सुनिल तटकरे चक्रव्यूह भेदणार, चोहोबाजूने विरोधक, भाऊही शत्रूच्या गोटात ? भाजपा, शिंदे गटही नाराज, कुणबी समाज ठरणार निर्णायक

Share Now

428 Views

रोहा (प्रतिनिधी) महायुतीकडून रायगड रत्नागिरी लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेले कूटनीती राजकारणी सुनिल तटकरे मागील निवडणुकीपेक्षा यावेळी अधिकच चक्रव्यूहात अडकण्याचे अधिक स्पष्ट होत आहे. शेकापतून भाजपात आलेले पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना लोकसभेची उमेदवार मिळणार असल्याची चर्चा होती. तसे खुद्द पाटील यांनीही अनेकदा संकेत दिले होते. मात्र उमेदवारी मिळवण्यात सुनिल तटकरे अखेर यशस्वी ठरले. त्यामुळे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी न दिल्याने भाजपाचा अशंत: प्रभाव असलेल्या पेण, रोहा तालुक्यातील कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. भाजपा, संघ विचारधारणेतून नाराजी चांगलीच उफाळून येत आहे. महाड व अन्य तालुक्यातील महायुती सहभागी शिंदे गटही तटकरेंच्या उमेदवारीवर नाराज आहे. आ भरत गोगावले यांचे पूत्र विकास गोगावले यांनी उमेदवारीवर दावा ठोकत तटकरेंच्याच उमेदवारीला अप्रत्यक्ष खोडा घातला. २०१९च्या निवडणुकीत सुनिल तटकरे केवळ ३२ हजाराच्या फरकाने निवडून आले. श्रीवर्धन, अलिबाग मतदार संघातच तटकरेंची मदार दिसून आली. पेण, महाड, चिपळूण, दापोली उर्वरीत मतदारसंघात तटकरेंना अंशतः जोरका झटका बसला. अनंत गीते यांना प्राबल्य मताधिक्य मिळाले. आता अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील तटकरेंचे तत्कालीन मित्रपक्ष विरोधात गेला. आ जयंत पाटील यांनी तटकरेंच्या पराभवासाठी पुन्हा भीष्म प्रतिज्ञा केली. अशात नेते धैर्यशील पाटील, आ जयंत पाटील, भाजपा, शिंदे गटातील वाढती नाराजी, मुस्लिम समाजाचा दुरावा विचारत घेतला २०२४च्या निवडणुकीत सुनिल तटकरे चक्रव्यूह भेदणार ? हे अधोरेखीत होणार आहे. दरम्यान, सुनील तटकरेंना पूर्वीपेक्षा आता चोहोबाजूने विरोधक, शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष थोरले भाऊ अनिल तटकरेही शत्रूच्या गोटात गेल्याने सुनिल तटकरेंचे अवघड जागी दुखणंच वाढत असल्याचे बोलले जात आहे, तर ठाकरे गटाने गीते यांच्या जागी भास्कर जाधव यांना दिले असते तर तटकरेंनी पळती भुई थोडी झाली असती, असे खुद्द ठाकरे गट सहभागी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्ष बोलून दाखविल्याने आता तटकरे विरुद्ध गीते अटीतटीचा सामना कसा होतो ? याचीच सर्वांना उत्सुकता आहे.

देश, राज्यात भाजपाचे वरवर वारे असले तरी जनतेच्या माथी मारलेले गढूळ राजकारण निकाल बदलेल, असे चित्र तयार होत आहे. त्यातच भाजपाने भ्रष्टाचार, गुन्हेगारीचे आरोप असलेल्या राष्ट्रवादी व अन्य पक्षातील अनेक बड्यांना आपल्यात घेऊन शुद्धीकरण केले. त्यातीलच अनेकांना लोकसभेची उमेदवारी दिली. हे खुद्द भाजपाच्या कार्यकर्त्यांना मुख्यतः जनतेला रुचलेले नाही. सोयीनुसार निष्ठा, विचारधारा वेशीवर टाकलेल्या नेत्यांबद्दल लोकांच्यात प्रचंड संताप आहे हे सोशल मीडिया, त्यातील कमेंटमधील गद्दार व अन्य शब्दप्रयोगातून प्रखरतेने दिसत आहे. भ्रष्टाचार यांसह पक्ष बदलण्याचे आरोप पुन्हा नव्याने होत असलेल्या सुनिल तटकरेंनाही मित्र पक्षाचे कार्यकर्ते, कालचे राजकीय मित्र कितपत स्वीकारतील ? याबद्दल अनेक राजकीय तज्ञांनी साशंकता व्यक्त केली. थोरले भाऊ अनिल तटकरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जावून प्रदेश उपाध्यक्ष झाले, त्यातून सुनिल तटकरे विरोधी शत्रुत्वाच्या पहिला शड्ड ठोकला. तरीही अनिल तटकरेंना जनता तितकीशी गांभीर्याने घेत नाही. उलट रायगडात सदाबहार नाटक, मस्त चाललेय आमचं असेच दोन्ही तटकरेंनी ठरवले नाही ना ? अशीही तुफान चर्चा सुरू आहे. दुसरीकडे भाजपाचे धैर्यशील पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे ठरले होते. ऐनवेळी सुनिल तटकरेंना उमेदवारी दिल्याने नाराज पाटील आता मुरब्बी सुनिल तटकरेंच्या कोणत्या अभिलाषेला बळी पडतात ? हे समोर येणार आहे. पाटील आपली नाराजीची तलवार लवकरच म्यान करतील, त्यात काहीच आश्चर्य नाही. सुनिल तटकरेंची उमेदवारी जाहीर होताच शेकापतचे नेते जयंत पाटील हे नव्याने तटकरेंवर तुटून पडते, तटकरेंचा पराभव हाच अजेंठा असल्याची गर्जना पाटील यांनी केली. आ रोहित पवार यांनी तटकरेंवर भ्रष्टाचारी वैगेरे जोरदार प्रहार केला. त्यातून घायाळ झालेल्या तटकरेंनी संबंधित सर्वच विरोधकांवर प्रतिहल्ला केला. तरीही तटकरेंचा २०१९ मधील विजयाचा फरक पाहता आताची निवडणूक तटकरेंना तितकीशी सोपी दिसत नाही. तटकरेंना भाजपा, संघ परिवाराचा कायम विरोध राहीला. धैर्यशील पाटील यांना उमेदवारी न दिल्याने मुख्यतः रोहा, पेण भाजपा चांगलाच नाराज आहे. शिंदे गटही फारसा उत्सूक नाही. तटकरेंच्या मागील मताधिक्यात भर टाकलेला अलिबाग मतदारसंघात आ महेंद्र दळवी किती ऊर्जा देतात, त्यातच ठाकरे गटाने दिलेला तोच चेहरा, विकासकामांत कायम मागासलेपणा उमेदवार गीते तटकरेंसाठी आता कितपत फायदेशीर ठरतो ? हेही पाहणे महत्त्वाचे आहे. अशात सुनिल तटकरे हे घरातील शत्रूत्व भाऊबंदकी यांसह बलाढ्य विरोधकांचे चक्रव्यूह भेदणार ? हे पाहणे अधिक औत्सूक्याचे ठरणार आहे. दरम्यान, राजकारणात भलत्याच कूटनीती माहीर असलेल्या सुनिल तटकरेंकडे लोकसभा जिंकण्यासाठी काय काय नवे आयुधे असतील ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर श्रीवर्धन मतदारसंघातील कुणबी ताकत वगळता अन्य तालुक्यात गीतेंसाठी निर्णायक ठरलेला कुणबी प्रभाव कोणासाठी निर्णायक ठरतो ? हे निकालातून समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *