रोहा अष्टमी न. प. विषय समिती सभापती निवडीत ‘महिलाराज’, आरोग्य पुन्हा दर्जीच्या हाती

Share Now

1,208 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदांची निवड प्रक्रिया बुधवार 18 डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये जेष्ठ नगरसेवक अहमद दर्जी वगळता अन्य सर्व समित्यांचे सभापती पदी महिला नगरसेविकांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुर्वा मोहिते यांची महिला व बालकल्याण, शिल्पा धोत्र शिक्षण व क्रीडा-युवक कल्याण, सारीका पायगुडे पाणीपुरवठा व अपंगकल्याण यासह गीता पडवळ यांचे कडे दिवाबत्ती, पर्यटन व नियोजन यांचा समावेश आहे. तर जेष्ठ नगरसेवक अहमद दर्जी यांच्या हाती पुन्हा आरोग्य व स्वच्छता समिती देण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे रोहा न.प. मध्येही महाआघाडी होणार अशी चर्चा होती. त्यामधून शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका समीक्षा बामणे यांना सभापती पद मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सभापती पदांच्या निवडीवरुन रोहामधील महाआघाडीच्या चर्चेला तुर्तास तरी पूर्णविराम मिळाला असल्याचे दिसत आहे. रोहा नगरपरिषदेच्या द. ग. तटकरे सभागृहात रोहा उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी यांच्या उपस्थित ही निवड बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
            
रोहा अष्टमी नगरपरिषदे राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे पंधरा तर शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक असे एकूण सतरा नगरसेवक आहेत. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे निर्विवाद बहुमत न.प.मध्ये आहे. बुधवारी होत असलेल्या सभापती निवडीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. कोणाला पुन्हा संधी मिळणार, नव्याने कोण येणार याची चर्चा होती. पाणीपुरवठा सभापती म्हणून सलग तीन वर्षे कर्तव्यदक्षपणे कार्यभार करणाऱ्या महेश कोलाटकर यांचे जागी तरुण महिला नगरसेविका सारीका पायगुडे यांची निवड करण्यात आली आहे. तर नगराध्यक्ष पदासह मागील बारा वर्षे नगरसेविका असलेल्या पुर्वा मोहिते यांच्याकडे महिला व बालकल्याण समिती देण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष पदाचा अनुभव असलेल्या शिल्पा धोत्रे यांचेकडे शिक्षण व युवक कल्याण समिती सोपविण्यात आली आहे.  तर गीता पडवळ यांचेवर दिवाबत्ती, पर्यटन व नियोजन समिती देण्यात आली आहे.

नवनियुक्त सभापतींनी आपल्या निवडीनंतर खा. सुनिल तटकरे, आ. अनिकेत तटकरे , आ. आदिती तटकरे यांचे प्रति आभार व्यक्त केले आहेत. यासोबतच त्यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र रहात नगराध्यक्ष संतोषपोटफोडे यांचे नेतृत्वाखाली रोहेकर नागरिकांची सेवा करणार असे सांगितले आहे. दरम्यान, रोहा अष्टमी नगरपरिषदच्या उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक ५ जानेवारी रोजी होत आहे. त्यात मुख्यतः उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते ? याकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे. तर स्वीकृत नगरसेवकपदासाठी चंद्रकांत पार्टे, अलीम मुमेंरे यांची नावे चर्चेत असल्याने त्यांना संधी मिळेल ? अशी चर्चा सुरु झाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *