सॉल्वे कंपनीच्या अधिकाऱ्यांची अरेरावी सुरूच; रोहा पोलिसांत तक्रार दाखल

Share Now

1,747 Views

रोहा (प्रतिनिधी) धाटाव एमायडीसीतील सॉल्वे कंपनीच्या अधिकाऱ्यांची अरेरावी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. त्याबाबत कामगार सुधीर सकपाळ यांनी थेट पोलीस ठाण्यात संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. दुसरीकडे पोलीसांनी सहकार्य करण्याऐवजी प्रचंड मनस्ताप दिले. सांगितलेल्या बाबी जबाबात लिहिल्या नाहीत. जबाब परस्पर तयार केले. त्यावर सही करण्यास नकार दिल्याने तुला सही करावीच लागेल, नाहीतर जेलमध्ये टाकेन असे सांगून सही करण्यास भाग पाडले, तक्रार परस्पर बंद केली, अशी तक्रारही जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे पीडित कामगार सुधीर सकपाळ यांनी केल्याने नेमके प्रकार काय ? अशी चर्चा सबंध जिल्ह्यात सुरु झाली. दरम्यान, स्वेच्छानिवृत्ती घेण्यास जबरदस्तीने भाग पाडणे, तसे कामगाराला मानसिक त्रास देणे, त्यावर सबंधित पोलीसांनीही दखल न घेता कामगारास वेठीस धरणे हा प्रकार धक्कादायक तेवढाच निंदनीय आहे, त्याबाबत आम्ही प्रशासनाला जाब विचारू, सबंधीत अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन उभे करू असा ईशारा कामगार नेते सुरेश मगर यांनी दिला, तर सॉल्वे कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाले नाही, त्यामुळे गंभीर प्रकाराबाबत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

धाटाव एमआयडीसीतील कायमस्वरूपी कामगार विरुद्ध कंपनी व्यवस्थापन संघर्ष नवे नाही. कामगार कपात प्रकरण जिल्ह्यात गाजले. आजही पाच कामगार न्यायासाठी कंपनीसमोर अनेक महिने आंदोलन करीत आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी अक्षरशः कमी पडले. उलट सॉल्वेत ठेका घेण्यासाठी राजकारणी ठेकेदार कार्यतत्पर झालेले दिसत आहेत. गेटसमोर कायम न्यायासाठी प्रतीक्षेत असलेल्या कामगार बंधूंना भेटण्याचा फटका सुधीर सकपाळ यांना बसला. त्याचा राग मनात धरून जनरल मॅनेजर विजयकुमार चौगुले यांनी सकपाळ यांना बोलावले, कंपनीत कामगारांची संख्या जास्त आहे, तू निवृत्ती घेतल्यास किती पैसे मिळतील हा हिशोब सांगितला. यावर मला स्वेच्छानिवृत्ती घ्यायची नाही, असे सांगितले. त्यानंतर वाचमनने मला एक पाकीट दिले. त्यात व्हीआरएस घेतल्यास मिळणाऱ्या रकमेचा तपशील होता. मात्र स्वेच्छानिवृत्त न घेण्यावर कुटुंब ठाम राहिले, अशी हकीकत सकपाळ यांनी सांगितली. तद्नंतर कंपनीविरोधात आंदोलन करणाऱ्या कामगारांना भेटतो, त्यामुळे तुला कामावरून कमी करणार, अथवा बदली करू, मेडिकल अनफिट करु, अशा अधिकाऱ्यांच्या धमकावणीने कुटुंबाचं मानसिक संतुलन बिघडले. तुला फार मस्ती आलेय, पोलीस यंत्रणा माझ्या खिशात आहे, असे चौगुले यांनी वारंवार सांगितल्याचे निवदन कामगार सुधीर सकपाळ यांनी जिल्हाधिकारी रायगड यांसह सर्वच प्रशासनाला दिल्याने सॉल्वे कंपनी पुन्हा नव्याने चर्चेत आली.

सॉल्वेचे कामगार सुधीर सकपाळ यांनी सॉल्वेचे मॅनेजर चौगुले, अनिल तस्ते यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी पोलीसांनीही प्रचंड मनस्ताप दिले, असा धक्कादायक प्रकार कामगार सकपाळ यांनी सलाम रायगडला सांगितले. त्याबाबत पोलीस अधीक्षक रायगड यांना पत्र लिहिले. सांगितलेल्या बाबी जबाबात लिहिल्या नाहीत. स्व:ताच जबाब तयार केला. तुला सही करावीच लागेल, नाहीतर तुरुंगात टाकेल असे दबाव टाकून माझी सही घेतली त्यामुळे माझ्या प्रकरणात लक्ष घालावे, सबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी सकपाळ यांनी केली आहे. अखेर सुधीर सकपाळ यांच्या तक्रारीविरुद्ध सॉल्वेचे अधिकारी विजयकुमार चौगुले, अनिल तस्ते यांच्याविरोधात धमकावणे, मानसिक छळासाठी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तर कामगार सकपाळ यांनी सलाम रायगदजवळ धक्कादायक प्रकार कथन केला. कुटुंब दडपणाखाली आहे, काही बरे वाईट झाल्यास सबंधीत अधिकाऱ्यांना जबाबदार धरावेत, असे सकपाळ यांनी सांगितले. याबाबत कामगार नेते सुरेश मगर यांनी कंपनी व्यवस्थापन व पोलिसांना धारेवर धरले, सहकार्य करण्याऐवजी हवे ते जबरदस्तीने लिहून घेणे धक्कादायक, निंदनीय आहे. दहा दिवसात सॉल्वेवर कारवाई न केल्यास सॉल्वेवर निघालेल्या मर्यादेपेक्षा अधिक ताकदीने मोर्चा नेवू, कामगारावरील अन्याय खपवून घेणार नाही असा ईशारा नेते मगर यांनी दिला. दरम्यान, याबाबत अधिकारी अनिल तस्ते यांच्याशी संपर्क झालेले नाही. त्यामुळे कामगार विरुद्ध व्यवस्थापन संघर्ष अधिक होतो का, सबंधीत अधिकारी, पोलीस प्रशासनाबाबत वरिष्ठ प्रशासन अधिकारी काय भूमिका घेतात ? हे समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *