तटकरेंच्या होमग्राऊंडवर उद्या विरोधकांची तोफ धडाडणार, सुषमा अंधारे, रोहीत पवार, जयंत पाटील काय बोलणार ? सर्वांचेच लक्ष

Share Now

255 Views

रोहा (प्रतिनिधी) रायगड लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोपाची फैरी झटत आहे. शेकापची दुकानदारी बंद करणार अशी जहरी टीका महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरेंनी केली. दुसरीकडे पारंपारिक प्रचलीत आरोपांतील सुनील तटकरे विश्वासघातकी, बेईमान असा जोरदार पलटवार शेकापच्या आ जयंत पाटीलांनी केला. तटकरेंचा हिसाब पूर्ण करू असे आव्हान देणारे जयंत पाटील यांच्यासह ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, अजित पवार गटाला घायाळ करणारे आ रोहीत पवार, महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते बलाढ्य विरोधकांची तोफ उद्या शुक्रवार सायंकाळी ६ वाजता शहरातील ऐतिहासिक राम मारुती चौकात धडाडणार आहे. अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सभेत नेत्या सुषमा अंधारे, आ जयंत पाटील, आ रोहीत पाटील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंच्या बदलत्या राजकारणावर काय भाष्य करतात, होमग्राऊंडवर नेमके काय बोलतात ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुनिल तटकरे सोबतीचे शेकापचे आ जयंत पाटील आज एकमेकांसमोर कट्टर विरोधक झालेत, आ जयंत पाटील यांनी सुनिल तटकरेंना विश्वासघातकी म्हणत हिसाब पूर्ण करण्याचे वारंवार भीष्मप्रतिज्ञा केली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे हाय होल्टेज टेन्शनमध्ये आल्याची संबंध जिल्ह्यात चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाआघाडीचे दिग्गज नेते सुनिल तटकरेंच्या होमग्राऊंडवर काय बोलतात, तटकरेंच्या बहुचर्चित राजकीय नीतिमत्तेवर काय भाष्य करतात ? याची सर्वांनाच उत्सुकता आहे तर महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची सभा न भूतो न भविष्यती होईल, तटकरेंच्या कारनाम्यांवर कठोर प्रहार केला जाईल, आरोपींना जशास तसे उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रीया तालुकाप्रमुख समिर शेडगे यांनी दिली आहे.

देश, राज्यातील बदलते राजकीय समीकरण नेमके कोणाच्या पत्त्यावर पडते, हे निकालातून स्पष्ट होईल. बॅ ए आर अंतुले नंतर शरद पवार यांच्या तालिमीत राजकीय यशस्वी शिखर गाठलेल्या सुनिल तटकरेंनी अखेर निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूमिका बदलली. राज्यात सहभागी असलेल्या शेकाप व अन्य पक्षांची साथ सोडली. काल मित्र असलेले शेकाप, अजित पवार राष्ट्रवादी एकमेकांचे शत्रू झाले. शेकाप व ठाकरे गट मित्र झाले. मागील निवडणुकीत सुनिल तटकरेंना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले शेकापचे नेते आ जयंत पाटील तटकरेंना विश्वासघातकी म्हणत आज महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सर्व ताकदीने उतरलेत. देशात मोदी शहांची राजकीय खेळी, राज्यातील विरोधी पक्षांतील नेत्यांना भाजपात घेत भ्रष्ट आरोपांची व्याख्याच बदलली, त्यात मुस्लिम समाजाची मानसिकता, संविधान मुद्द्यावर निवडणुका होत आहे. महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरेंना आता शेकापचा दमदार ताकदीने विरोध, भाजपाच्या भूमिकेला बहुतेक मुस्लिम समाजाचा विरोध, संविधान बचाव म्हणत श्रमिक कष्टकऱ्यांचा विरोध डोईजड वाटण्याचे चिन्ह दिसत आहे. याउलट महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते पाच वर्षांनी मतदारसंघात पाहुण्यासारखा फेरफटका मारतात, विकासकामांचा गाजावाजा नाही, याच घडामोडीत निवडणुकीच्या पूर्णसंध्येला आरोप प्रत्यारोपातून प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. उमेदवार सुनिल तटकरे विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची सर्वच बाजू भक्कम सांभाळणारे शेकापचे नेते जयंत पाटील वैयक्तिक टीकेवर आले आहेत. जयंत पाटील यांना शेकाप टिकवता आला नाही, त्यांचा दुकान बंद होणार असा आरोप तटकरेंनी केला, त्यावर सूनिल तटकरे बेईमान आहेत. यावेळी त्यांचा हिसाब पूर्ण करणार, असे बदल्याचे आव्हान जयंत पाटील यांनी दिले. आता खुद्द तटकरेंच्या रोहा शहर होमग्राऊंडवर शुक्रवारी आ जयंत पाटील यांसह उपनेत्या सुषमा अंधारे, आ रोहीत पवार आदी नेतेगन रायगडातील तटकरे शाहीवर काय भाष्य करतात, एकेकाळी तटकरेंविरोधात श्वेतपत्रिका याच रोहा होमग्राऊंडवरून प्रसिद्ध करून तटकरेंना हैराण केलेले आ जयंत पाटील उद्याच्या सभेत काय पलटवार करतात, स्वतःच्या चुकांवर काय बोलतात ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राम मारुती चौकात महाआघाडीची सभा यशस्वी करण्यासाठी तालुकाप्रमुख समिर शेडगे यांसह महाआघाडीचे सर्व नेतेगण, कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत तर होम ग्राऊंडवर होणाऱ्या विरोधकांच्या आरोपांना महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे व नेतेगण काय प्रत्युत्तर देतात ? हेही समोर येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *