आंबेवाडी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी, सेना आमने सामने, भाजपा तटस्थ, अपक्ष ठाम राहिल्यास तिरंगी लढत

Share Now

931 Views

रोहा (महेंद्र मोरे) राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येवून भाजपाचा वारू रोखण्यासाठी सरकार स्थापन करत आहेत. मात्र रोहा पंचायत समिती आंबेवाडी पंचायत गणाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी हे तालुक्यातील आपली हाडवैराची परंपरा राखत आमने सामने उभे ठाकले आहेत. असे असताना रोहा भाजपाने आपला उमेदवार उभा न करता तटस्थ राहणे पसंत केले असल्याचे दिसत आहे. मागील वेळी सेनेकडून पराभवाचा सामना करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने यावेळी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राज्याप्रमाणे सेना राष्ट्रवादी मनोमिलन न झाल्यास व अपक्षाने माघार न घेतल्यास येथे तिरंगी लढत होणार असे चित्र दिसत आहे. 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी झालेल्या छाननीमध्ये तीनही अर्ज वैद्य ठरले असून 4 डिसेंबर हि अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यावेळी येथील सर्व निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

रोहा पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक 2017 मध्ये पार पडली होती. त्यावेळी 80-आंबेवाडी या पंचायत गणाला नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला) असे आरक्षण पडले होते. शिवसेनेकडून चेतना चंद्रकांत लोखडे, राष्ट्रवादीच्या अर्पिता अनंत थिटे व भाजपाच्या अर्पिता संजय लोटणकर यांच्यात लढत झाली होती. राष्ट्रवादी गटबाजी विशेषतः तटकरे यांचे कौटुंबिक कलहाचा फायदा होत सेनेच्या चेतना लोखंडे यांचा यामध्ये विजय होत खा. सुनिल तटकरे यांना त्यांच्या होमपिचवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यानंतर विजयी उमेदवार चेतना लोखंडे त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करु शकल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द ठरविण्यात आले. या रिक्त झालेल्या जागेसाठी 12 डिसेंबर रोजी पोटनिवडणुक होत आहे. यावेळी होत असलेल्या निवडणुकीसाठी सेनेकडून रिद्धी विजय बोरकर, राष्ट्रवादीच्या सिद्दी संजय राजीवले तर मागील निवडणुकीत पराभव पत्कराव्या लागलेल्या राष्ट्रवादीच्या अर्पिता अनंत थिटे यांनी अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपाने आपला उमेदवार न दिल्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेत अपयश आल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे असे दिसत आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. राज्यपातळीवर वरीष्ठ नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी स्थानिक पातळीवर त्यांची काय भूमिका असेल हे स्पष्ट केलेले नाही. त्यामध्येच जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे वरीष्ठ नेते सत्तास्थापना नाट्यात रंगले असल्यामुळे आंबेवाडीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. शिवसेनेने याठिकाणी विजय मिळविला होता म्हणून या पोटनिवडणुक ही जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सेनेला मिळावी असे शिवसैनिकांना वाटत होते. हे अर्ज दाखल करण्यापूर्वी न झाल्यामुळे सेना राष्ट्रवादी आमने सामने उभे ठाकले आहेत. गुरुवार 28 नोव्हेबर रोजी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीमध्ये तीनही अर्ज वैद्य ठरले आहेत. त्यामुळे आता 4 डिसेंबर या अर्ज मागे घेण्याच्या तारखेला सेना, राष्ट्रवादी दिलजमाई न झाल्यास व अपक्ष उमेदवाराने आपली उमेदवारी कायम ठेवल्यास आंबेवाडीमध्ये तिरंगी लढत होणार असे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *