सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करा,निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता पालन करा ; पो.निरीक्षक देवीदास मुपडे

Share Now

173 Views

रोहा (महेंद्र मोरे) मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे, त्यानंतर सर्वत्र इद साजरी होणार आहे. यासोबतच होळी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती आदी सणउत्सव आगामी काळात आहेत. हे सर्व सण रोहेकर नागरिकांनी आपली सामाजिक सलोख्याची परंपरा राखत गुण्यागोविंदाने साजरे करावे. यासोबतच लोकशाही मधील सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजे निवडणूक.लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागु होत आपल्या येथे ७ मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने बजावलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी काटेकोर पणे करावे. असे आवाहन रोहा पोलिस निरिक्षक देवीदास मुपडे यांनी केले आहे.पोलिस स्टेशन सभागृहात शनिवार २३ मार्च रोजी घेतलेल्या शांतता कमिटी सदस्य,पोलिस पाटील मोहल्ला कमिटी, सार्वजनिक मंडळे,सर्व समाजातील जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, पत्रकार सभेत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे आवाहन करत यादरम्यान सामाजिक शांततेला बाधा पोहोचवणारे व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटकांवर कोणताही मुलाहिजा न राखता कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी रोहा सिटिझन फोरम चे अध्यक्ष आप्पा देशमुख, रियाज शेट्ये, वसिम सावरटकर,माजी नगराध्यक्ष लालता प्रसाद कुशवाहा, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष समीर सकपाळ, मनसे जिल्हा सचिव अमोल पेणकर,रा. कॉ. अजित पवार चे महेंद्र गुजर,वंचित चे तालुकाध्यक्ष देवीदास जाधव,कोळी समाजनेते सुर्यकांत वाघमारे, प्रदीप मोरे,यांसह पोलिस पाटील उपस्थित होते.

होळी सण आता सर्वत्र साजरा होणार आहे. गणेशोत्सवा प्रमाणेया सणाला मुंबई मधील चाकरमानी आपल्या गावी येतात. त्यामुळे हा सण साजरा करताना कोणताही वादविवाद न करता पर्यावरण रक्षण करत हा सण प्रत्येकाने साजरा करावा. यासोबतच मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु असून त्यानंतर रमजान ईद सर्वत्र ११ एप्रिल दरम्यान साजरी होणार आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती २८ मार्च रोजी, २९ मार्चला गुड फ्रायडे, ९ एप्रिल गुडीपाडवा,१४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व १७ एप्रिल रोजी राम नवमी साजरी होणार आहे. या काळात रोहा तालुक्याची सामाजिक सलोख्याची परंपरा कायम राखत हे सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करा.यादरम्यान शहरात मोठ्याप्रमाणावर गर्दी होणार आहे. या काळात गर्दीच्या ठिकाणी कोणतीही वादावादी झाल्यास तिला जातीय वा धार्मिक रंग न देता आपापसात चर्चेने ती सोडवा व तात्काळ यासंबंधी पोलिसांना माहिती द्या. सोशल मिडिया मधून जाती धर्मात तेढ निर्माण होईल असे कोणतेही मेसेज, फोटो स्वतः टाकू नका व तुम्हाला आले असतील तर ते पुढे पाठवु नका. असे संदेश वा फोटो कोण टाकत असेल तर त्यासंबंधी तात्काळ पोलिसांना माहिती द्या.यासोबतच धार्मिक स्थळांचे आसपास संदल, पालखी, मिरवणूक जात असताना त्यात्या धर्माच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करु नका. यासोबतच निवडणूक आचारसंहिता लागु असल्यामुळे कोणतेही सार्वजनिक व खाजगी कार्यक्रम साजरे करण्यासाठी प्रशासना कडून योग्य त्या परवानग्या घ्याव्यात. मा. सर्वोच्चन्यायालयाचे आदेशानुसार लागु असलेल्या सर्व नियम व बंधनाचे पालन या काळात सगळ्यांनी करावे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.एखादा राजकीय नेता व पक्ष याबाबत सोशल मिडिया मधून आक्षेपार्ह असे कोणतेही फोटो वा मेसेज टाकु नका असे आवाहन रोहा पोलिस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी केले आहे. सामाजिक सलोख्याला बांधा आणणारे, आचारसंहिता मोडणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात पोलिस प्रशासन कोणतीही हयगय करणार नाही असा इशारा देत या काळात पोलिस व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *