रोहा (प्रतिनिधी) रोहा अष्टमी नगरपालिकेचा कारभार दिवसेंदिवस अक्षरशः बेबंदशाही होत असल्याचे चित्र आहे. शहरात स्वच्छतेच्या नावाने लोक शिमगा करत आहेत. सर्वच ठिकाणचे गटारे घाणीने भरलेत. प्लास्टिक बंदीचा बोजवारा उडाला. भाजीवाले, फळवाले रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडून बसल्याने दररोज वाहतुकीचा अडथळा असाहय होत होता. अखेर अतिक्रमण भाजी, फळवाले, मच्छीवाले विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना दुसऱ्या जागी जाण्याचे सूचीत केल्याने रोहेकरांनी तूर्तास मोकळा श्वास घेतला. मात्र ही कारवाई नेहमीप्रमाणे कायम मलमपट्टी ठरत आली आहे. कारवाईचे स्वागत असतानाच रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या कष्टकरी सामान्य विक्रेत्यांकडून कराच्या नावाखाली लुटमार सुरू असल्याचे समोर आल्याने संबंध रोहेकरांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. दुसरीकडे करोडो रुपये खर्च करून इतिहास जमा झालेल्या भुयारी ड्रेनेज योजनेचे काय झाले, अन्यथा योजना निकामी झाल्याचे जाहीर करा, करोडो रुपये बिल अदा झालेली भुयारी वीज पुरवठा योजनाही निकामी झाली का ? अशा कुठल्याच प्रश्नावर उत्तर नसलेले मुख्याधिकारी बेफिकीर, संबंधीत विभागाचे बहुतेक अधिकारी बेफाम झाल्याचेच आता रोहेकारांतून अप्रत्यक्ष बोलले जात आहे. दरम्यान, रोहा अष्टमी नगरपालिकेसाठी मुख्याधिकारी यायला तयारच नाहीत, मुख्याधिकाऱ्यांना नेमका उपद्रव्य कोणाचा असतो ? याच वास्तवात आलेल्या मुख्याधिकाऱ्यांकडून रोहेकरांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत असेच तब्बल वर्षभर दिसत आहे तर कोणत्याच समस्या, मुद्यावर रोहेकर आक्रमक होत नाहीत, विरोधक लोकांचे प्रश्न मांडताना नेहमीप्रमाणे दिसत नसल्याने रोहा न.पा.ची अवधी बेबंदशाही आता अधिकच डोकेदुखी ठरणार ? हे लपून राहिलेले नाही. त्यावर सामाजिक संघटना आतातरी आक्रमक होतात का ? हे पाहावे लागणार आहे.
रोहा अष्टमी न.पा.चा प्रशासन राज सबंध रोहेकरांना अवघड जागी दुखणे झाले आहे. मुख्याधिकारीच सर्वकष कार्यक्षम नसल्याने शहरात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. मूळात बांधकामे परवानगी देण्यात प्रशासन अधिकाऱ्यांची कुशलता भारी आहे. याउलट शहरात दररोज मुख्य रस्त्यावर रहदारी होत आहे. भटकी कुत्रे, गुरे, डुकरे मुक्तपणे वावरून सामाजिक स्वास्थ धोक्यात आणत आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचलेत. शहर व अवतीभोवती महत्त्वाच्या जागांवर कचऱ्यांचे व प्लास्टिकची शेती झाली आहे. अनेक गटारे तुंबल्याने दुर्गंधी वाढली. डासांचा प्रादुर्भाव वाढला. रस्ता वाहतुकीला अडथला ठरणारे भाजीवाले, फळवाले हटविण्याची मोहीम कायम तकलादु ठरत आहे. नदी संवर्धन व पर्यटन ठिकाणच्या अवतीभोवती नदीकिनारे प्लास्टिक, घाणीने प्रचंड भरलेत. यावर ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके कायम आवाज उठवत आलेत. त्यावर तात्पुरती मलमपट्टी करत नदीचा पात्र व अन्य ठिकाण स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला. तरीही कायम काहीच उपाययोजना नाहीत, हे असतानाच सामान्य भाजी, मिर्ची व अन्य विक्रेत्यांकडून कराच्या रूपात २० रुपयांची पावती फाडून १०० रुपये वसूल करीत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आल्याने सर्वच बेबंदशाही, मुख्याधिकारी बेफिकीर, बहुतेक अधिकारी बेफाम असाच रोहा न.पा.त सध्याचा प्राशासकीय कारभार सुरू आहे. दरम्यान, रोहा न.पा.ने स्मशानकडे जाणार व मुख्य रस्त्याचा दुतर्फा अतिक्रमण केलेल्या भाजी, फळ, मच्छी विक्रेत्यांना हटविण्यात आल्याने रस्ता सध्यस्थितीत मोकळा श्वास घेत आहे, पण कित्येकवेळा केलेली कारवाई कधी ढिळी पडते, हाही यक्ष प्रश्न आहे, तर करोडो रुपये खर्चित निकामी ठरलेल्या योजनांचे काय झाले, जागोजागी कचरा, भरलेले गटार, सामान्य विक्रेत्यांकडून पावतीवर खाडाखोड करून लुटमार, यावर मुख्याधिकारी पंकज भुसे एकदातरी भाष्य करतील ? हे लवकरच समोर येणार आहे.