आमचं ठरलंय, तटकरे विरुद्व तटकरे ‘सामना’ रंगालाच नाही, कार्यकर्त्यांत एकच चर्चा 

Share Now

1,395 Views

रोहा (प्रतिनिधी) माजी आ.अवधूत तटकरे यांनी काकांशी फारकत घेत राष्ट्रवादी सोडली. वडील माजी आ.अनिल तटकरे, बंधू संदीप तटकरे यांसह कुटुंबासमवेत अवधूत तटकरेंनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. तटकरे वादातून प्रचंड नाराज असलेले अवधूत तटकरे हे आमदार काळात कायम अज्ञातवासात राहिले. श्रीवर्धन, रोहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात न राहिल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्हही उभे राहिले. तेच अवधूत तटकरे शिवसेनेत गेल्याने श्रीवर्धनमधून पुन्हा निवडणूक लढवितील,असे सर्वांनाच वाटले होते. पण अवधूत तटकरेंनी उमेदवारीवर दावा केल्याचे वृत्त नाही. श्रीवर्धनमधून बहीण आदिती तटकरे विरुद्ध अवधूत तटकरे एकमेंकाविरोधात लढतील, असे जाणकारांचे तर्क होते. अखेर ते सर्व तर्क बाजूला सारीत तटकरे कार्यकर्ते म्हणून आज 
सामोरे गेले. अवधूत तटकरेंनी आधी उमेदवारीवर दावा केला नाही, त्यानंतर आता शिवसेनेच्या प्रचार सभेत राजकीय भाष्य करीत नाहीत.बड्या तटकरेंच्या कारनाम्याबाबत
चीड व नाराजी स्पष्टपणे व्यक्त करीत नाहीत. रोहा येथिल राम मारुती चौकातील सेनेच्या सभेतही अवधूत तटकरेंनी सुनिल तटकरेंवरील भाष्य टाळले. एवढेच काय ? पापाच्या पैशाला, शापाला पैशाला हात लावणार नाही, अशी सामूहिक शपथही अवधूत तटकरेंनी घेतली. अवधूत तटकरे सुनिल तटकरेंच्या पराक्रमावर टीका करतील, हि अपेक्षा कार्यकर्त्यांत होती, पण अवधूत तटकरेंनी आजगायत टीका सोईस्कर टाळली. अशात अवधूत तटकरे बोलत का नाहीत, तटकरे विरुद्ध तटकरे सामना अद्याप रंगालाच नाही, त्यामुळे टीका ठरवून टाळतात का, खरंच आमचं ठरलंय ? अशी तुफान चर्चा सध्या सुरु आहे. 

दक्षिण रायगडचे राजकारण तटकरेंभोवती फिरत आहे. त्याच तटकरे घराण्याला वादाचे ग्रहण लागले, हे ग्रहण चारपाच वर्षापासून कायम आहे. वादाचे ग्रहण सुटण्यासाठी राज्याच्या पक्षश्रेष्टींनीं आटोक्यात प्रयत्न केले, ग्रहण अंशतः सुटले म्हणतात पुन्हा वादाचे ग्रहण कधी लागले हे समजले नाही. तटकरे कुटुंबातील वाद अखेर विकोपाला गेले, माजी आ.अनिल तटकरे, अवधूत तटकरे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमापासून कोसा दूर राहू लागले. याच घडामोडीत अवधूत तटकरेंनी मतदारसंघाकडे पाठ फिरविली, आमदार आहेत कुठे, राहतात कुठे म्हणत कर्यकर्त्यांची शोध मोहीम सुरु झाली. आमदारांची वाट पाहून अनेक कर्यकर्त्यांच्या डोळ्यांतील पाणी सुकले, काहींनी कंटाळून दुसऱ्या तटकरेंना आपले आश्रयस्थान मानले. अनेक कार्यकर्ते अवधूत तटकरेंना सोडून गेले. तेच अवधूत तटकरे निवडणुकींच्या तोंडावर काय भूमिका घेतात, राजकीय संन्यास घेतात का ? अशा चर्चेत अवधूत तटकरेंनी अचानक मातोश्रीची भेट घेतली. दुसऱ्या भेटीत कुटुंबासमवेत शिवबंधन बांधले. बंधू संदीप तटकरेंनी सुटत आलेले बंधन पुन्हा मजबूत केले. सेना प्रवेशानंतर अवधूत तटकरे श्रीवर्धन उमेदवारीचा दावा करतील, या अपेक्षेत तटकरेंनी उमेदवारी अप्रत्यक्ष नाकारली, बहीण विरुद्ध भावातील राजकीय संघर्ष टाळल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. त्याचवेळी आमचं ठरलयं ? अशी शंका कार्यकर्त्यांतून उपस्थित झाली. तरीही अवधूत तटकरे सेनेत सक्रीय झाल्याने सभेचे फड गाजवतील, असे वाटले होते, ते फडही दिसत नसल्याने सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात पडल्याचे बोलले जात आहे.

रोहा नगरपरिषद निवडणुकीत तटकरे वादाला ठिणगी पडली. माजी आ. अनिल तटकरे यांचे पूत्र संदीप तटकरेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी दाखल केली, कोण आला रे कोण आला. अशी गर्जना झाला. त्या राजकारणात अपक्ष उमेदवार समीर शेडगे यांचा केवळ सहा मतांनी पराभव झाला. तेच ठरवून राजकारण पुन्हा बड्या तटकरेंनी केले नाही ना ? अशी चर्चा सुरूच आहे. त्यानंतर आता सेनेत गेलेल्या अवधूत तटकरेंनी श्रीवर्धन विधानसभा उमेदवारीवरुन दावा सहज सोडला. त्यातून बहिण विरुद्ध भाऊ हा वाद टाळला. याउलट तेच अवधूत तटकरे शिवसेना नेता म्हणून सभेत दिसून येत आहेत. भाषण करीत आहेत, सेनेत कोणत्याच अटीशर्तीने गेलो नाही, माझा आमदार निधी सेनेच्या विभागातच जास्त वापरला, हीच एक कॅसेट ते वारंवार लावतात. दुसरीकडे सेनेचे नेते तटकरेंच्या घाराणेशाही, पापाच्या पैशावर तुटून पडलेत, शपथ देत आहेत, काकांवरील आरोप अवधूत तटकरे निवांत ऐकतात, घराणेशाही कानावर पडले. पण ते काही भाष्य करीत नाहीत. सुनिल तटकरेंही फारसी टीका करीत नाहीत, शहरातील एका सभेत वाट बघितली, पाया कोण पडले ? अशी बोचरी टीका तटकरेंनी केली. त्यामुळे तटकरे विरुद्ध तटकरे सामना रंगलाय नाही, आमचं ठरलयं असे नाही ना, सेनेच्या मैदानात अवधूत तटकरेंनी जोरदार भाष्य केले तर सेनेला लाभ होईल ? असे खुद्द शिवसैनिक बोलतात, पण अवधूत तटकरे का बोलत नाहीत, आता उर्वरीत प्रचारात ते बड्या तटकरेंवर बोलतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *