रोहा (प्रतिनिधी) बहुचर्चित अदानीच्या रेल्वे मालगाडी बाधीत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. त्याबाबत कोणीच मनात शंका आणू नयेत. रायगडच्या विकासात भर पाडण्यासाठी आपणच रेल्वे प्रकल्पासाठी प्रयत्न केले. रेल्वे संपादीत जागेचा मूल्यांकन करून योग्य मोबदला, प्रकल्प दाखले, मुख्यतः उचेल, हाळ, कांडणे गावांसाठी असुरक्षीत ठरणारा रेल्वे मार्ग बदलणे, प्रकल्प नेमका काय आहे यासाठी सबंधीत विभागाने सादरीकरण करणे, अशा मागण्यांवर कायम शेतकऱ्यांसोबत आहे, अशी माहिती खा सुनिल तटकरेंनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बाधीत शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मुद्यांवर अत्यंत समाधानकारक चर्चा झाली. त्यातून रेल्वे संपादन जागेची मोजणी केली जाणार नाही, १६ डिसेंबर रोजी औद्योगिक प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रकल्प नेमका काय आहे, याची स्पष्टता करण्याचे ठोस आश्वासन खा तटकरेंनी यावेळी उपस्थित बाधीत शेतकऱ्यांना दिले. दरम्यान, खा सुनिल तटकरे यांनी औद्योगिक प्राधिकरण विभाग, अदानी ग्रुपच्या अधिकाऱ्यांसमोर जागेची मोजणी पुढे ढकळण्याचे निर्देश दिल्याने रेल्वे प्रश्नावर भालगांव येथे आयोजित २२ नोव्हेंबरची सभा तूर्तास स्थगित करण्याची घोषणा संघर्ष समितीने केली. दरम्यान, कांडणे, हाळ गावांकडे उलट दिशेने फिरणारा रेल्वे मार्ग न बदलल्यास आम्ही रेल्वे प्रकल्प विरोधावर आताही ठाम आहोत, खा तटकरेंच्या आश्वासननंतर काय घडते ? याकडे आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोत असे सूतोवाच भालगांव, कांडणे, हाळ सर्व गाव विभागाच्या ग्रामस्थांनी दिल्याने संघर्ष अटळ आहे, हेच समोर आले तर औद्योगिक प्राधिकरण विभाग प्रकल्प ग्रस्तांच्या समोर येणार असल्याने शेतकऱ्यांनी तूर्तास समाधान व्यक्त केले आहे.
अदानीचा रोहा ते आगारदांडा रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांच्या कितपत फायद्याचा, सर्वच भागाचा विकास, रोजगाराची संधी कितपत, रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांच्या मूळावर नाही ना ? अशा अनेक मुद्यांवर खा सुनिल तटकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. खा तटकरे शेतकऱ्यांक्या हिताची भूमिका व्यक्त करतात का, खासदारांची रेल्वे बाबत नेमकी भूमिका काय ? असा शेतकऱ्यांचा आक्रमक सवाल टाइम्स’ने व्यक्त केला होता. २२ नोव्हेंबर रोजी भालगांव येथे रेल्वे संघर्ष समितीची बैठक नियोजित केली. त्यावेळी जागेची मोजणी उधळून लावणार अशा सर्व पार्श्वभूमीवर खा सुनिल तटकरेंनी पत्रकार परिषदेत ठामपणे उत्तरे दिली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष मधुकर पाटील, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, विजय मोरे, विनोद पाशिलकर, ॲड मनोजकुमार शिंदे यांच्यासह औद्योगिक प्राधिकरण, अदानी ग्रुपचे अधिकारी उपस्थित होते. महत्त्वाच्या बैठकीत जमिनीला मोबदला योग्य मिळावा, प्रकल्पग्रस्त दाखले, मुख्यत: रेल्वे पुढे जाऊन परत कांडणे, हाळ गावांकडे उलटा वळसा घेते, वळसा न घेता मार्ग थेट राहावा, प्रकल्प नेमका काय ? याचा सादरीकरण व्हावा, अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर खा सुनिल तटकरेंनी सबंधीत अधिकाऱ्यांसमोर आपण शेतकऱ्यांच्या सोबत आहोत हे ठणकावून सांगितले. योग्य मूल्यांकन, मार्ग बदलणे, प्रकल्पाचे सादरीकरण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांसमोर दिले. तोपर्यंत जागेची मोजणी करू नयेत, हे स्पष्ट झाले. त्यातून २२ नोव्हेंबर रोजी होणारी भालगांवची शेतकऱ्यांची सभा तूर्तास पुढे ढकलण्यात येत आहे असे रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने ॲड मनोजकुमार शिंदे यांनी जाहीर केले. १६ डिसेंबर रोजी औद्योगिक प्राधिकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अदानी ग्रुपचे अधिकारी यांच्या समवेत बाधीत शेतकऱ्यांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण केले जाणार असल्याचे खा सुनिल तटकरेंनी सांगितले. त्यामुळे तूर्तास रेल्वे बाधीत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आता रेल्वे प्रकल्प नेमका काय आहे, मूल्यांकन काय राहते, त्यावर शेतकरी काय भूमिका घेतात ? हे लवकरच समोर येणार आहे.