रोह्यातील कुंडलिकेच्या नशिबी भोग ; नदीचे पाणि काळवंडले!

Share Now

78 Views

रोहा (उद्धव आव्हाड) :- रोहा येथिल धाटाव एमआयडीसीच्या कंपन्यांतील २२ लाख लिटर रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट कुंडलिका नदीत सोडले जात आहे. दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नदी काळवंडली असून पाण्याला काळा रंग येऊन मासे मृत्युमुखी पडले आहेत. या पाण्याला दुर्गंधी असल्याने जनावरेदेखील पाणी पित नाहीत. तसेच पिकेदेखील धोक्यात आली असल्याने रोहा एमआयडीसीच्या सीईटीपी केंद्राची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुंभोशी, गोफणसह कुंडलिका नदीच्या पश्चिम खोऱ्यातील गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

रोहा नगर पालिकेच्या मैलामिश्रित सांडपाण्यानंतर आता एमआयडीसीच्या रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने कुंडलिकेच्या नशिबी आलेले भोग थांबण्याचे नाव घेत नाहीत.
रोहा एमआयडीसी परिसरात ४१ रासायनिक कारखाने आहेत. सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून कुंडलिका नदीत सोडण्यासाठी गोफण बंदरापर्यंत टाकलेली पाइपलाइन कुंभोशी गावाजवळ नदीपात्रातच फुटली आहे. सदर पाइपलाइनमधून निघणारे केमिकलयुक्त घाण पाणी प्रक्रिया केलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या दूषित पाण्याची प्रचंड दुर्गंधी सुटली असून हे पाणी काळे पडले आहे. रोहा एमआयडीसीत वारंवार तक्रार करूनही यावर कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या दूषित पाण्यामुळे नदीकाठावरील विहिरी दूषित झाल्या असून शेतजमिनीचा पोत खराब झाला असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शेती नाही, रोजगार नाही अशा अवस्थेत जगायचं कसं, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *