एमआयडीसीकडे हजारो करोड पडून, भोवतालची गावे आजही मागास, लोकप्रतिनिधींचे अपयश चव्हाट्यावर, ५ दशकानंतर गावांना स्ट्रीट लाईट, अंशतः समाधान व्यक्त

Share Now

296 Views

रोहा (प्रतिनिधी) एमआयडीसीकडे तब्बल १ हजार कोटी रुपये पडून आहेत, अशी धक्कादायक माहिती आठवड्यापूर्वी सलाम रायगडने समोर आणली. मात्र लोटे, महाड, धाटाव, कंपन्यांसाठी अद्याप एकही अद्ययावत हॉस्पिटल नाही. वारंवार घडणाऱ्या अपघाती घटनानंतर गंभीर जखमींना पनवेल, मुंबई हॉस्पिटलमध्ये हलवावे लागते. अंतर दूरचा असल्याने आतापर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले, कित्येक जायबंदी झाले. तालुक्यात एमआयडीसी असूनही मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल नाही, याबाबत सोशल मीडियावर दररोज आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींना धारेवर धरले जाते. त्यातच धाटावातील कंपन्यांचा प्रक्रीया सांडपाणी अजूनही खोल समुद्रात सोडण्यात आलेला नाही, काम पूर्णतः ठप्प आहे, त्यामुळे कुंडलिका दिवसेंदिवस अधिक प्रदूषित झाली. उर्वरीत जमिनीही नापीक झाल्या, याकडे आमदार, खासदारांचे धोरणात्मक लक्ष नाही. केवळ गटार, रस्ते, कमानी, मैदान, समाज सभागृह यालाच विकास समजण्यात आले, हे मजेशीर वास्तव असतानाच कंपन्यांच्या शेजारी असणारी वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी गावे आजही मागास असल्याचे उघड आहे. कंपन्या शेजारील गावांना एमआयडीसीने पाणी, रस्ते, वीज देण्याची तरतूद असताना तब्बल ५ दशकानंतरही अनेक गावे प्रचंड तहानलेली दिसतात. मागील वर्षी लांढर, बोरघर, तळाघर गावात भीषण पाणी टंचाई असल्याचे समोर आले. त्यात कित्येक वर्ष स्वतःकडे असणाऱ्या ग्रा. पं. तींना पाणीही देऊ शकले नाहीत हे भयान वास्तव अधोरेखीत झाले. त्यातून आमदार, खासदार लोकप्रतिनिधींचे अपयश चव्हाट्यावर आले. याच घडामोडीत आता ५ दशकांनंतर भुवनेश्वर ते अशोकनगर विभागातील ग्रामीण गावे प्रकाशीत होत आहेत. रोहा ते आंबेवाडी, भुवनेश्वर ते अशोकनगर अंतर्भूत गावांच्या स्ट्रीट लाईटसाठी तब्बल ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पूर्वानुभावानुसार भुयारी स्ट्रीट लाईटचे काम कसे होणार ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, काही वर्षापासून एमआयडीसीच्या माध्यमातून काही गावांना पाणी पुरवठा केला जातो, मात्र पाण्याची उपलब्धता वजा असल्याने धावाधाव हेच कायम विभागाने अनुभवले आहे, पाणी योजनांची कामेही निष्कृष्ट झाली, अशात एमआयडीसीकडे करोडो रुपये असताना कंपन्या शेजारील गावांचा विकास समाधानकारक झाला नाही, हेच दुर्दैव असल्याची भावना निवडणुकीदरम्यान व्यक्त झाली आहे.

धाटाव एमआयडीसीत पूर्वी प्रचंड सुबत्ता होती. रोजगार मुबलक होता. हजारो कामगार कायम नोकरदार झाले. दुसरीकडे आज भागातील शेकडो तरुण बेठबिगर कंत्राटी म्हणून आयुष्य बर्बाद करत आहेत. याला राजकीय ठेकेदारी कारणीभूत असल्याचे सर्वश्रुत आहे. कंपन्यांचे अनेक धोकादायक प्लांट कंत्राटी कामगार चालवत आहेत. ठेकेदार ठेकेदारीत, नेते सीएसआर फंडावर मालामाल झाले. त्यातून कंपन्यांना प्रचंड फटका बसू लागला. आज अनेक कंपन्यांना गरगर लागली. लोकप्रतिनिधी कंपन्या वाढू शकले नाहीत, आहेत त्या कंपन्या टिकवू शकले नाहीत. तरीही म्हणतात विकास आम्हीच केला, कोणता शाश्वत विकास केला, हे आमदार, खासदारांनी आता सांगावे असा सवाल उपस्थित झाला आहे. कंपन्या शेजारील गावांना भौतिक सबलता आणता आलेली नाही. वाशी, तळाघर, ग्रा.प.मधील गावे सुविधांपासून मागास राहिली. लांढर, बोरघर, तळाघर गावे ऐन तहानलेली उन्हाळ्यात दिसून येतात. शेजारील गावांना भौतिक सुविधा पुरविणे हे एमआयडीसी अंतर्भूत असते, हे ५ दशकापर्यंत लोकप्रतिनिधींना माहितच नाही याचे आश्चर्य आहे. आजवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करू शकलेले नाही, याबाबत सबंध रोहेकरांत नाराजी आहे. रस्ते, गटार, बाग बगीचा यालाच विकास समजत आलेत. त्यातही लाखो, करोडो रुपये खर्चाचे नानानानी पार्क, शहरातील भुयारी ड्रेनेज गटार, वीज वाहिनी सर्वच कामे निकामी झालीत. याच आरोपांत भुवनेश्वर ते अशोकनगर पर्यंतच्या गावांसाठी सुखद धक्का अनुभवता आले. तब्बल ५ कोटी रुपये खर्चाची स्ट्रीट लाईटचे काम सुरू झाले आहे. अंधारात चाचपडलेली सर्व गावे आता प्रकाशीत होत आहेत. निधीचे भरभक्कम स्वरूप पाहता हा तरी काम काही वर्षांसाठी शाश्वत राहील का ? याबाबत चर्चा सुरू आहे. आधीच तालुक्यात जलजीवन योजनेचे तीनतेरा वाजविले आहेत, त्यासाठी ठेकेदार नेमतो कोण, मलिदा खातो कोण ? हे जगजाहीर आहे, याच भस्म्या मलिदा स्वभावाने विकासकामे निकामी झालीत. ठेकेदार नेता, अधिकारी यांचे मस्त चाललेय आमचं असच सुरू आहे. आता करोडो रुपये पडून असलेल्या एमआयडीसीने शेजारील गावांसाठी ५ दशकानंतर का होईना स्ट्रीट लाईटचे काम मंजूर केल्याने विभागाला अंशत: दिलासा मिळाला असेच समाधान व्यक्त झाले. दरम्यान, मुरब्बी लोकप्रतिनिधी असणाऱ्या खा सुनिल तटकरेंना एमआयडीसीकडून आजवर शाश्वत भरीव कामे करता आलेली नाही, मात्र विभागासाठी स्ट्रीट लाईट प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न केल्याने नव्या विकासाला प्रारंभ केला की काय ? अशी मिश्किलता व्यक्त झाली तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांसह सांडपाणी प्रकल्पाची कामे कधी मार्गी लागतील ? यावर खा तटकरे निवडणुकी प्रचार सभेत बोलतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *