रोहात सर्वच मोबाईल सेवा वारंवार ठप्प, ऑनलाईन कामात अडथळे, ग्राहक संरक्षण समिती सदस्य गप्प का ?

Share Now

797 Views

रोहा (महेंद्र मोरे) मोबाईल सेवा गैरसोयीची देण्यात सगळ्यात जास्त प्रसिद्धी भारत संचार निगम या शासकीय कंपनीची होती. त्यामुळे ग्राहकवर्गाने त्याकडे पाठ फिरवत महागड्या पण चांगली सेवा देणाऱ्या खाजगी दुरसंचार कंपन्यांचे मोठ्या संख्येने वळला होता. मात्र आता बीएसएनएलची सेवा सुस्थितीत असलेली दिसत असतानाच सर्वच खाजगी कंपन्यांची सेवा ही वारंवार ठप्प होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे व्यावसायिक , नागरिक यांचे सर्व प्रकारचे ऑनलाईन व्यवहार व शासकीय कामे करत असताना अडथळे येत वेळेचा अपव्यय होत आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. याचा सर्वाधिक मनस्ताप जेष्ठ नागरिकांना होत असल्याचे दिसत आहे. 

परिवहन महामंडळाने 31 डिसेंबर ही जेष्ठ नागरिक प्रवासी स्मार्ट कार्ड नोंदणी करण्याकरीता अंतीम दिनांक घोषित केली आहे. त्यामुळे रोहा शहर व ग्रामिणातील जेष्ठ नागरिक हे कार्ड नोंदणी करीता आरक्षण केंद्रावर जात आहेत. मात्र त्याच वेळी संबंधित केंद्र चालक वा ग्राहक या पैकी कोणाचीही मोबाईल सेवा बंद असल्यामुळे त्यांना नोंदणी करणे अशक्य होवून जाते. परिणामी या शुल्लक कामासाठी जेष्ठ नागरिकांना ताटकळत थांबावे लागत असून नाहक त्यांचा खोळंबा होत असल्याचे दिसत आहे.सगळ्यात चीड निर्माण करणारी बाब म्हणजे बीएसएनएल ची सेवा ठप्प झाल्यावर रोहा कार्यालयात विचारणा केल्यावर सेवा ठप्प झाली आहे व कधी सुरळीत होईल याची माहिती ग्राहकांना देण्यात येत होती. मात्र खाजगी कंपन्यांची एजन्सी घेतलेले चालक कोण हे सर्वच ग्राहकांना माहिती नाहीत व ज्यांना माहित आहे त्यांनी चौकशी केली असता आपले हात वर करत कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रात चौकशी करा अशी मुजोर उत्तरे देत ग्राहकांची बोलावण करतात. रोहा मधील जिल्हाधिकारी नियुक्त ग्राहक संरक्षण समिती सदस्य या समस्येची तक्रार मा.जिल्हाधिकारी यांचे कडे करत या खाजगी कंपन्या व त्यांची सेवा पुरवणाऱ्या एजन्सी चालकांचे वर कारवाई कधी करणार? असा सवाल मोबाईल ग्राहकांचे मधून केला जात आहे.

रोहा शहर व परिसरात वारंवार सर्वच दुरसंचार कंपन्यांची सेवा बंद होण्याचे प्रमाण आता रोज होत आहेत.याआधी ही समस्या भारत संचार निगमच्या बाबतीत निर्माण होत होती. त्यावेळी मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाने कंपनीच्या अधिकारी कर्मचारी यांना जाब विचारत, कधी विनोदी ढंगाचे मेसेज करत आपला संताप व्यक्त केला होता.त्यानंतर दूरसंचार सेवा देणाऱ्या आयडिया, एयरटेल, व्होडाफोन, इत्यादींसह करलो दुनिया मुठ्ठिमे म्हणत आलेला रिलायन्स व नंतर धनधनादन चा नारा करत आलेल्या जिओ याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात वळले. मात्र आता या नाव मोठ पण लक्षण खोट असणाऱ्या या कंपन्या ग्राहकांकडून महिन्याला करोडो रुपये उकळत असताना त्यांना सेवा मात्र सुरळीत देण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. रोज कोणत्या न कोणत्या कंपनीची सेवा ही अनिश्चित काळासाठी बंद होण्याचे प्रमाण वाढत आहे. आज शासकीय कामकाजासह सर्वच व्यवहार हे ऑनलाईन झाले असल्यामुळे मोबाईल सेवा ठप्प झाल्याने नागरिकांसह शासकीय कर्मचारी, महाईसेवा केंद्रचालक यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा सगळ्यात जास्त त्रास हा जेष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. 
             
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहेत.हे स्मार्ट कार्ड काढताना आधारकार्ड सोबत त्या व्यक्तीची खात्री बायोमॅट्रिक पद्धतीने पहिल्यांदा करण्यात येते. नंतर त्याचे मोबाईल नंबर वर मेसेजच्या माध्यमातून आलेल्या सांकेतांक नंबर वरुन पुढे त्याचे स्मार्ट कार्ड माहिती नोंदणी करण्यात येते. मात्र अश्यावेळी मोबाईल कंपनीचे नेटवर्क ठप्प झाल्यास कोणतेही काम करता येत नाही.खाजगी कंपन्यांची सेवा कधी सुरळीत होणार हे कळु शकत नसल्यामुळे तासनतास वाट पाहणे अथवा परत माघारी जाणे असा मनस्ताप जेष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.मोबाईल वापरणारा प्रत्येक ग्राहक हा आधी पैसे भरून या कंपन्यांकडून सेवा विकत घेत आहे. मात्र या कंपन्या त्याला पूर्ण सेवा न देता त्याची लुटमार करत असल्याचे यामुळे दिसत आहे. ग्राहकांचे हक्कावरच या कंपन्या व त्यांचे विक्री प्रतिनिधी हे डल्ला मारत असल्याचे दिसत आहे. रोहा शहर व परिसरात मा. जिल्हाधिकारी नियुक्त अनेक ग्राहक संरक्षण समिती सदस्य आहेत. मात्र आजपर्यंत ते फक्त आपले ओळखपत्र दाखवण्याचेच काम करतात असे दिसत आहे.गेले अनेक महिने रोहेकर नागरिकांना विस्कळीत झालेल्या दुरसंचार सेवेचा त्रास सहन करावा लागत आहे.आता तरी ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करत या खाजगी कंपन्यांचेवर कारवाई करावी व ग्राहकाची होणारी गैरसोय दुर करण्यात पुढाकार घ्यावा अशी मागणी मोबाईल ग्राहकांमधून होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *