तर रायगड भ्रष्टाचाऱ्याच्या खाईत जाईल, रायगड मधील भाजपा पदाधिकाऱ्याचे राजीनामे !

Share Now

391 Views

रोहा (प्रतिनिधी) एक वेळ इतर कोणालाही मतदान केले तरी चालेल; परंतु, रायगड -रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांना मतदान करु नका, असे आवाहन भाजपाचे प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी केले आहे. खासदार तटकरे यांच्यावर अद्यापही जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले, तर हा जिल्हा पुन्हा भ्रष्टाचाराच्या खाईत जाईल, असा घणाघात त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. सुनिल तटकरे यांच्या संभाव्य उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने तटकरेंचे काम करणार नाही असं म्हणत बबलू सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रदेश सचिव पदाचा राजीनामा दिला असून, तो वरिष्ठांकडून स्वीकारण्यात आलेला नसल्याचेही सय्यद यांनी स्पष्ट केले आहे.

जलसंपदा विभागातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे. आरोपी म्हणून खासदार सुनील तटकरे यांचे नावदेखील आरोपपत्रामध्ये आहे. प्रधानमंत्री नेहमी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात बोलत असतात. एकवेळ शिवसेनेच्या अनंत गीते अथवा अन्य कोणाला मतदान केले तरी चालेल; मात्र, तटकरेंना मतदान करु नका. त्यामुळे खासदार तटकरे यांना महायुतीमधून उमेदवारी देऊ नये. जर तटकरे हे उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले, तर त्यांना कोणीही मतदान करु नये. विशेष करुन युवावर्गाने आणि भाजपानेदेखील त्यांना अजिबात मतदान करता कामा नये. या उपरही ते निवडून आले तर रायगड जिल्हा पुन्हा भ्रष्टाचाराचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असा घणाघात सय्यद यांनी केला. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराचे प्रकरण अद्याप बंद झालेले नाही. ते प्रकरण तडीस नेण्यासाठी दिल्लीपर्यंत जाण्याची तयारी केली असल्याकडेही सय्यद यांनी लक्ष वेधले. तटकरेंना आता अचानक मुस्लिम समाज जवळचा वाटू लागला आहे. त्यांना कुरवाळण्यासाठी ते तरुणांना विकासकामांच्या निधीची खैरात वाटत आहेत. काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे तसाही त्या विकासनिधींच्या पत्राचा काहीच फायदा होणार नाही. मतदान घेण्यासाठी ते अशी खिरापत वाटत आहेत. परंतु, मुस्लीम तरुणांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असेही सय्यद यांनी सांगितले.

तटकरे यांच्या सावलीला जो-जो गेला आहे, त्याला त्यांनी संपवले आहे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात तटकरेंचा त्रास सर्वांनाच होत आहे. याची तक्रार मी भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण, सतीश धारप, आमदार रवींद्र पाटील यांसह अन्य वरिष्ठांकडे केली होती. मात्र, तटकरे हे वरिष्ठांपर्यंत पोहोचून मला गप्प करायचे. त्यामुळेच मी भाजपाचा राजीनामा दिल्याचे सय्यद यांनी सांगितले. मी कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही. काम-धंद्याच्या पैशातून निवडणूक लढणे आता सोपे राहीलेले नाही, असेही सय्यद यांनी सांगितले. खासदार तटकरे यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना फसवल आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासारख्या माणसाला देखील त्यांनी फसवले आहे. पाटील कुटुंबिय हे अतिशय प्रेमळ आणि भोळे आहे. पाटील यांनी तटकरेंवर आंधळा विश्वास ठेवला. त्याचा फायदा तटकरेंनी घेतला. त्यांनी केलेली पाप कोठेही फेडता येणार नाहीत. त्यामुळे ईश्वर त्यांना कधीच माफ करणार नाही, असेही सय्यद यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *