कालव्याची उर्वरीत दुरुस्ती तातडीने, पाण्याचा मार्ग होणार मोकळा, पुन्हा ठोस आश्वासन, प्रशासनाच्या विनंतीनंतर आंदोलन तूर्तास स्थगित, लढा पुढेही कायम ; विठ्ठल मोरे यांचा ईशारा

Share Now

285 Views

रोहा (प्रतिनिधी) कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठीचा लढा सुरूच आहे. पाण्यासाठी मोर्चा, आमरण उपोषण, पाणी जागर अभियान आंदोलने झाली. सुस्थावलेला पाटबंधारे प्रशासन अंशत: जागा झाला. लोकप्रतिनिधी अजूनही भानावर नाहीत. तरीही शेतकरी, ग्रामस्थांच्या लढयाला अपेक्षीत यश येत आहे. आतापर्यंत कालवा दुरुस्तीची अनेक कामे मार्गी लागली. यावेळी उर्वरीत दुरुस्ती कामात वेळकाढूपणा समोर आला. पाणी सोडण्याची स्थिती नसल्याने अखेर बळीराजा फाउंडेशनने कालव्याच्या पाण्यासाठी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत १ एप्रिल रोजी आत्मदहनाचा ईशारा दिला होता. अखेर आत्मदहन आंदोलनाची दखल घेत मुख्यतः तहसील, पोलीस प्रशासनाने सामंजस्य मध्यस्थीची भूमिका घेतली. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, ग्रामस्थांनी आत्मदहन आंदोलनाची टोकाची भूमिका घेऊ नयेत, पाटबंधारे प्रशासन अधिकारी कायम लढयाचे नेतृत्व करणाऱ्या बळीराजा फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, कालव्याची उर्वरीत दुरुस्ती तातडीने केली जाणार आहे, पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आंदोलन तूर्तास मागे घ्या, अशी विनंती सर्वच प्रशासनाने केल्याने प्रस्तावीत आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी रविवारी केली. दुसरीकडे कालव्याच्या पाण्यासाठीचा लढा यापुढेही कायम राहील, एवढेच काय ? कालव्याचा पाणी प्रश्न सुटल्यानंतर कालवा बंद नंतरच्या सर्व वर्षाकाठीची शेतीची भरपाई, कंपनी प्रदूषणातून शेतीची नुकसान विषय हाती घेण्यात येणार आहे, असेही मोरे यांनी स्पष्ट करत ईशारा दिला आहे. दरम्यान, संभे, किल्ला, तळाघर हद्द महत्त्वाची लिकेज, लायसनिंग मोऱ्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत, उर्वरीत दुरुस्ती होताच मे पूर्वधार्त पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे ठोस आश्वासन लेखी पत्रात कोलाड पाटबंधारे प्रशासनाने दिले, तर दुरुस्ती कामे एप्रिल महिन्यात उरकली जावीत, असे अधिकाऱ्यांना ठामपणे सांगण्यात आले, आश्वासीत कामे पूर्ण न केल्यास शेतकरी, ग्रामस्थांच्या रोषाला पुन्हा अधिक सामोरे जावे लागेल, अशी ठाम प्रतिक्रीया उपाध्यक्ष तुकाराम भगत यांनी दिल्याने पाणी प्रश्न लवकर सुटणार ? याकडे पुन्हा नव्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

कालव्याचे पाणी आणि ग्रामस्थांचे आंदोलन हे सर्वानाच परिचीत झाले आहे. ५० वर्षानंतर कालव्याची महत्त्वाची दुरुस्ती झालीच नाही. तसे प्रयत्न सत्ताकेंद्रीत असणाऱ्या आमदार, खासदारांनी केले नाहीत. त्यात डोंगराचा उतार असल्याने दर पावसाळी कालव्याची प्रचंड हानी होते. मागील कालवा दुरुस्ती कामात करोडोंचा भ्रष्टाचार करून मलिदा खाण्यात आला, हा राग आजही मुख्यत: तरुणांत आहे. कालव्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी नव्याने लढा सुरू केला. सलग तीन वर्षे आक्रमकपणे पाण्यासाठी लढणाऱ्या बळीराजा फाउंडेशनच्या लढयाला अपेक्षीत यश आले. अनेक दुरुस्तीची कामे मार्गी लागली. तरीही प्रशासनानची उदासीनता कालव्याचे पाणी अडवत आहे, त्यामुळे मोर्चा, आमरण उपोषण, पाणी जागर अभियान आंदोलने झाली. अखेर लोकप्रतिनिधी प्रशासनाला भानावर आणण्यासाठी बळीराजा फाउंडेशनने अखेर १ एप्रिल रोजी कोलाड धरणात आत्मदहन आंदोलन घोषीत करून एकच खळबळ उडवून दिली. पाटबंधारे प्रशासन खडबडून जागा झाला. पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन उर्वरीत दुरुस्ती कामे महिन्याभरात तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आली. बैठकीत तळाघर हद्दीतील महत्त्वाच्या सायपन काही मोऱ्या दुरुस्तीचे कामे वेगाने पूर्ण करण्याचे ठरले. त्यातून पदाधिकारी व पाटबंधारेचे अधिकारी यांच्यात पुन्हा सामन्वय वाढला. तरीही आत्मदहन आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका समोर येताच प्रांत, तहसील, पोलीस प्रशासन कमालीचा सतर्क झाला. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आत्मदहन आंदोलन करू नयेत, आत्मदहन हा गुन्हा आहे, अशी नोटीस प्रांत प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना आधीच बजावली. त्यातून आम्ही सदनशीर मार्गाने किती आंदोलने करायची, पाटबंधारे प्रशासनाने प्रत्येकवेळी आश्वासने द्यायची. याबाबत आंदोलनकर्त्यांत आधीच कमालीची नाराजी होती. अखेर पाटबंधारे प्रशासनाने कालव्याची दुरुस्ती कामे तातडीने उरकून मे पूर्वार्धात पाणी सोडण्याचे नियोजन केल्याचे पत्र आंदोलनकर्त्यांना दिले. त्याबाबतची बैठक कोलाड पोलीस ठाण्यात झाली. सहा पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रांत, तहसील, पाटबंधारे, पोलीस प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्याने पाण्याबाबतचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केली तर पाण्यासाठीचा लढा पुढेही चालूच राहणार आहे, स्वस्त बसणार नाही, अन्य विषयही लवकरच हाती घेतले जातील असा ईशारा मोरे यांनी यावेळी दिला. दरम्यान, कालव्याची उर्वरीत महत्त्वाची दुरुस्ती महिनाभरात झाल्यास पावसाळी आधी व पुढील वर्षात पाणी पूर्ववत होईल, पाण्याचा मार्ग शाश्वस मोकळा होईल असे सुखद संकेत मिळत आहे, तर कालव्याच्या पाण्यासाठीचे पुन्हा ठोस आश्वासन पाटबंधारे प्रशासनाने दिल्याने ये रे माझ्या मागल्या म्हणत पाण्यासाठीची प्रतीक्षा प्रत्यक्षात संपणार कधी ? याचीच चर्चा चोहोबाजूने पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *