शॉक लागून मृत्यू झालेल्या महादेव पवार, संकेत तांबेंच्या कुटुंबीयांना शिवसेनेने केली आर्थिक मदत 

Share Now

1,171 Views

महाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील वेरखोले येथील महादेव पवार व संकेत तांबे यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या कुटुंबीयांना शिवसेना संघटनेतर्फे प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम सोमवार 28 ऑक्टोबर रोजी आ. भरत गोगावले यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केली. याप्रसंगी आ. भरत गोगावले यांच्यासोबत तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, माजी पं. स. सदस्य लक्ष्मण बुवा गरूड, राजु रिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.     

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड औद्योगिक वसाहतीमधील पंचतारांकित क्षेत्रामध्ये गुरांसाठी गवत कापण्याकरिता गेलेल्या वेरखोले गावातील दोघांचा बुधवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेनंतर वेरखोले परिसरातील ग्रामस्थांनी वीज मंडळाच्या कार्यपद्धतीविरोधात संतप्त भावना व्यक्त करून मंडळाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेपर्यंत संबंधित मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने महाड औद्योगिक वसाहतीमधील वातावरण तणावपूर्ण असल्याचे चित्र प्रत्यक्ष भेटी दरम्यान पाहावयास मिळत होते. दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच आ. भरत गोगावले यांनी घटनास्थळी धाव घेतली असून संबंधित ग्रामस्थ तसेच स्थानिक पोलिस प्रशासनाबरोबर त्यांनी या संदर्भात चर्चा केली होती. महादेव पवार वय 55 आणि संकेत तांबे वय 22रा.वेरखोले हे आपल्या नियमित कामाकरिता सकाळी गुरांसाठी गवत कापण्याच्या कामानिमित्ताने आमशेत परिसरातील शेतपरिसरात गेले असता सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास या परिसरात विजेच्या तारांचा धक्का लागून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच वेरखोले परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. 
 
या ठिकाणी आलेल्या पोलिस प्रशासन तसेच वीज मंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना या घटनेविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याकडून अतिरिक्त पोलीस बळ मागविण्यात आले होते. मात्र वीज मंडळाच्या कारभाराविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक ग्रामस्थांकडून संतप्त भावना व्यक्त होत असून वीज मंडळाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेतले जाणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.गेल्या काही महिन्यांपासून विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात तालुक्यातील विविध भागांमधून अनेक तक्रारी प्राप्त होत असून वारंवार खंडित होणारा पुरवठा तसेच वीज ग्राहकांच्या समस्यांची पूर्तता त्वरित होत असल्यानेही मंडळाच्या कार्यपद्धतीवर नाराज स्थानिक ग्रामस्थांकडून अाक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक आ. भरत गोगावले यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन शिवसेना संघटनेमार्फत आर्थिक मदत देऊन आपण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *