाम आहे. सुपीक जागेतून रेल्वे न जाता डोंगर उतारावरून नेली जावी, सातबारा जिवंत ठेवावा, भुवनेश्वर येथे उड्डाणपूल व्हावा, रेल्वे प्रकल्प नेमका काय आहे याचे सादरीकरण करावे, मोबदला जाहीर करावा, याशिवाय मोजणी करून देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी, संघर्ष समितीने आधीच दिला आहे. त्याची दखल व औद्योगिक प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा न झाल्याने शेतकरी प्रचंड आक्रमक आहेत. मोजणी उधळून लावण्याचा निर्धार व्यक्त झाला. याच धर्तीवर खा सुनिल तटकरे पत्रकार परिषद घेत आहेत. मूळात खा तटकरेंनी रेडीरेकनरच्या तीन पटीने मोबदला देण्याची प्रतिक्रिया दिली होती. ती कदाचित अवरोधाने दिली असेल याच शेतकऱ्यांच्या नाराजीत अखेर उद्या खा तटकरे रेल्वे प्रश्नावर पत्रकार परिषद घेत आहेत तशी माहिती अध्यक्ष मधुकर पाटील यांनी उशिरा दिली. दरम्यान, अदानीच्या मालगाडी रेल्वे प्रकल्पावर खा सुनिल तटकरे पत्रकर परिषदेत पहिल्यांदाच नेमके काय बोलतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर सुनिल तटकरे रेल्वे प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना खरोखर न्याय देतात का, त्यावर भालगाव, हाळ, उचेल, कांडणे व अन्य गावांचे शेतकरी, सर्व गावे पुढे काय भूमिका घेतात ? हे लवकरच समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *