सुदर्शन केमिकलच्या सहकार्याने म्हसाडी येथील महाविद्यालयाच्या वर्गखोल्यांचे उदघाटन व मुलींना सायकलचे वाटप

Share Now

179 Views

रोहा (रविंद्र कान्हेकर) सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड, रोहाच्या सामाजिक बांधिलकीतून म्हसाडी येथील कुणबी समाज विद्यालयातील दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन व मुलींच्या शिक्षणासाठी सायकल वाटप बुधवारी करण्यात आले. सुदर्शन केमिकलच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या हस्ते हा समारंभ झाला. सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष विज, साईट हेड विवेक गर्ग, पीपल प्रॅक्टिस हेड शिवालीका राजे, डाॅ. क्लाॅज, सुदर्शन केमिकलच्या सीएसआर प्रमुख सौ. माधुरी सणस उपस्थित होत्या. कुणबी समाज विद्यालयाचे अध्यक्ष नारायण पवार, मुख्याध्यापक दत्तात्रय भांडवलकर आदी उपस्थित होते.

सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकीतून कुणबी समाज विद्यालयातील मुलींसाठी सायकल बँक प्रकल्पांतर्गत सायकली प्रदान करण्यात आल्या. गेली अनेक वर्ष आठ ते दहा किलोमीटर पायपीट करीत या मुली शालेय शिक्षण घेत आहेत. याची दखल घेत सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजने कुणबी समाज विद्यालयातील एकुण १५ मुलींना सायकल भेट देण्यात आल्या. त्याचप्रमाणे २०२० मध्ये नैसर्गिक चक्रीय वादळ आल्याने कुणबी समाज विद्यालयाच्या इमारतीची पडझड झाली होती. तसेच इमारतीचा बराच भाग कोसळुन नुकसान झाले होते. ही बाब लक्षात घेऊन सुदर्शन केमिकलने स्व. डाॅ. फ्रँक मोझेला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन वर्गखोलीचे बांधकाम पूर्ण करून सुशोभीकरण व रंगरगोटी करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान वर्गात शिकणार्‍या प्रत्येक मुलांत उद्याचा भावी अधिकारी, नागरिक व सुजाण असा पालक लपलेला आहे. आपल्या देशाच्या विकासाचा तो मजबुत पाया असणार आहे. या उद्देशातून मुलभूत शैक्षणिक सुविधा असणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सदर सामाजिक काम केल्याचे मत सुदर्शन केमिकलच्या सीएसआर हेड माधुरी सणस यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास महेश डेरिया, चेतन चौधरी, अमर चांदणे, विशाल घोरपडे, रविकांत दिघे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *