श्रीवर्धन, अलिबाग मतदासंघात सेना भाजपा कुरघोडीचा फायदा पुन्हा आघाडीला ? जाणकारांत चर्चा 

Share Now

1,388 Views

रोहा (प्रतिनिधी) राज्यातील सेना भाजपाच्या युतीचा घोडा अद्याप धावलाच नाही. त्यामुळे युती होणार की नाही ? याच चर्चेत रायगडातील बहुतेक मतदारसंघातील शिवसेना, भाजपाच्या इच्छूक उमेदवारांनी लढतीची तयारी ठेवल्याचे स्पष्ट आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे ऍड. महेश मोहिते यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार कायम ठेवला. युतीची जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे महेंद्र दळवी हे संभाव्य उमेदवार आहेत. तरीही ऍड. मोहिते यांनी उमेदवारी लढविणार असे वारंवार भाष्य केले. एवढेच काय ? भाजप सेना युतीची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यानंतरही अपक्ष लढविणार यावर ऍड. मोहिते ठाम आहेत. अशात संभाव्य उमेदवार महेंद्र दळवी हे ऍड. मोहितेंची समज घालतात का ? हे पाहावे लागणार आहे. दुसरीकडे श्रीवर्धन मतदारसांघात भाजपाचे कृष्णा कोबनाक हे आधीपासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. युती न झाल्यास भाजपाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. युतीतूनही उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्यावर कोबनाक ठाम आहेत. अलिबाग, श्रीवर्धन दोन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला खो देण्याचा विडा भाजपाच्या इच्छूक उमेदवारांनी उचलल्याने, पर्यायाने सेना भाजप अंतर्गत कुरघोडीचा फायदा पुन्हा एकदा राष्ट्रवादी शेकापच्या आघाडीला होणार हीच चर्चा सध्या राजकीय जाणकारांत सुरु आहे. दरम्यान, रायगडातील विधानसभा निवडणूकीच्या विजयाची स्थिती 2014 सारखी जैसे थे  राहील, त्यात बदल  होणार नसल्याचेही जाणकरांतून बोलले जात आहे.         

रायगडात राष्ट्रवादी शेकापची आघाडी अंशतः भक्कम आहे. जिल्ह्यात सेनेची ताकद असतानाही अंतर्गत कूरघोडीने सेनेची नेहमीच नुकसान होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.सुनिल तटकरेंच्या राजकीय डावपेचात सेनेचे भलेभले नेते घायाळ होतात, याची प्रचिती विधानपरिषद निवडणूकीत आली. भाजपाने तर तटकरेंसमोर पायघड्या घातल्या हेही अधोरेखीत झाले. त्यातच सेनेच्या अनंत गीतेंच्या पराभवाने तटकरेंचे दक्षिण रायगडात राजकीय धैर्य निश्चित वाढले. हक्काच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात ताकद वाढली. सुनिल तटकरेंचे पूतणे अवधूत तटकरेंनी कुटुंबासह सेनेत प्रवेश केले तरीही राष्ट्रवादीवर फारसे परिणाम नाही. याउलट राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरेंसमोर अद्याप सेना, भाजपाकडे ताकदवान उमेदवार नाही. त्यातच भाजपा सेनेची युती न झाल्याने इच्छूक उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले. दुसरीकडे अलिबाग, श्रीवर्धन विधानसभेत भाजपा, सेनेच्या इच्छूक उमेदवारांनी लढायचे संकेत दिले. अलिबागमधून भाजपचे ऍड, महेश मोहिते, श्रीवर्धनमधून कृष्णा कोबनाक भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी लढण्यावर ठाम आहेत, त्यामुळे भाजपा सेना युतीची ताकद विभागण्याचा फायदा पुन्हा राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे अलिबागचे उमेदवार पंडित पाटील, श्रीवर्धनमधून आदिती तटकरेंचा विजय सुखकर होईल, यावर जाणकरांनी शिक्कामोर्तब केले. मूळात श्रीवर्धनमध्ये सुनिल तटकरेंच्या तडजोडी राजकारणात विरोधी उमेदवार घायाळ होतील हे नवे नाही. तटकरेंना राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराला ऐतिहासिक मतांनी निवडून आणायचे आहे, तो निर्धार सेने भाजपाची बंडखोरी पूर्ण करतो का ? हे निकालातून स्पष्ट होणार आहे. 
      
अलिबाग विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला संधी असल्याचे बोलले जाते. शेकापवरील नाराजी युतीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडेल ? अशीही चर्चा आहे. युतीची उमेदवारी महेंद्र दळवी यांना मिळण्याचे स्पष्ट संकेत आहे. तशी लढतीची तयारी दळवी यांनी केली. अलिबाग, मुरुड, रोहा मतदारसंघ समावेश भागाचा दौरा जोरात सुरु आहे. पण त्याचवेळी भाजपचे ऍड. महेश मोहिते यांची महत्वकांक्षा पाठ सोडत नाही. मागील निवडणुकीत मिळालेला प्रतिसाद विचारात घेत उमेदवारीची वारंवार इच्छा व्यक्त केली. प्रसंगी अपक्ष उमेदवारीही ऍड. महेश मोहिते ठाम असल्याचे सांगण्यात आले. ऍड. महेश मोहिते यांनीही याबाबत वारंवार पुनरुच्चार केला. त्यामुळे युतीची उमेदवारी सेनेचे महेंद्र दळवी यांना मिळाली तरी ऍड. महेश मोहिते यांची समज न झाल्यास फायदा पुन्हा शेकापला होईल यात वाद नाही. अशात ऍड. महेश मोहिते खरोखर निवडणूक लढविणार की संघर्षातून शेकापचा बदला एकत्रित घेणार ? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. श्रीवर्धन विधानसभेत सेना युतीकडून उमेदवारी कोणाला ? हे अद्याप ठरलेले नाही. युतीमधून अनिल नवगणे, राजीव साबळे, रवी मुंढे, समीर शेडगे इच्छूक आहेत. याउलट भाजपाकडून कृष्ण कोबनाक प्रचंड महत्वकांक्षी आहेत. भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवारीवर कोबनाक ठाम आहेत. भाजप सेना युतीच्या स्वतंत्र लढतीत राष्ट्रवादी आघाडीला मोठा फायदा मिळणार, हे सुद्धा नमूद झाले. पेण मतदारसंघात भाजपाचे रवी पाटील यांना युतीची उमेदवारी मिळेल, पेणमधे सेनेची कूरघोडी अलिबाग, श्रीवर्धनपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे अशा राजकीय घडामोडीत पितृपक्ष संपताच मुख्यतः सेना भाजपात काय कुरघोडी घडतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *