रोहा नगरपरिषद मैदानावर राजकीय कार्यकर्ते, मंडळांची मक्तेदारी,युवा खेळाडूंची मुक्तपणे खेळण्याची हौस अपुर्णच

Share Now

305 Views

रोहा (महेंद्र मोरे) रोहा अष्टमी नगरपरिषदेने आपल्या मालकीच्या भुवनेश्वर येथील जुन्या तलावाच्या जागेवर नवीन मैदान तयार केले आहे. शहरातील सर्वच आरक्षित भुखंडे ही विना वापराच्या इमारती उभारण्यात, काहींवर असलेली आरक्षणे मतांचा टक्का टिकविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्यामुळे शहरात मैदाना साठी जागाच उपलब्ध होत नव्हती. अखेर वरसे ग्रामपंचायत मधील कारभाऱ्यांचा हट्ट त्याला रोहा मधील सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वाद यामुळे भुवनेश्वर येथे असलेल्या रोहा नगरपरिषदेच्या जुन्या तलावाच्या जागी भराव टाकून मैदान तयार करण्यात आले. यासाठी नुकताच १ कोटी रुपयांचा शासकीय निधी खर्च करून सुंदर असे खेळाचे मैदान झाले. मात्र नेहमीप्रमाणे रोहा नगरपरिषदेचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे हे मैदान लोकार्पण होताच या ठिकाणी रोज विविध मंडळांच्या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा होत आहेत. मात्र यामुळे मैदानावर मुक्तपणे खेळायची इच्छा असणारे लहानगे व युवक यांना या स्पर्धा पहातच आपल्या खेळण्याची हौस पूर्ण करावी लागत आहे. यामुळे हे मैदान नक्की व्यावसायिक स्पर्धा भरवणाऱ्या मंडळांसाठी की रोहा शहर व परिसरातील मुलांना मुक्तपणे खेळण्यासाठी असा सवाल नागरिकांचे मधून होत आहे.

रोहा शहरात मैदानी खेळ मुक्तपणे खेळता यावेत यासाठी स्वतंत्र व सुसज्ज मैदान असावे ही अनेक वर्षांपासून मागणी होती.अखेर वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर येथील रोहा नगरपरिषदेच्या जुन्या पाण्याच्या तलाव असलेल्या जागी हे मैदान रोहा नगरपरिषदेने उपलब्ध केले. याठिकाणी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यशासनाचा एक कोटी निधिहि खर्च करण्यात आला. आता आपल्याला क्रिकेट सह सर्वच मैदानी खेळ मुक्तपणे खेळायला मिळणार याचा मनस्वी आनंद बच्चे कंपनी सह युवा वर्गाला झाला होता. मात्र जेव्हा पासून या मैदानाचे लोकार्पण झाले त्या दिवसापासून रोज या ठिकाणी विविध मंडळांच्या व्यावसायिक स्पर्धा होत आहेत. आज तालुक्यातील होत असलेल्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन ही एक सामाजिक समस्या बनत चालली आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे व युवा वर्गाचे आपली नोकरी व व्यवसाय याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र अश्या स्पर्धा भरवून आयोजक हे राजकीय नेते, व्यावसायिक, औद्योगिक वसाहती मधील कंपन्या यांचेकडून हजारोंच्या वर्गणा जमा करत त्यामध्ये स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांकडून प्रवेश फी घेत बक्कळ पैसे कमवत आहेत. असे असताना रोहा नगरपरिषदेचे सार्वजनिक असलेले मैदान या स्पर्धांसाठी फुकटात वापरत आहेत. यासोबतच आता निवडणूक आचारसंहिता सुरु असतानाही या मैदानावर रात्री उशिरा पर्यंत होत असलेल्या सामन्यांचे मुळे आजुबाजुच्या नागरिकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आता परिक्षांचा हंगाम सुरु आहे त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत येथे लाउडस्पीकर सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यासंबंधी रोहा नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे कडे विचारणा केली असता हे मैदान व्यावसायिक कारणासाठी भाडेतत्वावर देणे संबधी कोणतेही धोरण ठरले नसल्याचे सांगितले आहे. जर शासनाचे करोडो रुपये सार्वजनिक वापरा करत खर्च होत असताना जर अश्या प्रकारे याचा फुकटात वापर होत राहिला तर याचा मुख्य उद्देश साध्य कसा होणार. कोणा एका असोसिएशन च्या मालकीचे असल्याप्रमाणे होत असलेल्या या मैदानाचा असा मनमानी होणारा वापर रोहा नगरपरिषदेने बंद करत येत्या उन्हाळी सुट्टीत आम्हाला मनमोकळेपणे मैदानी खेळ खेळण्यास आमचे हक्काचे मैदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *