रोहा (तांबडी) येथील अल्पवयीन अत्याचार व खून प्रकरण निकाल प्रक्रीया अंतिम टप्प्यात, जिल्ह्याचे लक्ष,सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी मराठा प्रतिनिधींची चर्चा

Share Now

909 Views

रोहा (प्रतिनिधी) राज्यात खैरलांजी, कोपर्डीतील महिला अत्याचार निर्दयी, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनंतर रायगडातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवरील सामुहिक अत्याचार प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. सायंकाळी शेतावरून आजोबांना आणण्यासाठी गेलेली मुलगी अचानक बेपत्ता झाली. अखेर तिचा मृतदेह रात्रौ उशिरा आढळून आला. त्यातून सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाने मराठा यांसह सर्वच समाजाने प्रचंड संताप व्यक्त केला. आरोपींना तात्काळ अटक करा, प्रकरण फास्ट ट्रॅक चालवा, असा चोहोबाजूने पोलिसांवर दबाव वाढल्याने अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणाची दखल गृहविभागाने घेतली. आरोपींना अटक करण्यात आली. तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मुख्यतः शिवसंग्रामचे नेते स्वर्गीय विनायक मेटे यांनी हा विषय लावून धरला. मेटे यांनी पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टीने अविरत प्रयत्न केले. अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅकद्वारे चालविण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडीत कुटुंबाची भेट घेऊन प्रकरण फास्ट ट्रॅकद्वारे चालविण्याचे जाहीर केले. सरकारी वकील उज्ज्वल निकम हे पीडीत कुटुंबाची बाजू मांडत आहेत. तब्बल तीन वर्षानंतर तांबडी अल्पवयीन मुलीच्या निर्दयी प्रकरणाबाबत न्यायालयात काय झाले ? याबाबत शनिवारी माणगाव येथे न्यायालयीन कामासाठी आलेल्या ॲड उज्ज्वल निकम यांची मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केले. यावेळी तत्कालीन गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी जलील शेख, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते. अल्पवयीन अत्याचार प्रकरण निकाल प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे, पीडितेला न्याय मिळेल असा विश्वास ॲड उज्ज्वल निकम यांनी यावेळी चर्चेत बोलून दाखविला. संबधीत पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात चांगलीच कामगिरी दाखविली असे ॲड निकम यांनी सांगितले. दरम्यान, तांबडी अल्पवयीन अत्याचार प्रकरण निकालाकडे आता संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तांबडी अल्पवयीन अत्याचार व खून प्रकरणी मराठा क्रांती मोर्चा, स्थानिक सकल मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला होता. तत्कालीन विरोधी पक्षाने घटनास्थळी भेट देत आवाज उठविला. त्यातून पोलीस प्रशासनावर दबाव वाढल्याने तब्बल ६ आरोपींना अटक करून दोषापत्र दाखल केले. प्रकरण फास्ट न्यायालयात चालविण्याला सुरुवात झाली. तरीही आज तीन वर्षाहून अधिक काळ लोटला. पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार, आरोपींना काय शिक्षा होणार ? याकडे मराठा समाज यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. तरीही पुढील कोरोना काळात न्यायालयीन प्रक्रीया थंडावली हे समोर आले. याच न्यायालयीन प्रकरणासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे शनिवारी माणगाव सेशन न्यायालयात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख, घोसाळे विभाग अध्यक्ष संदीप सावंत, पत्रकार राजेंद्र जाधव, प्रशांत देशमुख यांनी ॲड उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन न्यायालयीन प्रक्रीयेबाबत चर्चा केली. दोषारोप दाखल प्रक्रीया आज पूर्ण होणार होती, मात्र एक महिला साक्षीदार हजर राहू शकली नाही, २८ मार्च तारीख रोजी दोषारोप प्रक्रीया पूर्ण होईल, पुढील दोनतीन महिन्यात निकाल पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे ॲड निकम यांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींना सांगितले. दोषींना फाशीची शिक्षा अपेक्षीत आहे. सबंध जिल्ह्यासाठी हा संकेत जायला हवा, त्यावर आम्ही सकारात्मक आहोत, पोलीस अधिकाऱ्यांनी तपासकामे चांगले काम केले असे ॲड निकम यांनी चर्चेत सांगितले. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा ही पीडित कुटुंबीयांच्या न्यायासाठी कायम आग्रही राहिलेल्या स्वर्गीय विनायक मेटे यांनाही श्रद्धांजली असेल अशी भावना अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी व्यक्त करताच ॲड निकम यांनी यावर अधिक विश्वास दिला. दरम्यान, तांबडी अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांच्या भेटीतील चर्चेने पीडीत कुटुंब, समाज यांना न्याय मिळेल, न्यायाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे हे शनिवारी अधोरेखीत झाले तर अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा होते ? याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *