अदानीच्या मालगाडी रेल्वे प्रकल्पासाठी प्रशासनाची जोर जबरदस्ती, रोठवासियांनी मोजणी उधळली, अधिकारी व ग्रामस्थांत बाचाबाची, काय होणार ? याकडे लक्ष भूमीपुत्रांनो सावधान, मध्यस्थी न्याय देणार नाहीत

Share Now

415 Views

रोहा (प्रतिनिधी) मे. अदानी पोर्टस् अँन्ड लॉजिटीक कंपनीसाठी आता स्थानिक महसूल प्रशासन कमालीची जोर जबरदस्ती करीत असल्याचे गुरुवारी समोर आले. अनेक शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही‌. मात्र जमिनीला मोबदला काय, नोकऱ्या, सुविधांचे काय, कांडणे हद्दीतील शेतकऱ्यांच्या मागण्यांचे काय झाले, रेल्वे संघर्ष समितीने प्रशासनाला वारंवार निवेदन दिले. त्या निवेदनाला उत्तर नाही. त्यावर कोणतीच चर्चा नाही. त्यामुळे सर्वच भागातील शेतकऱ्यांनी जमीन मोजणी व मॅपिंगला जोरदार विरोध केला. विरोध डावलत महसूल विभागाने जोर जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्याचा पुन्हा अट्टाहास धरला. काही शेतकऱ्यांचा सातबारावर रेल्वे प्रकल्पाच्या नोंदी टाकण्यात आल्या, हे सर्व जुलमी कारस्थान वेगाने सुरू असतानाच रोहा शहरानजीकच्या रोठ खुर्द हद्दीतील जमिनीच्या मोजणीसाठी गुरुवारी पथक गेला. जोर जबरदस्ती सुरू होणार तोच प्रकल्पग्रस्तांनी जोरदार प्रतिकार करत मोजणी उधळून लावण्याची खळबळजनक घटना घडली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी खा सुनिल तटकरेंची भेट घेतली. त्या भेटीत अपेक्षाप्रमाणे काहीच निष्पन्न झाले नाही. खा तटकरेंनी पुन्हा रेडीरेकनरचीच री ओढून आपली मध्यस्थीची भूमिका भलत्याच तऱ्हेने पार पाडत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आता भक्कमपणे कोणीच वाली नाही अशात भूमिपुत्रांनो सावधान, लढाई आपल्यालाच लढायची आहे असे म्हणत शेतकरी प्रचंड सतर्क झाला आहे हे शुक्रवारी समोर आले. दरम्यान, रोठ हद्दीतील जागा मोजणी प्रक्रिया दरम्यान प्रकल्पग्रस्त व प्रांताधिकारी यांच्यात अक्षरशः बाचाबाची झाली. जमिनीची मोजणी बंदोबस्तात करू असे वक्तव्य करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांनी अधिक आक्रमक होत मोजणी उधळून लावली तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कोणीतरी आमदार, खासदार रस्त्यावर उतरेल ? ही आशा मावळल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आता काय पावित्रा घेतात ? हे लवकरच समोर येणार आहे.

अदानीच्या रेल्वे मालगाडी प्रकल्प शेकडो शेतकऱ्यांच्या मूळावर उठणार असल्याचे दिसत आहे. खा सुनिल तटकरे, पालकमंत्री उदय सामंत यांनी मनावर घेतले तर खाजगी प्रकल्पातून शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊ शकतात. पण तशी शक्यता दूरापास्त झाली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांची कोणीच दखल घेत नाही. रेल्वे संघर्ष समितीने विविध मागण्या, त्यावर चर्चेबाबत तब्बल ४ निवेदने दिली. त्यातील एकाही निवेदनाला उत्तर नाही, चर्चा नाही, मध्यस्थीची भूमिका सांगत असणारे खा तटकरे रेडीरेकनर (सरकारी दर ) पलिकेकडे अद्याप गेले नाहीत. भुनेश्वरचा रेडीरेकनर १ लाख ७० हजार रुपये आहे. पाच पट पकडले तरी बाजारभाव मिळत नाही. निवी, तळाघर, वरच्या पट्यातील शेतकरी ठार मरतील हे स्पष्ट आहे. नोकरी सुविधांवर स्पष्टता नाही. साराच गोलमाल आहे. खाजगी प्रकल्प असल्याने खा तटकरेंच्या हातात बरेच काही आहे. पण शेतकऱ्यांचे भले होणार नाही हे सलाम रायगडने प्रारंभीपासूनचे भाकीत खरे ठरत आहे. भेटीला गेलेला शिष्टमंडळ नाराजीत आहे हे सांगण्यात आल्याने सर्वच विभागातील शेतकरी चांगलाच हबकला आहे. याच घडामोडीत गुरुवारी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड हे लवाजमासह रोठ खुर्द हद्दीतील जमिनी मोजण्यासाठी गेले. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमच्या मागण्यांचे काय झाले, मोबदला काय, नोकरीचे काय असे सवाल प्रांताधिकाऱ्यांना विचारले, त्यावर हे माझ्याकडे नाही हेच उत्तर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध करत मोजणी उधळून लावली. पुढील आठवड्यात आम्ही बंदोबस्तात मोजणी करू अशी जोर जबरदस्ती प्रशासनाने सुरू केली अशी माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रतिनिधी सचिन मोरे यांनी देत मोजणी उधळून लावल्याचे सांगितले. अदानी प्रकल्पाच्या बाजूने अनेक दलाल कार्यरत आहेत, त्यांचा मनसुबा पूर्ण होऊन देणार नाही, आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे असे मोरे यांनी ठणकावून सांगितले आहे.

मे आदानीच्या रेल्वे प्रकल्पासाठी जागा संपादन एमआयडीसी म्हणजेच शासन करत आहे. त्यामुळे शासन चर्चेसाठी समोर का येत नाही. निवेदनावर कोणतेच उत्तर नाही. याउलट जोर जबरदस्ती सुरू केली आहे. यामागे नेमके गौडबंगाल काय ? हे हळूहळू शेतकऱ्यांच्या चर्चेतून स्पष्ट होत आहे. तरीही मागील बैठकीत खा सुनिल तटकरेंनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला व अन्य मुद्द्यांवर न्याय देणार असल्याचे सांगत सरकारी, बाजारभाव यातून समन्वय साधला जाईल असे आश्वासित केले होते. मात्र योग्य मोबदला मिळेल, यासाठी तटकरे आग्रही राहतील याची शाश्वती नाही हे सलाम रायगडने अधिच भाकीत केले होते. ते वृत्त आता खरे ठरण्याला सुरुवात झाली आहे. खा तटकरे प्रकल्पग्रस्तांना योग्य न्याय देतील असे आम्हाला वाटत नाही, आपली लढाई आपल्यालाच लढायची वेळ आली आहे. आम्ही जमिनीची मोजणी करू देणार नाही. प्राण गेला तरी बेहत्तर असा ठाम निर्धार रोठ, वरसे यांसह कांडणे, वाली सर्वच भागांतील शेतकऱ्यांनी केल्याने अदानीच्या रेल्वेचे भवितव्य पुन्हा एकदा अंधातरी दिसत आहे. शिष्टमंडळ बैठकीनंतर शेकडो शेतकरी लढण्यासाठी कमालीचे सज्ज झाल्याचे समोर आल्याने प्रशासनासमोर चांगलाच पेच उभा टाकला. अदानीच्या रेल्वे प्रकल्पाला विरोध करण्यासाठी लवकरचं मोठे आंदोलन उभे करू, आम्ही चर्चेसाठी तयार असताना आमची क्रूर चेष्टा प्रशासनाने चालवली आहे, आता प्रकल्पाला आमचा ठाम विरोध राहील असा ईशारा नेते विनायक धामणे यांनी दिल्याने पुढे नेमके काय होणार ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *