श्रीवर्धन मतदारसंघातील कॉंग्रेसच्या बंडखोरांची हकालपट्टी, पेण, अलिबागमध्ये काँग्रेसच्या बंडखोरांना अभय ? जिल्ह्यात एकच चर्चा

Share Now

2,392 Views

म्हसळा (निकेश कोकचा) श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, कॉंग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष दानिश लांबे, म्हसळा कॉंग्रेसचे अध्यक्ष मुईज शेख यांची पक्षविरोधी
कारवाई म्हणत अखेर कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने ही कारवाई केली असल्याची माहिती कॉंग्रेसचे सरचिटणीस धनंजय देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे रिंगणात आहेत, त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या तिघा पादाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवले. आघाडीचे धर्म पाळावे असे आवाहन कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी केले. त्यांचे आदेश धुड़कावून लावल्याने अखेर कॉंग्रेसने बंडखोरांची बुधवारी हकालपट्टी केली. दरम्यान, कॉंग्रेसची भूमिका जिल्ह्यातील काँग्रेससाठी 
सापत्निक राहीली. श्रीवर्धनमधील काँग्रेस बंडखोरांवर कारवाई करणाऱ्या राज्य काँग्रेसने राष्ट्रवादी आघाडीचे घटकपक्ष शेकापचे उमेदवार असणाऱ्या पेण, अलिबाग मतदारसंघातील 
कॉंग्रेसच्या उमेदवारांवर बंडखोरीची कारवाई केल्याचे वृत्त नाही. त्यामुळे पेण, अलिबाग मतदारसंघातील कॉंग्रेस त्या बंडखोरांना अभय देण्यात आले का ? अशीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. 
 
रायगड जिल्हयात कॉंग्रेस, शेकाप राष्ट्रवादीची आघाडी आहे. २०१४ नंतर शेकाप राष्ट्रवादीची आघाडी भक्कम झाली. त्याच आघाडीच्या जोरावर राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे, शेकापचे आ. जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेतली. त्यानंतर लोकसभेत अघाडीला अभूतपूर्व यश मिळून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंनी दिल्ली गाठली. आता सबंध जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या अघाडीतून उमेदवार रिंगणात आहेत. मूळात जिल्ह्यातील काँग्रेस केवळ औषधापुरती आहे. जिल्ह्याची काँग्रेस सुनिल तटकरेंनी संपविली, असा काँग्रेसजणांचा जुना आरोप सर्वश्रुत आहे. त्याच घडामोडीत जिल्ह्यात सुनिल तटकरेंच्या वाढलेल्या राजकीय प्रस्थाने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघावरही दावा केला. श्रीवर्धनवर काँग्रेसचे हक्क आहे, असे सांगणाऱ्या बॅ.अंतूंलेंनाही राष्ट्रवादी जुमानली नाही आणि अखेर श्रीवर्धन विधानसभेवर राष्ट्रवादीची वतनदारी सुरु राहिली. पण श्रीवर्धनवरील राष्ट्रवादीचे हक्क काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आजही मान्य नाही. रोहा काँग्रेस वगळता माणगांव, तळा, म्हसळा तालुक्क्यातील काँग्रेसने राष्ट्रवादीच्या उमेदवारीला कायम विरोध केला. श्रीवर्धन विधानसभा काँग्रेससाठी सोडावे यासाठी म्हसळा येथे पाच तालुक्यातील काँग्रेसची बैठक झाली. त्या बैठकीच्या निर्णयातून राष्ट्रवादीला जागा सोडल्यास काँग्रेस
बंडखोरी करणार, असा केलेला निर्धार उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, अल्पसंख्याक अध्यक्ष मुईज शेख, म्हसळा काँग्रेसचे अध्यक्ष दानिश लांबे यांनी प्रत्यक्षात आणून राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी केल्याचे अधोरेखीत झाले आहे. 

श्रीवर्धन विधानसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने आदिती तटकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्या विरोधातील बंडखोरी मागे घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
आघाडीचे धर्म न पाळता ज्ञानदेव पवार व इतर दोघांनी अपक्ष उमेदवारी काम ठेवून बंडाची निशाण फडकावले. काँग्रेसने बंड केल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरेंच्या अडचणींत अधिक भर पडली. याच डोकेदुखीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव पवार, दानिश लांबे, मुईज शेख यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात खा. सुनिल तटकरेंची राजकीय खेळी यशस्वी ठरली. पवार यांसह इतरांची काँग्रेसमधून ह्कालपट्टी केल्याने जिल्हा राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र शेकाप राष्ट्रवादी आघाडीविरोधात पेण, अलिबाग मतदारसंघात काँग्रेसकडून अधिकृत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पेणमधील नंदा म्हात्रे, अलिबाग मधील श्रद्धा ठाकूर यांच्या विरोधात पक्षांतर्गत कारवाई झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराला अडचणीत आणणाऱ्या काँग्रेसच्या बंडखोरांवर कारवाई केली. फायदा असणाऱ्या बंडखोरांची उमेदवारी कायम ठेवली. याबाबत जिल्हा काँग्रेसमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त झाले. अशात अस्वस्थ अस्तित्व गमावलेली काँग्रेस वाढणार कशी, जिल्ह्याच्या शेकाप, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तालावर निर्णय घेणाऱ्या राज्य काँग्रेस नेत्यांनीच जिल्हयातील काँग्रेस संपविण्यासाठी मदत केली ? अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यतः
माणगांव, म्हसळ्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त झाली. दरम्यान, श्रीवर्धनमध्ये 
राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणाऱ्या काँग्रेसच्या बंडखोरांवर कारवाई झाली. दुसरीकडे पेण, अलिबाग मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी कायम आहे, हे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यातील उर्वरीत काँग्रेस इतिहास जमा होणार ? याचीच चर्चा सध्या रायगडाच्या राजकारणात सुरु आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *