मराठा आरक्षण लढ्याचा गरीब कुणबी मराठा नोंदी असणाऱ्यांना मिळणार फायदा ? त्रुटीमुळे एका पिढीचे मोठे नुकसान, कुणबी दाखल्यांसाठी पुन्हा प्रभावीपणे सामूहिक प्रयत्नांची गरज ; शंकरराव म्हसकर

Share Now

240 Views

रोहा (प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाचा लढा संबंध राज्यात अनेक महिने सुरू आहे. याच प्रभावी लढ्याने शासन, प्रशासनाची अक्षरशः झोप उडाली. अशंत: सामाजिक दरीही निर्माण झाली. त्यावर सकारात्मक, नकारात्मक टीकाटिप्पणी सुरू आहे. तरीही मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अभूतपूर्ण यश आले, हे नाकारता येणार नाही. अनेक ऐतिहासिक दस्तऐवज कुणबी नोंदी सापडल्याने आरक्षणापासून पिढ्यांनपिढ्या दुर्लक्षित राहिलेल्या कुटुंबांना मोठा आधार मिळेल अशी अपेक्षा आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांसह कोकणातील जन्म, कर्माने कुणबी असणाऱ्या, मात्र नोंदी सापडल्या नाहीत याच कारणाने अक्षरशः हक्कापासून मागास राहिलेल्या कुणबी मराठा बांधवांना मराठा आरक्षण लढ्याचा कितपत लाभ मिळतो? हे स्पष्ट होणार आहे. याच मराठा आरक्षण लढ्याचा मुख्यत: उत्तर रायगडातील रोहा, अलिबाग, मुरुड, कर्जत, खालापूर, पनवेल, पेण, पाली तालुक्यांतील अनेकांच्या दाखल्यांवर कुणबी मराठा नोंदी असणाऱ्यांना आतातरी प्रत्यक्ष कुणबी समावेशाचा लाभ मिळतो का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे रोहा तालुक्यातील निवी, तळाघर, लांढर, कोलाड, चणेरा यांसह अनेक ग्रामीण भागातील कुटुंबांच्या दाखल्यांवर कुणबी मराठा नोंदी आहेत. त्यातून जवळपास एक पिढी आरक्षणापासून वंचित राहिली. त्यामुळे सरकारी नोकरीतील भरती, अनेक सवलतींचा लाभ घेता आलेला नाही. याला जबाबदार सरकार आहे, त्यात आजच्या म्हणविणाऱ्या नेत्यांकडून अधिक प्रभावी प्रयत्न झाले नाहीत. याच वास्तवात आतातरी कुणबी मराठा नोंदी असणाऱ्यांसाठी आरक्षीत प्रयत्न होतील का ? असे दाखल्यांवरील कुणबी मराठा नोंदी असणाऱ्या तरुणांकडून थेटपणे बोलले जात आहे. दरम्यान, रोहापासून उत्तर रायगडातील अनेक कुणबी कुटुंबांच्या दाखल्यांवर कुणबी मराठा असल्याने आतापर्यंत आरक्षणाचा लाभ घेता आला नाही, त्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. आता कुणबी दाखल्यांसाठी प्रभावीपणे सामूहिक प्रयत्न करण्याची नक्कीच गरज आहे, तशी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रीया तत्कालीन कुणबी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष, अभ्यासक शंकरराव म्हसकर यांनी दिली आहे.

राज्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण, ओबीसीत समावेश, स्वतंत्र आरक्षण, आर्थिक निकषांवर आरक्षण अशा विविध मुद्यांत राज्याचे राजकारण ढवळून निघाले. ओबीसी, मराठा समाजात अंशतः दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. आंदोलन प्रतिआंदोलने सुरू आहेत. या सर्व आरक्षण मुद्यांत मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निकराच्या लढ्याने चांगलेच यश गाठले. राज्यात आतापर्यंत २९ लाख कुणबी नोंदी सापडल्या. उर्दू, मोडी लिपी, ३२ग, संरक्षीत कुळे यासह अनेक दस्ताऐवजात कुणबी नोंदी सापडल्याने दाखल्यांवर कुणबी मराठा, मराठा असणाऱ्यांना सद्यस्थितीत मोठा दिलासा मिळाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दस्तऐवजात अनेक नोंदी सापडल्या. आठदहा खोल्या भरून पुरावे आहेत. याच नोंदी दस्ताऐवजात आता रायगडातील मराठा आरक्षण मुद्दाही ढवळून निघाला. आगरी, कोळी, तेली, माळी, नाभिक हे मूळात ओबीसी आहेत. मात्र कुणबी समाजात दाखल्यांबाबत कायम वास्तवाची संभ्रमावस्था आहे. मुरुड, अलिबाग, पाली, पेण उत्तर रायगडातील समावेश रोहा तालुक्यातील अनेक ग्रामीण गावांतील कुटुंबांच्या दाखल्यांवर हिंदू मराठा, कुणबी मराठा नोंदी मोठ्या प्रमाणात असल्याने गरीब कुणबी कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे वास्तव आहे. १८६५ मोडी लिपी कारभार, जन्म नोंदी, उर्दू लिपी, संरक्षीत कुळे यांसह १९६७ पूर्वीचे जन्म पुरावे देण्याचे मोठे आव्हान त्या त्या वेळी राहीले. त्यातून काहींनी अग्निदिव्य पार करत कुणबी पडताळणी दाखले मिळविले. मात्र आजही तालुक्याच्या निवी, तळाघर, लांढर, खांब, कोलाड, चणेरा, नागोठणे भागातील अनेक गरीब शालेय विद्यार्थी, कुटुंब प्रमुख यांच्या दाखल्यावर कुणबी मराठा नोंदी राहिल्याने आरक्षणाचा लाभ घेता आला नाही. तब्बल एका पिढीचे नुकसान व्यवस्थेने केले. तत्कालीन कुणबी समाजाचे नेते वगळता आजच्या नेत्यांनी यासाठी ठोस प्रयत्न केले केले नाहीत, याची नाराजी विभागावर तरुणांत असताना आतातरी मराठा आरक्षण लढ्याचा लाभ आपल्या समाजाला देण्यात कथित नेतेगण धन्यता मानतात का ? हे अधोरेखीत होणार आहे.

मराठा आरक्षणाचा योद्धा जरांगे पाटील यांच्या लढ्याचा चुकीच्या नोंदी पडलेल्या, पण जन्माने, कर्माने कुणबी असलेल्या कुणबी मराठा दाखल्यांतील कुटुंबाला, विद्यार्थ्यांना कितपत लाभदायक आहे. यावर कुणबी समाजाचे तालुका उपाध्यक्ष शंकरराव भगत यांनी अत्यंत तळमळीने प्रतिक्रीया दिली. निवी, तळाघर, लांढर भागाचा विचार केल्यास जवळपास ७० टक्के तरुणांच्या, कुटुंब प्रमुखाच्या दाखल्यावर कुणबी मराठा आहे, हे मान्य करावे लागेल. त्या कुटुंबांना आरक्षणाचा लाभ उठवता आलेला नाही. हा मुद्दा कुणबी समाज, ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर वारंवार मांडला. कुणबी मराठा नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सहकार्य करा असे आव्हानही वारंवार केले. त्यातही अनेक कायदेशीर अडचणींतून कुणबी मराठा दाखल्याचा मुद्दा आजही सुटलेला नाही. ७० टक्के समाज दाखल्यामुळे कुणबी प्रक्रीयेत येत नाही, हे मान्य करण्यात कमीपणा काय ? अशी स्पष्ट भावना भगत यांनी व्यक्त केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा लाभ कुणबी मराठा दाखले असणाऱ्यांना होईल, त्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रीयाा भगत यांनी दिल्याने दाखल्यांचे भयाण वास्तव अधिक समोर आले तर कुणबी उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकराव म्हसकर यांनीही वस्तुस्थिती मान्य केली, दस्ताऐवजांचा इतिहास सांगितला. दाखल्यांवर मराठा असेल तर मराठाच बोलणार, पण कुणबी मराठा दाखल्यांवरील कुटुंबाला, विद्यार्थ्याला दाखले मिळण्यासाठी आता प्रभावी सामूहिक प्रयन्नांची गरज आहे, अशा कुणबी समाजाचा अभ्यास असणाऱ्या शंकराव म्हसकर यांनी सांगितल्याने चुकीचे वक्तव्य करणारे गप्पगार होतील, हे नमूद झाले. दरम्यान, जरांगे पाटलांच्या लढ्याचा फायदा कुणबी मराठा नोंदी असणाऱ्यांना कितपत होतो, आतातरी नव्याने प्रभावी प्रयत्न होते का ? हे लवकर समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *