रोहा : अवैध धंदे पुन्हा दमदारपणे खुलेआम, सामाजिक स्वास्थ्य धोक्यात, पोलिसांची पक्कड ढिली..!

Share Now

302 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा तालुका यांसह शहरात ऑनलाईन चक्री, मटका मुख्यत: चोराटी गांजा अवैध धंदे पुन्हा दमदारपणे खुलेआम सुरू असल्याचे दिसून येत आहे. छुप्या मार्गाने चालणारा मटका आता चांगलाच तेजीत आला. सामान्य नोकरदार यांसह तरुण वर्ग विविध जुगाराच्या आहारी जाऊन चांगलाच उदध्वस्त झाला. ऑनलाईन जुगारात अनेक तरुण देशोधडीला लागले. ऑनलाईन जुगारात लाखो रुपये फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात आहेत, त्या सर्व कॉर्पोरेट ऑनलाईन जुगार म्होरक्यासमोर संबंधीत विभागाने अक्षरश: हात टेकले, हे वास्तव असतानाच रोहा ग्रामीण व शहरात पुन्हा नव्या दमाने बोकाळलेल्या मटका, ऑनलाईन चक्री सोबतीला गावठी हातभट्टी, विषारी ताडीमाडीने अक्षरश: सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. या सर्व अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रोहा पोलिसांची अवैध धंद्यांवरील पक्कड ढिली झाल्याचे थेटपणे बोलले जात आहे. दरम्यान विविध अवैध धंद्यांविरोधात रोहा प्रेस क्लबने युथ ताकदीच्या मदतीने बेधडक आवाज उठविला. त्यातूनच श्रीराम लॉजमध्ये अविरत चालणारा गलिच्छ व्यवसाय उघडकीस आला. ऑनलाईन चक्री, मटका अवैध धंद्यांवर प्रतिबंध आला, गुप्तपणे चालणारा हेच अवैध धंदे पुन्हा खुलेआम सुरू झाल्याने ग्रामीण व शहरात चाललेय काय, पोलिसांना माहिती नाही का ? असा सवाल उपस्थित झाला तर तालुका, शहरात खुलेआम चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करावी, तरुणांना सहजगत्या खेळायला मिळणाऱ्या जुगारापासून वाचवावे अशी मागणी पुन्हा एकदा झाली आहे.

रोहा तालुक्यातील धाटाव, कोलाड, घोसाळे, नागोठणे, चणेरा सर्वच विभागात विषारी हातभट्टीला भलतेच ऊत आले. हातभट्टी उत्पादन रोखण्यात रोहा पोलीस मुख्यत: उत्पादन शुल्क विभाग पोलिसांना कधीच यश आलेले नाही. उलट धाटाव, रोहा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील हातभट्टी विक्रीचे आव्हान कायम राहिले आहे. यामागे अर्थकारण हेच खरे कारण असल्याचे लपून राहिलेले नाही. धाटाव विभागातील अनेक गावांच्या बाहेर बिनधास्त हातभट्टी विक्री सुरू आहे. हातभट्टी विरोधात वारंवार तक्रारी झाल्या, पण अजूनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. दुसरीकडे ऑनलाईन चक्री, मटका जोरकसपणे सुरू आहे. तरुणांना देशोधडीला लावणारा गांजा विक्रीही छुप्या पद्धतीने जोरात सुरू आहे. गांजाच्या कानोकानी खबरीकडे पोलीस कधीच गांभीर्याने पाहत नाहीत. अखेर रोहा शहरातील अवैध धंदे बंद करण्याची चळवळ रोहा प्रेस क्लबने युवा संबंध लोकांच्या सहकार्याने प्रभावीपणे उभी केली. त्यातून मटका, ऑनलाईन चक्रीवर निर्बंध आले, तरीही गुप्तगू सुरू असणारे अवैध धंदे आता खुलेआमपणे चालू झाल्याच्या चर्चेने तालुका, शहराचे सामाजिक स्वास्थ पुन्हा धोक्यात आले आहे.

मटक्याच्या बंद पडून धुळखात पडलेल्या काही जीर्ण खोल्या, टपरी पुन्हा ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याच्या दिसून आल्या आहेत. जुगार अड्डयाबाहेर अनेक कामगार, तरुणांच्या गाड्या दिसत असल्याने मटका विविध जुगार परत एकदा तरुणांना देशोधडीला लावण्यासाठी दिमतीला थाटल्यात. त्यासोबत विषारी ताडीमाडी विक्री सुरूच आहे. मटका, छुपा गांजा विक्रीच्या माहितीकडे पोलीस कधीच लक्ष देत नाहीत, याचे कायम आश्चर्य आहे. अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी आम्ही कायम सज्ज आहोत असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी पत्रकारांना दिले होते. अवैध धंद्यांवर दराराही बसला होता. आता पोलिसांची पक्कड ढिली पडली असल्याचे बोलले जाते. खुलेआम सहजगत्या ऑनलाईन चक्री, जुगार खेळायला मिळत असल्याने सामान्य नोकरदार, तरुण अधिकच उदध्वस्त होतील, त्यामुळे ऑनलाईन चक्री, जुगार सहज मिळणाऱ्या गावठी हातभट्टीवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी पुन्हा नव्याने झाली आहे. खुलेआम अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन बेधडक कारवाई करतो का ? हे लवकरच समोर येणार आहे तर रोहा प्रेस क्लब सर्व युथ फोरमच्या माध्यमांतून अवैध धंद्यांविरोधात पुन्हा हातोडा चालविणार ? असा ईशारा रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *