मतदार प्रक्रिया शांततेत पार, श्रीवर्धन, अलिबाग, पेणमध्ये कोण मारणार बाजी ? सर्वांचेच लक्ष

Share Now

1,255 Views

रोहा (प्रतिनिधी) श्रीवर्धन, अलिबाग, पेण विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. रोहा समावेश श्रीवर्धन, अलिबाग, पेण तीनही मतदारसंघात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. त्यातील रोहा, माणगांव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा पाच तालुक्यांचा समावेश असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील मतदान केंद्रावर सकाळी मतदारांनी फ़ारसी उत्सुकता दाखविली नाही. दहा वाजल्यानंतर मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजाविला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्रीवर्धन मतदारसंघात ६९ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तर जिल्ह्यात सांयकाळी सरासरी ७० टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे अलिबाग, श्रीवर्धन, पेण मतदारसंघात ग्रामीणातून मतदानाचा टक्का समाधानकारक वाढला. ग्रामीणातील मतदारांचा वाढलेला टक्का कोणासाठी फायद्याचा ठरतो ? हे निकालातून स्पष्ट होणार आहे. दक्षिण रायगडातील अलिबाग, महाड, श्रीवर्धन, पेण चारही मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढाई झाल्याचे जाणकरांतून बोलले जाते. त्यातील श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी आघाडीच्या आदिती तटकरे विरुद्ध महायुतीचे विनोद घोसाळकर यांच्यात मुख्य लढत आहे. घोसाळकर यांच्या समोर राष्ट्रवादीचे मोठे आव्हान आहे. लोकसभेत सुनिल तटकरेंना मिळालेली तब्बल ३७ हजाराची आघाडी घोसाळकर यांना तोडणे शक्य होईल का ? हे समोर येणार आहे. तर अलिबागमध्ये युतीचे महेंद्र दळवी विरुध्द आघाडीचे पंडित पाटील, पेणमध्ये युतीचे रवींद्र पाटील विरुध्द आघाडीचे धैर्यशील पाटील यांच्यात कोण बाजी मारतो ? याचीच उत्सूकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विधानसभेसाठीच्या सात जागांसाठी तब्बल ७८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. गुरुवारी कोणाचे फटाके फुटणार ? याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे.

श्रीवर्धन, अलिबाग, पेण मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता लक्ष गुरुवारच्या निकालाकडे लागले आहे. रोहा तालुका समावेश पेण, अलिबाग, श्रीवर्धन मतदारसंघातील लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या. अनेक घडामोडींची नोंद अधोरेखीत झाली. पेण विधानसभेसाठी कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या माजीमंत्री रविंद्र पाटील यांची थेट लढत शेकाप आघाडीचे सलग दोनदा निवडून आलेल्या धैर्यशील पाटीलांशी झाली. सेना, शेकापचे बालेकिल्ला असलेल्या पेण मतदारसंघात पाटील विरुद्ध पाटील यांनी प्रचारात खळबळजनक आरोप केले. धैर्यशील पाटील यांच्यावर एवढी संपत्ती आली कुठून ? असा आरोप रविंद्र पाटील यांनी केला. तर महायुतीचे उमेदवार रविंद्र पाटील १० वर्ष होते कुठे, आताच कमलातून उगवले ? ते निष्क्रिय आहेत, असा पलटवार धैर्यशील पाटील यांनी केला. आता पेण मतदारसंघातील जनता जनार्दन मतपेटीतून कोणाला कौल देणार, कमळ फुलणार का ? हे निकालातून समोर येईल. अलिबाग मतदारसंघातून महायुतीचे महेंद्र दळवी विरुध्द महाआघाडीचे पंडीत पाटील यांच्यात मुद्देगुद्दे झाले. महेंद्र दळवी यांच्या उमेदवारीतील भाजपाचा अडसर दूर झाल्याने त्यांची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले. शेकापवरील नाराजी, नव्या परिवर्तनाचे भाकीत महेंद्र दळवींना तारतात का, महाआघाडीचे पंडीत पाटील हे पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द करतात का ? या लढतीकडे प्रामुख्याने लक्ष लागले आहे.

श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. खा. सुनिल तटकरेंना लोकसभेत मिळालेल्या मताधिक्यातून बालेकिल्ला अधिक मजबूत झाला. आदिती तटकरे यांची महाआघाडीतून उमेदवारी आधीच निश्चित झाली. तर सुनिल तटकरेंचे पुतणे अवधूत तटकरे यांनी वडिल ज्येष्ठनेते अनिल तटकरे यांसह कुटुंबासमवेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अवधूत तटकरे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, असे वाटले होते. मात्र अवधूत तटकरेंनी उमेदवारीबाबत उत्साह दाखविला नाही. त्यातून बहीण विरुद्ध भाऊ असा संघर्ष टाळला गेला. त्याच घडामोडीत आमचं ठरलंय… अशी चर्चाही झाली. त्यानंतर मूळचे रायगडवासी असलेल्या दहिसर मतदारसंघातील विनोद घोसाळकर यांना ऐनवेळी महायुतीचे उमेदवारी देण्यात आली. घोसाळकर याना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला तर आदिती तटकरे यांचा श्रीवर्धन मतदारसंघात नेहमीच संपर्क राहिल्याने काय होणार ? अशा तर्कवितर्कात शिवसेना भाजपा युतीचे घोसाळकर यांना कार्यकर्त्यांनी स्विकारले. कधी नव्हे ते सेना भाजपात मनोमीलन झाले. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये बंडाळी झाली. श्रीवर्धनमध्ये मुस्लिम उमेदवार उभे राहीले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन सभा झाल्या, त्यामुळे सर्वच पत्ते सेनेच्या पथ्यावर पडल्याने घोसाळकर राष्ट्रवादी आघाडीचे आव्हान कितपत मोडून काढतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुंबईचे पार्सल परत पाठवा, गीते भरकटले, असे आरोप सुनिल तटकरेंनी केला तर भ्रष्टाचारी, घराणेशाही, त्यांच्या पाण्याच्या पैशाला हात लावू नका असे प्रतित्त्यूर अनंत गीते यांनी दिले. त्यात तीस चाळीस हजाराची आघाडी घेण्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी आघाडीला महायुतीचे विनोद घोसाळकर कितपत पुरुन उरतात ? हे गुरुवारच्या निकालातून समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *