रोह्यात उद्या उद्धव ठाकरेंची गर्जना, १० हजार शिवसैनिकांची उपस्थिती, जय्यत तयारी, राजकीय घुमशानला प्रारंभ, अनंत गीते, भास्कर जाधव काय बोलणार ?

Share Now

404 Views

रोहा (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यातच खा सुनील तटकरे यांच्या भाजपा युती मनोमिलन घडामोडींवर ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोहा शहरातील प्रसिद्ध उरूस मैदानात पहिलीच मोठी सभा होत आहे. सभेत तटकरेंचे जाने दुश्मन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, कोकणातील शिवसेनेचा तोफगोळा आ भास्कर जाधव, खा विनायक राऊत व अन्य नेते खा सुनील तटकरे एकंदर राजकारणावर काय बोलतात ? याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १ आणि २ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात सहा झंझावाती सभा घेणार आहेत. गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी रोह्यात होणाऱ्या ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. रोह्यात होणाऱ्या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला असून शहरात व तालुक्यातील वातावरण भगवामय झाले आहे. ठाकरे विरोधकांचा कशाप्रकारे समाचार घेतात ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सभेला तब्बल १० हजार शिवसैनिकांची उपस्थिती राहणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले, तर शिवसेनेची सभा राजकीय दृष्ट्या कितपत यशस्वी ठरते ? हे अधोरेखित होणार आहे.

रोहा नगरी भगवामय झाली आहे, चौकाचौकात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि पताका लावल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या उरुस मैदानावर प्रचंड उत्साह व जल्लोषाच्या वातावरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी रोहेकर सज्ज झाले असून या संपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. फुटीर आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांचा अन्यायकारक निवाडा, हिंदूत्व आणि त्या अनुषंगाने भाजपाला उत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यात सहा झंझावाती आणि मॅरेथॉन सभा घेत आहेत. तटकरेंचा राजकीय होम ग्राउंड असलेल्या रोह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच सभा घेत आहेत, खा सुनील तटकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी आजगायत काहीही भाष्य केलेले नाही, दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे कायम तटकरेंविरोधात कायम शड्ड ठोकून आहेत, त्यामुळे गीते काय पलटवार करतात ? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. रायगड लोकसभा निवडणूक प्रचाराला या दौऱ्याने सुरूवात होणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासन आणि पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

सभा यशस्वी करण्यासाठी तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली उपतालुका प्रमुख महादेव साळवी, संजय भोसले, विभाग प्रमुख नितीन वारंगे, शाखा प्रमुख निलेश वारंगे, कुलदीप सुतार, ॲड हर्षद साळवी, महिला तालुका संघटक नीता हजारे, शहर संघटक समिक्षा बामणे, युवा तालुका अधिकारी राजेश काफरे, विभाग प्रमुख संतोष खेरटकर, सचिन फुलारे, अनिष शिंदे, मजहर सिद्दीकी, मुझम्मिल येरूणकर, समीर डाखवे, भारत वाकचौरे, मनोज लांजेकर, अनिष शिंदे, आनंद भुवड, आदित्य कोंढाळकर, प्रेरित वलीवकर, इरफान दर्जी, दुर्गेश नाडकर्णी, राम महाडिक, विष्णू लोखंडे, नंदकुमार बामुगडे, ओमकार गुरव, अमित कासट, मनोज तांडेल, मंगेश पवार, शंकर मिलगिरे, हरेश जाधव आदी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंची माया अजित पवार गटाच्या खासदारांना कळलीच नाही, जिथे सत्ता तिथे तटकरे असा हल्लाबोल करत समीर शेडगेंनी उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी रोहा अष्टमीकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *