कालव्याच्या पाण्यासाठी आत्मदहनाचा ईशारा, प्रशासनाचा मज्जाव, बजावली नोटीस, बळीराजाच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष, विविध संघटनांचा पाठिंबा, पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांची भेट, काम वेगाने उरकण्याचे पुन्हा आश्वासन

Share Now

338 Views

रोहा (प्रतिनिधी) राज्य यांसह सबंध जिल्ह्यात गाजत असलेला आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणी प्रश्न अधिक पेटवण्याचा निर्धार बळीराजाने व्यक्त केला. विभागीय ग्रामस्थ २०१७पासून कालव्याच्या पाण्यासाठी संघर्ष करीत आलेत, मागील तीन वर्षापासून पाण्यासाठी मोर्चा, आंदोलन, आमरण उपोषण, पाणी जागर अभियान करण्यात आले. पाण्याची दखल विधिमंडळात घेण्यात आली. त्यातून कालव्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली. तरीही लोकप्रतिनिधी, प्रशासनाची उदासीनता कायम दिसून आली. खासदार, आमदार महत्त्वाच्या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत, हे अनेकदा उघड झाले. उलट आंदोलनकर्त्यांना खोटे ठरवण्याचे काम खुद्द खासदारांनी केले. आश्वासने देऊनही निवीपर्यंतच्या कालव्याला पाणी न आल्याने अखेर बळीराजा फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली विभागीय ग्रामस्थांनी १ एप्रिल रोजी कोलाड येथिल धरणात उड्या मारून आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. कालव्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना आत्मदहनाचा ईशारा द्यावा लागतो, ही गंभीर बाब आहे, हे लोकप्रतिनिधींचे अपयश आहे असा संताप व्यक्त करत प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन यांसह शेतकरी, कामगार, साहित्यिक, पत्रकार विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनकर्त्यांना पाठींबा जाहीर केला. दुसरीकडे निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी आत्मदहन आंदोलनकर्ते ग्रामस्थांना नोटीस बजावत मज्जाव केला आहे. त्यामुळे आता पाण्यासाठीचे आंदोलनकर्ता बळीराजा नेमकी काय भूमिका घेतो ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोलाड पाटबंधारे प्रशासन खडबडून जागा झाला. कार्य अभियंता मिलिंद पवार यांनी अधिकारी लवाजमासह ग्रामस्थांची भेट घेऊन कालव्याच्या दुरुस्ती कामाबाबत चर्चा केली. गुरुवारी अधिकाऱ्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. कामे वेगाने करत पाणी सोडण्याचे पुन्हा नवे आश्वासन पवार यांनी दिले. याच घडामोडीत आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावली, त्यामुळे पुढे काय होणार ? हे पाहावे लागणार आहे.

आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासनात गांभीर्य नाही. तरीही आंदोलनकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महत्त्वाची दुरुस्ती कामे मार्गी लागली. कालव्याला पाणी आल्याने संभे, पाले गावांना फायदा झाला, मात्र दूरवर असलेली वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी गावापर्यंत कालव्याचे पाणी आलेच नाही. त्यामुळे लांढर, बोरघर, तळाघर, गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. याची आमदार, खासदार, विभागीय नेत्यांना माहिती आहे. तरीही कालव्याच्या पाण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत हे आश्चर्य आहे. खा सुनिल तटकरे एकच टिमकी वाजवत आहेत. कालव्याचे पाणी महत्त्वाचे आहे ही विभागीय भावना घेत आतापर्यंत अनेक आंदोलन झाले. उर्वरीत मोजकी कामे मार्गी लागल्यास पाणी पूर्ववत होईल याकडे आंदोलनकर्ते ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आंदोलनकर्त्यांनी १ एप्रिल रोजी पाण्यासाठी आत्मदहन करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि एकच खळबळ उडवून दिली. तहसील, पाटबंधारे प्रशासनाची झोप उडाली. सर्वहरा जनआंदोलन, रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान, मजूर फेडेरेशन, रोहा सिटीझन फोरम, कोकण मराठी साहित्य परिषद, रायगड प्रेस क्लब, रोटरी क्लब, कामगार संघटनांनी ग्रामस्थांना पाठबळ देत पाण्याची चळवळ अधिक भक्कम केली. अखेर काय होणार ? याची चर्चा असतानाच प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी जिल्हाधिकारी रायगड फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वचे आत्मदहन आंदोलनकर्त्यांना नोटीस जारी केली. आत्महत्या हा भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा आहे. तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांना पाठवलेल्या नोटीसीत नमूद करण्यात आले. त्यामुळे आता कालव्याच्या पाण्यासाठी लढणारा बळीराजा नेमका काय पवित्रा घेतो, यातच पाटबंधारे अधिकाऱ्यांची खडबडून जाग, त्यातून दुरुस्ती कामासाठीची तत्परता, पाणी सोडण्याचे आश्वासन यावर आंदोलनकर्ते काय बोलतात ? हे समोर येणार आहे तर पाण्याबाबतच्या घडामोडीवर लवकरच पत्रकार परिषद घेऊन कालवा दुरुस्ती, लोकप्रतिनिधींच्या राजकारणावर भाष्य करून कालव्याचा पाणी लढा लोकांसमोर आणू अशी प्रतिक्रिया अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिल्याने आंदोलनकर्त्यांची भूमिका काय राहणार ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *